'बरं केलंस. तूही भलेपणानं वाग. तू माझ्या वडिलांचे न कळत प्राण वाचवले आहेस. रणांगणावर ते पडले होते. त्यांच्या अंगावरचे मुडदे तू दूर केलेस. त्यांना हवा मिळाली. तू त्यांच्या गळयातील साखळी नेलीस. परंतु त्यांचे प्राण दिलेस. मी तुला पैसे देतो. दुसर्‍या प्रांतात जा. प्रामाणिकपणं धंदा कर. हे घे पाच हजार रुपये. माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण होवो. जा!' दिलीप म्हणाला.

तो खाणावळवाला पाच हजार रुपये घेऊन गेला. त्या रुपयांचा त्याला आनंद झाला, परंतु त्यापेक्षाही हृदय निर्मळ व हलके झाल्याचा त्याला अधिक आनंद झाला.

दिलीपने लिलीला हाक मारली.
'काय?'

'चल, आजोबांकडे जाऊ, त्यांचे पाय धरू. ते महात्मा आहेत. आज खरं कळलं.'

'चला. लवकर जाऊ. मला कसं तरी वाटत आहे. आजोबा भेटतील का?' दोघे निघाली. वालजीच्या खोलीजवळ आली. मोलकरीण तेथे होती.

'कसं आहे?' त्यांनी विचारले.

'तुम्हीच आत जाऊन बघा.' ती दु:खाने म्हणाली.

दोघे आत गेली. वालजी शान्तपणे डोळे मिटून पडला होता. हातात लिलीची खेळणी होती. दोघे दोन बाजूला बसली.
'आजोबा,- आजोबा, डोळे उघडा. ही तुमची लिली आली आहे. तिला आशीर्वाद द्या. शेवटचं प्रेमानं पाहा. आजोबा...' लिली दु:खाने हाक मारीत होती. वालजीने डोळे उघडले. प्रेमळ डोळे! त्याच्या तोंडावर प्रसन्नता फुलली. शेवटचा प्रकाश फुलला. पवित्र- शांत प्रकाश.

'लिल्ये, आलीस? मला वाटतच होतं की येशील. देव शेवटी सारं चांगलं करतो. दिलीप, आलास? बरं झालं. मला किती आनंद होतो आहे! आता मी सुखानं मरतो.' वालजी क्षीण स्वरात म्हणाला.

'आता मरू नका. तुम्ही आमच्याकडे चला. आम्ही तुमची सेवा करू.' लिली म्हणाली.

'लिल्ये, आता आशा नाही. तुझ्यासाठी प्राण घुटमळत होते. आता ते राहाणार नाहीत. लिल्ये, जप. दिलीप, एकमेकांस अंतर देऊ नका. परस्परांवर प्रेम करा. संशय नका एकमेकांचा घेऊ. कधी संशय आला तर तो फेकून घ्यावा आणि जगाला प्रेम द्या. चोर, दरोडेखोर,खुनी तेही थोर असतात. आपणात दिव्यता नसते ती त्यांच्यातून कधी कधी प्रगट होते. देवानं दिव्यता सर्वांच्या ठायी ठेवली आहे. प्रगट होण्यास वाव मिळत नाही. लिल्ये, तुझा हात दे हातात. दिलीप, तुझाही दे.'

लिलीचा व दिलीपचा असे ते दोन्ही हात वालजीने आपल्या हातात एकत्र धरले. आता बाहेर सायंकाळ झाली. मोलकरणीने घरात दिवा लावला. वालजी शान्तपणे पडून होता. 'लिल्ये, जगाला प्रेम द्या. प्रेम एक सत्य आहे. निरपेक्ष प्रेम. आत्म्याचं ते खरं वैभव हो, दिलीप.' पुन्हा वालजी थांबला. बाहेर बरीच रात्र झाली. लिली व दिलीप रडू लागली. त्यांचे अश्रू घळघळले. वालजीने ते अश्रू पाहिले.

'रडू नका बाळांनो, गरिबांसाठी असे अश्रू तुमच्या डोळयांतून येऊ देत. गरिबांचे संसार सुंदर करण्यासाठी झटा. समाजरचना बदला. समता आणा. मग ना कोणी चोर, ना दरोडेखोर. माणसाची विटंबना मग थांबेल. मनुष्याची दिव्यता फुलेल. लिल्ये, दिलीप, माझा तुम्हाला शेवटचा संदेश म्हणजे निरपेक्ष प्रेम जगाला द्या. प्रेम, प्रेम. एक प्रेम खरं आहे.'

संपले. तो पाहा एकदम एक तेजस्वी तारा खळ्कन आकाशातून तुटला. त्याची रेषा कशी तेजस्वी उमटली. त्या खिडकीतून ती दिसली. वरचा तारा खाली आला. खालचा वर गेला. एक महान आत्मा वर गेला. त्याला नेण्यासाठी का तो वरचा तारा खाली आला होता? जा, महान आत्मा, जा. तुझा प्रेमाचा संदेश या संसारात चिरंतन राहील!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to दु:खी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
गांवाकडच्या गोष्टी
झोंबडी पूल
श्यामची आई
सापळा
मराठेशाही का बुडाली ?
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
कथा: निर्णय
शिवाजी सावंत
रत्नमहाल