क्रांतीचे प्रकरण संपले. सरकारने कोणासही शिक्षा केल्या नाहीत. कारण गोळीबाराने अनेक लोक आधीच मेले होते. कामगारांना पगारवाढ मिळाली. शेतकर्यांवरचे सावकारी अन्याय कमी झाले. कर्जाची चौकशी करण्याचे ठरले. जे न्याय्य कर्ज ठरेल त्यातील निम्मे बाद करायचे ठरले. सावकारांनी कांगावा केला, परंतु सरकारने लक्ष दिले नाही. कामगारांच्या संघटनेस मान्यता दिली गेली. शहाणपणाने सरकारने सूडबुध्दी स्वीकारली नाही. नाही तर सारे राष्ट्र पेटले असते.
दिलीपची जखम बरी होत आली होती. वालजी व लिली रोज जात असत. लिली दिलीपची जखम बांधी. सारे करी. तिचा हात हलका होता.
'पोरीला सारं येतं. किती मनापासून करते!' दिलीपचे आजोबा म्हणाले.
'ती आहेच गुणी.' वालजी म्हणाला.
लिली व दिलीप एकमेकांवर प्रेम करीत होती. कधी गाडीतून दोघे फिरायला जात. वालजीला वाटले की, यांचे लग्न होणे बरे. एके दिवशी तो दिलीपच्या आजोबांकडे गेला. दिलीप व लिली बाहेर गेली होती.
'काय लिलीचे आजोबा?'
'काय दिलीपचे आजोबा?'
दोघांना हसू आले. शेवटी हिय्या करून वालजीने प्रश्न काढला.
'दिलीपचं आता लग्न केलं पाहिजे.'
'माझ्याही मनात तेच येतं.'
'लिलीवर त्याचं प्रेम आहे.'