'लिले, बेटा, तिकडे पडवीत बस. यांचं जेवण झालं, म्हणजे मग आपण सारे बसू. आधी हिरी, छबी, माणकी बसल्या आहेत. तू जरा मागून बस हो.' खाणावळीणबाई म्हणाली.
लिली पडवीत जाऊन बसली. खाणावळीणबाईच्या मुलींच्या बाहुल्या तेथे होत्या. लिलीने त्यातली एक बाहुली उचलली. त्या बाहुलीजवळ ती खेळू लागली. त्या बाहुलीला पायांवर थोपटी, पोटाशी धरी. लिली आनंदली होती.
इतक्यात त्या मुली जेवून आल्या.
'हे ग काय लिलटले? माझी का बाहुली घेतलीस? तुझे ते घाणेरडे हात! ते लावलेस ना? आई, आमच्या बाहुल्या हिनं घेतल्या बघ. मळवलीन् माझी बाहुली.' हिरी ओरडून म्हणाली.
'तुला तिथं पडवीत बस म्हटलं तर बाहुल्या उचलल्यास. आज झालं आहे काय तुला? तुझी आई असती तर दिल्यान् असत्या तिनं तुला बाहुल्या. आई नाही, बाप नाही. कोण देणार खेळणी? ठेव ती बाहुली खाली. ही उष्टी उचल व शेण लाव.' त्या मुलींची आई म्हणाली.
खाणावळीसमोर मोठे दुकान होते. त्या दुकानात खेळणीही होती. एक मोठे थोरले कचकडयाचे बाळ सजवून तेथे ठेवलेले होते. त्या गावात इतके महाग बाळ कोण घेणार? परंतु तो प्रवासी पाहुणा एकदम त्या दुकानात गेला.
'या बाळाची काय किंमत?' त्याने विचारले.
'पाच रुपये साहेब!' दुकानदार म्हणाला.
पाहुण्याने पाचाची नोट दिली. दुकानदार आश्चर्यचकित झाला. ते बाळ घेऊन तो पाहुणा आला.
'लिल्ये, जरा इकडे ये.' त्याने हाक मारली.
'जा. ते हाक मारताहेत. विचार काय हवं ते.' मालकीण म्हणाली. लिली आली. 'हे घे बाळ तुला खेळायला.' तो म्हणाला.
'मला? मला नको इतकं छान बाळ.' ती म्हणाली.
'अग घे की. ते देताहेत तर नको म्हणते! अडाणी आहे अगदी. घे ते.' मालकीणबाई बाहेर येऊन म्हणाली.
'खरंच का मला देता?'