'परंतु ज्याच्यासाठी पकडण्यात आलं त्याची तर तक्रार नाही. मी नगराचा अध्यक्ष आहे. मी सांगतो की, या स्त्रीला सोडा. माझं म्हणणं ऐका.' तो नगराध्यक्ष रागाने म्हणाला.
'नाही सोडलं तर काय कराल?' अंमलदाराने तीव्र दृष्टीने बघत प्रश्न केला. 'जे करता येईल ते करीन. माझीही काही शक्ती आहे,' तो उदारात्मा म्हणाला.
'सोडा त्या स्त्रीला!' अंमलदार म्हणाला.
पोलिसांनी तिला मुक्त केले. ती त्या नगराध्यक्षाच्या पाया पडू लागली. ती म्हणाली, 'खरंच का तुम्ही उदार आहात? तुम्ही मला सोडविलंत! मी तुम्हाला दुष्ट समजत होते. तुमच्या कारखान्यातून मला काढून टाकण्यात आलं. माझ्या मुलीला मी पैसे पाठवते. मुलगी असणं म्हणजे का पाप? हे पुरुष पापी असतात, स्त्रियांची ते फसवणूक करतात, विटंबना करतात. मी पापी नाही. माझ्या मुलीसाठी मी जगते. माझी नोकरी गेली. मुलीला पैसे कसे पाठवू? माझे केस कापून मी विकले. माझे दात विकले. माझं सारं सौंदर्य! ते गेलं माझ्या मुलीसाठी. का माझी नोकरी दवडलीत? का?'
'मला माहीत नव्हतं. परभारे तुम्हाला काढून टाकण्यात आलं. पुन्हा देईन नोकरी.' तो म्हणाला.
'माझा हात धरा. ताप भरला हो मला. धरा ना? धरा. अनाथाला आधार द्या. छे:! अंधारी येते डोळयांसमोर, धरा हात, नाही तर मी पडेन,' ती म्हणाली.
त्याने एक गाडी बोलावून घेतली. त्या तापाने फणफणणार्या स्त्रीला गाडीत घालून तो गेला. वाटेत तिने स्वत:ची कहाणी सांगितली. एकाहॉस्पिटलमध्ये तिला घेऊन तो गेला. ते हॉस्पिटल त्याच्याच देणगीतून सुरू झालेले होते. तो महात्मा तेथे येताच दवाखान्यातील सारे डॉक्टर, सार्या बाया, सारे नोकरचाकर आदराने उभे राहिले. सर्वांनी त्याला वंदन केले.
'या भगिनीची नीट व्यवस्था लावा,' तो म्हणाला.
एका खाटेवर त्या भगिनीला निजविण्यात आले. सारी व्यवस्था लागली.