परंतु इतक्यात तो आमचा उदार पुरुष रस्त्याच्या खालच्या बाजूला एकदम जाऊन उभा राहिला. डोळयाचे पाते लवते न लवते तोच तेथे उभा राहिला. ते चाक - खाली घसरणारे चाक त्याने आपल्या हाताने एकदम पलीकडे ढकलले! अरे बाप रे, केवढी ही शक्ती! जड गाडी, मालाने भरलेली! परंतु त्याने ते चाक ढकलले. चाक ढकलून तो पुन्हा एकदम वर आला. त्याने गाडी रोखून धरली. गाडी थांबली. तो गाडी आस्ते आस्ते नेऊ लागला. बैल त्याला वचकले. त्याची सिंहाची शक्ती पाहून ते बैल नरमले, थंड झाले. ते रीतसर चालू लागले.
चौकात प्रचंड गर्दी झाली. 'गाडी थांबविली. चाक उचललं. आपले प्राण धोक्यात घातले, केवढा महात्मा!' असे जो तो बोलू लागला. नगरपालिकेचा एवढा अध्यक्ष, किती तरी कारखान्यांचा मालक, उदारांचा राणा; परंतु किती साधा, किती त्यागी! त्याच्या नावाचा जयजयकार होऊ लागला.
इतक्यात ती लिलीची आई तेथे आली. तिला त्या महात्म्याची स्तुती सहन नाही झाली. ती धावत धावत त्याच्याकडे गेली. त्याच्या अंगावर ती थुंकली. 'दुष्ट, पापी, चांडाळ मेला. माझं सारं तू नुकसान केलंस. तू माझं वाटोळं केलंस,' अशा प्रकारे ती शिव्या देऊ लागली. तिने त्याला दगड मारले, लोक तिला ओढू लागले. इतक्यात पोलिसांनी तिला पकडले, तिला गिरफदार करण्यात आले. लिलीच्या आईचा पोलिसठाण्यावर खटला सुरू झाला. तिच्या दंडाला दोर्या बांधण्यात आल्या होत्या. पोलीस अंमलदार तेथे खुर्चीवर बसलेला होता. इतक्यात तो उदार पुरुष, तो म्युनिसिपालिटीचा अध्यक्ष तेथे आला. पोलिसांनी त्याला खुर्ची दिली. तो पोलीस अंमलदार उभा राहिला, तो नवीनच आला होता.
'या बाईला शिक्षा देणार आहे. तुमच्या अंगावर ती थुंकली. तुम्हाला तिनं शिव्या दिल्या, दगड मारले,' तो पोलिस अंमलदार म्हणाला.
'तिला सोडून द्या असं सांगण्यासाठी मी आलो आहे. माझी काही तक्रार नाही. ती एक अनाथ स्त्री आहे. मी तिची चौकशी करून आलो आहे. गरिबीमुळं ती वेडी झाली आहे. चुकीनं माझ्या कारखान्यातून ती काढली गेली. मीच तिचा अपराधी आहे. सोडा तिला. सोडा तिच्या दोर्या,' तो म्हणाला.
'माझ्या सांगण्यावरून तिला पकडण्यात आलं. तिला सोडण्यात येणार नाही.' तो अंमलदार म्हणाला.