'तुम्ही तिची आई वाटतं?' मोठया मुलीने विचारले.
'हो.'
'छान आहे तुमची मुलगी. आमच्यात तर इतकं सुंदर कोणी नाही. तुम्ही झाडाखाली राहाता? तुमचं इथंच घर?'
'हो. या झाडाखाली घर.'
'थंडी लागेल, पाऊस लागेल, परंतु उन्हाळयात बरं. नाही?'
'येता की नाही घरी?' ती आई दारातून पुन्हा म्हणाली. ती सारी मुले गेली. लिलीची आई लिलीला घेऊन झाडाखाली बसली. तिच्या मनात किती तरी विचार येत होते. शेवटी तिने त्या खाणावळवाल्या बाईकडे काही तरी विचारण्याचे ठरविले. ती तिच्याकडे गेली.
'कोण पाहिजे तुम्हाला? ते तर बाहेर गेले आहेत.' खाणावळवाली बाई म्हणाली.
'मला तुमच्याशीच आधी काही बोलायचं आहे.'
'काय बरं?'
'मी एक गरीब मुलगी आहे. तुम्ही जणू माझ्या आईसारख्या. मी संकटात आहे. मला कोणी आधार नाही. मी व ही माझी मुलगी दोनच आम्ही. या मुलीचं कसं पालन-पोषण करावं याची चिंता वाटते. मी काही मोलमजुरी करीन, तर हिला कुठं ठेवू? मघा माझी मुलगी तुमच्या मुलांच्या खेळात रंगून गेली. तुमच्या मुलांनीही तिला आपल्यात घेतलं. माझ्या मनात विचार आला की, माझ्या मुलीला तुमच्याकडेच ठेवावं, तुमची इतकी मुलं आहेत त्यांत ती वाढेल. तिच्यासाठी निराळं फार काही करायला नको. मी तिच्यासाठी दर महिना पाच रुपये पाठवत जाईन. दर साल एक वाढवीत जाईन. मध्येच जास्त कमी लागलं तरी पाठवीन. तुम्ही तिला वाढवा, शाळेत घाला, शिकवा. ती जसजशी वाढेल तसतशी मी रक्कमही वाढवीन. मुलीची जात, पोलकं, परकर सारं लागतं. ठेवाल का तुमच्याकडे? कराल का या मातेवर दया?' लिलीच्या आईने डोळयांत पाणी आणून विचारले.
'मी काय सांगणार? ते घरी आले म्हणजे त्यांना विचारीन व मग काय ते कळवीन. माझ्या मते ठेवायला हरकत नाही. इतकी मुलं आहेत त्यांत आणखी एक. भरल्या गाडयाला मुठीचं का ओझं होतं? पाहीन विचारून हो.'