लिली आता सासरी राहते; परंतु ती रोज वालजीकडे जाते. त्यांना जेवण नेते. त्यांच्याजवळ बोलत बसते. कधी कधी बरोबर दिलीपही असतो; परंतु वालजीचे दुर्दैव अद्याप सरले नव्हते.

एके दिवशी दिलीपकडे एक गृहस्थ आला.

'काय पाहिजे आपणाला?' दिलीपने विचारले.

'तुमच्याशीच खाजगी बोलायचं आहे,' तो नवखा म्हणाला.

'चला, वर बसू.'

दोघे वर गेले. एका खोलीत बसले. तो नवखा बोलू लागला.

'महाराज, ज्या मुलीजवळ तुम्ही लग्न लावलं, तिचा तो पालनकर्ता एक खुनी दरोडेखोर आहे. कुठून आणले त्यानं लाख रुपये? अहो, मी त्याला ओळखतो, कारण मी त्याच जातीचा! परंतु पुढं मागं तुमच्यावर आरोप, आळ येऊ नये, तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून मी आज धोक्याची सूचना देण्यासाठी आलो आहे. त्या वालजीचा संबंध सोडा. त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. तुमच्या पत्‍नीस जाऊ देऊ नका. अहो, तो जो पोलिस अंमलदार आत्महत्या करून मेला म्हणून प्रसिध्द झालं, त्यानं आत्महत्या नाही केली. त्याला या वालजीनं समुद्रात ढकललं. त्या धक्क्यावर दोघे उभे होते. यानं दिलं ढकलून! ज्या गाडीतून रात्री तुम्हाला आणण्यात आलं, त्या गाडीत हे दोघे होते. दोघे गाडीतून उतरून चांदण्यात फिरत गेले. वालजीनं त्या अंमलदाराला फसवून धक्क्याकडे नेलं व केलं ते कृष्णकृत्य! महाभयंकर माणूस!' तो नवखा सांगत होता.

'खरं का हे?' दिलीपने विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel