'खरंच. तुम्ही व मी. मी आणि तुम्ही.'

'लिल्ये, ते शेजारी कोण आले आहेत राह्यला?'

'ते एक गरीब विद्यार्थी आहेत. ते वकिलीचा अभ्यास करतात. ते गरिबांचं राज्य करणार आहेत. ते सुध्दा एकटे आहेत. इथं कमी भाडं म्हणून राह्यला आले आहेत.'

'त्याच्याजवळ फार बोलत नको जाऊ.'

'तुम्हाला जगाचा विश्वास नाही वाटतं?'

'जगात सारं दिसतं तसं नसतं. आपल्याला जपून राह्यला हवं बाळ, हो.'

'बरं आजोबा. तुम्ही सांगाल तशी मी वागेन.'

वालजी व लिली तेथे राहात, परंतु वालजी दिवसभर बाहेर असे. घरी फारसा येत नसे. सकाळी सात आठ वाजता तो बाहेर पडे. मग जेवायला येई. पुन्हा जाई, तो रात्री येई. रात्री लिली निजली म्हणजेही तो बाहेर जाई. मग केव्हा तरी येई. त्याने भूत बंगल्यात जागा घेतली होती, तशीच दुसरीकडेही एक जागा होती. त्या जागेतही दिवसाचा काही वेळ तो राही. वालजीच्या अनेक खोल्या, अनेक बिर्‍हाडे, तो सर्व ठिकाणी थोडा थोडा राही. एक वालजी अनेक होई.

एके दिवशी सकाळी वालजी बाहेर पडत होता. तो मालक तणतणत होता. एक प्रौढ मुलगी तेथे होती. तिच्या अंगावर चिंध्या होत्या. कोळशांनी हात काळे झाले होते.

'तुम्ही खोली खाली करा. चार महिन्यांचं भाडं थकलं. हा काय फाजीलपणा!' मालक म्हणाला.

'परंतु बाबा आजारी आहेत. आईलाही काम करवत नाही. काय करायचं? आम्हाला घालवू नका. कुठं जाऊ आम्ही?' ती मुलगी म्हणाली.

'किती द्यायचं आहे तुमचं भाडं?' वालजीने विचारले.

'चार महिन्यांचं. वीस रुपये.' ती मुलगी म्हणाली.

'मी देतो हो. जा तू. गरिबांची दैना असते.' तो म्हणाला.

वालजी जरा बाजूला गेला. त्याने कोटाची शिवण जरा ढिली करून आतून नोटा काढल्या. त्या मालकाला त्याने त्या दिल्या. ती मुलगी आभार मानून गेली. तो मालक वालजीकडे साशंकतेने पाहू लागला. हा मनुष्य चोरबीर तर नाही? कोटात असे कसे पैसे ठेवतो, असे त्याला वाटले. त्याने पोलिसांस कळविले. पोलिस त्या वाडयाभोवती घिरटया घालू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel