त्याने तिच्याजवळची ती घागर घेतली. एका हातात लोंबकळवीत तो चालला. तिची हकीगत तो ऐकत होता. मधूनमधून तिला प्रश्न विचारीत होता. खाणावळ जवळ आली.

'त्या दुकानासमोर आमची खाणावळ आहे. द्या घागर. मी पुढं जाते व सांगते की, एक गि-हाईक आणलं आहे. म्हणजे उशीर झाल्याबद्दल तो रागावणार नाही.' लिली म्हणाली.

त्याने घागर दिली. लिली पुढे चालली. हा हळुहळू पाठीमागून जात होता. लिली घरात शिरली.

'कार्टे किती वेळ झाला ग? पाणी आणायला पाठवलं तर तिकडेच बसलीस. थांब, तुला आज चौदावं रत्‍न
दाखविलंच पाहिजे. बरेच दिवसांत चाबकाचा मार नाही मिळाला तुला. म्हणून अवदसा आठवली असेल, नाही का? थांब. हे आटपू दे. मग घेते तुझा समाचार. बघतेस काय अशी? ठेव घागर व ती ताटं दे नीट पटकन घासून.'

खाणावळीणबाईंचा तोंडपटटा सुरू झाला.


'मी एक गि-हाईक आणलं आहे. त्यांना रस्ता माहीत नव्हता. म्हणून उशीर झाला.' लिली भीतभीत बोलली.
'कुठं आहे गि-हाईक?'

'हा मी इथं आहे. माझ्यामुळं मुलीला उशीर झाला. मी या गावात प्रथमच आलेला. रात्रीची वेळ. रस्त्यांचा परिचय नाही. ती मुलगी माझ्यासाठी हळुहळू येत होती. तिला रागावू नका.' तो वाटसरू म्हणाला.

'बसा आपण. विश्रांती घ्या. आता जेवण तयार होईल.' खाणावळवाला म्हणाला.

'लिले, त्या दुकानातून सामान आलं. तू जातानाच निरोप सांगितलास वाटतं? बरं केलंस. उरलेले पैसे कुठं आहेत? अधेली ना दिली होती? चार आणे दुकानदारास दिलेस, उरलेले चार आणे कुठं आहेत? अग बोल की गधडे? चार आणे कुठं आहेत? पावली का होती? पाण्यात का पाडलीस? विधुळी पोर आहेस अगदी. तिकडे आई गेली मरून. तू आमच्या मानेस बसली आहेस. खायला घाला दिवसातून तीनदा आणि असे पैसे हरव. अग कुठं आहेत चार आणं? थांब, आज तुझं भरलं आहे. हे पाहुणे जेवून उठू देत. मग काढते सारं.'

'लिले, तुझा तो परकरबिरकर नीट झाड. असेल खिशात नाही तर -' आमचा पाहुणा आत येत म्हणाला.


गरीब बिचारी लिली. परकरात का कोठे पावली अडकते? परंतु तिने आपला परकर चारचारदा झटकला, तो काय आश्चर्य? एकदम पावली वाजली.

'अगं, ती बघ. ती बघ पडली. कुठं अडकली होती बरं!' तो आमचा पाहुणा म्हणाला.

लिली परकर झाडीत असता त्या पाहुण्यानेच आपल्याजवळचे नाणे पटकन् फेकले होते. खाणावळवाल्याने ते पाहिले होते. हे गि-हाईक श्रीमंत व उदार दिसते असे त्याला वाटले. तो बायकोजवळ जाऊन काही कुजबुजला. लिलीला याच्यादेखत बोलू नकोस असे त्याने सांगितले असावे; कारण मालकीणबाईचा सूर एकदम बदलला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel