'ठेवतो तयार घोडा.'
नोकर निघून गेला. त्या उदार पुरुषाने भराभर कामाचे कागद वाचले. अनेक कागदांवर सह्या केल्या. मधून मधून तो घडयाळाकडे पाहात होता. दहा वाजायला आले. तो उठला. त्याने भराभर जेवण केले आणि घोडयावर स्वार होऊन तो निघाला. लोक आश्चर्याने पाहात होते.
त्याने भरधाव घोडा सोडला. घोडा घामाघूम झाला व तोही घामाघूम झाला. धुळीने तोंड माखले. शेवटी एकदाचे ते गाव दिसू लागले. त्या गावात तो शिरला. कोणत्या बाजूला कोर्ट आहे?
'काय हो, कोर्ट कोणत्या बाजूला?' त्याने एकाला विचारले.
'असं सरळ जा व उजव्या बाजूला वळा. तिथं दिसेल गर्दी. आज एक गमतीचा खटला आहे, तो ऐकायला सारे लोक गेले आहेत,' तो मनुष्य म्हणाला.
निघाला घोडा. उजव्या बाजूकडे वळला. तो तुफान गर्दी. आपला हा उदार पुरुष घोडयावरून खाली उतरला. एका झाडाला त्याने घोडा बांधला. त्याने आपले तोंड वगैरे पुसले. दुसरा अंगरखा त्याने घातला. तो कोर्टात जाऊ लागला. त्याची भव्य व उदार मूर्ती पाहून लोक आपोआप त्याला जायला जागा देत. तो त्या मुख्य सभास्थानी आला. न्यायाधीस उच्चासनावर बसले होते. हा उदार पुरुष आत शिरताच सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. सारे उभे राहिले; परंतु अंधारात प्रकाश आला, सूर्य आला. न्यायाधिशाने या पुरुषाला ओळखले.
'या. येथे या. माझ्याजवळ बसा. आज आमचं भाग्य!' असे न्यायाधीश विनयाने म्हणाले.
न्यायाधिशाजवळ एक सुंदर खुर्ची ठेवण्यात आली. तीत हा पुरुष बसला. न्यायाधीशही बसले. खटला सुरू झाला.
'महाराज, तो पळून गेलेली कैदी मी नव्हे. त्या तुरुंगाचं नावही मी कधी ऐकलं नाही. माझ्या वयाला आता पन्नास वर्षं झाली. कधी कोणाचं वाकडं केलं नाही. बारा वर्षांपूर्वी म्हणे पळून गेलेला कैदी! तो का मी? म्हणे तसाच उंच आहे. तसाच जाडजूड. हा का पुरावा? उंच असणं व जाडजूड असणं हा का गुन्हा? महाराज, मी निरापराधी आहे. मला हे काही माहीत नाही. कोर्ट-कचेरीची कधी पायरी मी चढलो नाही. जाऊ दे मला घरी. माझी मुलंबाळं वाट पाहात असतील,' तो आरोपी म्हणाला.