लताचा अंत्यसंस्कार विधी झाला होता. प्रकाश हरवून पाच दिवस झाले होते. काल सांगितल्याप्रमाणे पोलिस वसंतरावांच्या घरी आले होते. प्रकाश हा खासदार मोहनरावांचा मुलगा असून त्यांनी त्याला वसंतला दत्तक दिले होते अशी खबर पोलिसांना लागली होती. वसंतने हे सत्य त्यांच्यापासून लपवून ठेवल्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी ते वसंतरावांच्या घरी आले होते. त्यांना हवी असलेली माहिती त्यांना मिळाल्यावर ते तिथून निघून गेले.

प्रकाश बेपत्ता असल्यामुळे आणि लताच्या मृत्युमुळे वसंतरावांचे आता कशातच लक्ष लागत नव्हते. जेवण आणि झोपही ते आता जवळजवळ विसरलेच होते. कोणी आग्रह केल्याशिवाय ना ते जेवत ना झोपत. अशी त्यांची स्थिती झाली होती. आपल्या तब्येतीकडे नीट लक्ष न दिल्याने त्यांना आता अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यांच्या घरी गेल्या पाच दिवसांमध्ये घडलेल्या दु:खद घटनांचा त्यांच्या मनावर इतका गंभीर परिणाम झाला होता की,त्यांना आता कशातच रस वाटत नव्हता. त्यांचा भाऊ संदीप आणि वहिनी शैला त्यांची व रियाची नीट काळजी घेत होते. गेल्या चार दिवसांपासून ते त्यांची काळजी घेण्यासाठी तेथेच थांबले होते आणि तसेही वसंतरावांना आता त्यांचाच आधार उरला होता.

संध्याकाळ झाली होती. वसंतराव एका खुर्चीत बसून झोपलेल्या रियाकडे एकटक बघत होते. कदाचित त्यांना आता तिच्या भविष्याची चिंता जास्तच सतावत होती. तितक्यात घराची बेल वाजली. शैलाने दरवाजा उघडला. घराबाहेर खासदार मोहनराव उभे होते. त्यांनी आपल्याबरोबरच्या इतर माणसांना इमारतीखाली त्यांची वाट बघत उभे राहण्यास सांगितले आणि ते एकटेच घरात शिरले.

वसंत आणि मोहन हे लहानपणापासूनचे मित्र होते. ते दोघेही एकाच गावातले असून, एकाच शाळेत सोबत शिकलेले होते. मोहन लहानपणापासूनच खूप हुशार होता. त्यांच्या गावातील शाळा, प्राथमिक शाळा होती. दोघांचे प्राथमिक शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर, मोहन त्याच्या पुढील शिक्षणासाठी त्याच्या काकांबरोबर शहरात आला. वसंतला पुढे शिक्षण घ्यायचे नसल्यामुळे तो मात्र गावातच राहिला. पण त्यामागचे मुख्य कारण म्हणजे वसंतचा कोणीही नातेवाईक शहरात रहात नसल्यामुळे त्याला गावातच राहावे लागणार होते. काही वर्षे गावात काढल्यावर नंतर वसंतही शहरात आला. वसंतचे तेथे कोणीच ओळखीचे नसल्यामुळे, त्याच्याही राहण्याची सोय मोहनच्या काकांनी, त्यांच्याकडेच केली होती.

आज मोहनची, मोठा उद्योगपती, खासदार व समाजसेवक अशी ओळख होती. वसंतही त्याच्याच एका उद्योगात त्याचा भागीदार म्हणून काम करत होता. राजकारणात आल्यापासून मोहन खूप व्यस्त झाला होता. त्यामुळे हल्ली त्याची आणि वसंतची फारशी भेट होत नसली,तरी अधून मधून त्यांचे फोनवर एकमेकांशी बोलणे होत असे.

मोहनची दोन्ही मुले परदेशात शिक्षणासाठी गेली होती. दोन वर्षापूर्वी त्याच्या दुसऱ्या पत्नीचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यामुळे तोही आता एकटा पडला होता. त्यामुळे तो आपला बराचसा वेळ राजकारणासाठी खर्च करुन स्वत:ला व्यस्त ठेवत असे. त्याची पत्नी वारल्यापासून फक्त वसंतच असा व्यक्ती होता, ज्याच्याबरोबर तो आपल्या मनातील भावना मुक्तपणे व्यक्त करू शकत होता. आजवर इतकी वर्ष त्यांनी एकमेकांच्या सहवासात घालवली होती. त्यामुळे वसंतचे त्याच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. राजकारणात आल्यापासून आता जरी मोहनच्या आजूबाजूला, त्याच्याबरोबर बऱ्याच लोकांचा जमाव असला, तरी पण वसंतशी त्याचे असलेले मैत्रीचे नाते...काही वेगळेच होते. ज्याची तुलना इतर लोकांशी होऊच शकत नव्हती.

बराच वेळ झाला, तरी खासदार साहेब आले नाहीत म्हणून मोहन बरोबर आलेल्या माणसांपैकी एक व्यक्ती वसंतच्या घरी आली. मोहनने त्याला “दोन मिनिटात येतो.” असे सांगून इमारतीखाली उभे राहून वाट बघण्यास सांगितले.

प्रकाशला वसंतकडे दत्तक दिल्यापासून, मोहनला त्याची काळजी करण्याची कधी गरजच वाटली नव्हती. वसंत त्याचा उत्तम सांभाळ करेल याची त्याला खात्री होती. पण आता पाच दिवसापासून प्रकाश बेपत्ता असल्यामुळे त्याला आता मात्र प्रकाशची फारच चिंता वाटू लागली होती. कितीही झाले तरी तोच प्रकाशचा जन्मदाता पिता होता. त्यामुळे त्याला, प्रकाशची वाटणारी चिंता स्वाभाविकच होती. प्रकाशला शोधण्यासाठी त्याने आतापर्यंत आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. परंतू अद्याप प्रकाशचा ठाव-ठिकाणा पोलिसांना कळला नव्हता. त्यामुळे तो फारच अस्वस्थ झाला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel