असे अनेक विचार त्या मातेला त्रस्त करीत होते. लिलीला कुशीत घेऊन ती रडे. रडता रडता झोपी जाई. असे करीत, हिंडत हिंडत ती एका गावाला आली. सायंकाळी पाच-सहा वाजण्याची वेळ असेल. ही दमलेली आई एका झाडाखाली पडली होती. जवळ तिचे बाळ झोपले होते. उशाशी एक पेटी होती.
त्या झाडाजवळ एक खाणावळ होती. त्या खाणावळवाल्याची मुले या झाडाजवळ खेळत होती. एकमेकांचे डोळे धरीत, लपत, कोणी कुणाला पकडी. पळापळ होई. एक खेळ संपे. दुसरा सुरू होई. भातुकली मांडीत. झाडाची पडलेली पाने ह्याच पत्रावळी. त्यांच्यावर काही तरी लुटुपुटीचे वाढायचे, सर्वांनी खायचे, लुटुपुटीच्या द्रोणातून लुटुपुटीची कढी भुरकायची. मग कोणी एखादा कागद आणी. त्याची कोणी होडी करी, कोणी पंखा करी, कोणी फाडून पीळ भरून झाड करी. मुलांच्या गंमती. आमची लिलीही हळूच उठून त्या मुलांत मिसळली. तीही हसू लागली. खेळू लागली. लुटुपुटीचे जेवू लागली. त्या मुलांना गंमत वाटली. त्यांनी तिला आपल्यात घेतले. लिली फार सुंदर दिसे.
'कशी आहे मुलगी?' त्यांच्यातील एक म्हणाली.
'साबुदाण्यासारखी.' दुसरी बोलली.
'दुधासारखी.' तिसरी बोलली.
चौथीला अद्याप उपमा सुचत नव्हत्या. खाणावळवाल्याला मुली बर्याच होत्या. मुलगा एकच होता.
लिलीची आई जागी झाली; परंतु जवळ मुलगी दिसेना. ती कावरीबावरी झाली. मुलगी कोणी घेऊन तर नाही गेले असे मनात येऊन ती दचकून उठली. तोच समोर लिली दिसली. खेळण्यात दंग होती. त्या मुलामुलींशी एकरूप झाली होती. घाबरलेली माता कौतुकाने लिलीचा खेळ पाहू लागली.
'आता घरात या रे. पुरे खेळ. तिन्हीसांजा झाल्या.' खाणावळवाल्याची बायको दारातून म्हणाली. ती मुले खेळ आटोपून निघाली. त्यांच्याबरोबर लिलीही निघाली. ती मुले थांबली. ती विचार करू लागली. इतक्यात लिलीची आई तेथे आली व लिलीने तिला मिठी मारली.