ती एक फार मोठी प्रयोगशाळा होती. तिच्या भव्यतेमुळे त्या ठिकाणाला मानवी शरीराचा संग्रह केलेला कारखानाही म्हटले जाऊ शकले असते. मानवी शरीरातील जवळ-जवळ सर्वच भाग त्या प्रयोगशाळेत उपलब्ध होते. प्रयोगशाळेच्या सुरुवातीच्या भागात मोठ-मोठ्या भांड्यामध्ये रक्त भरुन ते उकळण्याचे काम सुरु होते. जवळपास पंधरा फुट उंचीचे आणि तीस फुट रुंदीचे व्यास असलेले भव्य टोप भल्यामोठ्या दगडी चुलीवर ठेवले होते. त्यातील रक्त ढवळण्यासाठी दहा-बारा माणसे सतत कार्यरत होती. चुलीच्या बाजुलाच काही अंतरावर त्या टोपांच्या समांतर उंचीच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. त्या भिंतीच्या टोकावर उभे राहून, टोपामध्ये उकळणारे रक्त लांबूनच, व्यवस्थित ढवळता येईल अशी सोय करण्यात आली होती. त्या भव्य चुलींमध्ये लाकडांचे तुकडे टाकुन ती चुल पेटवण्यात आली होती. चुलीतील लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता. ती लाकडे चुलीच्या तोंडापाशी पुढे  सरकवण्यासाठी आणि आग नियंत्रित करण्यासाठी चुलीच्या खालच्या बाजुला काही माणसे कार्यरत होती. चुलीच्या प्रचंड मोठ्या अग्नीमुळे तेथील तापमान भरपूर वाढले होते.

त्या प्रयोगशाळेत तो पुढे-पुढे चालू लागला. तशी त्याच्या दृष्टीस रक्त उकळणाऱ्या भल्या मोठ्या चुलींची रांगच दिसू लागली. तो त्या चुलींची संख्या मोजू लागला. एका रांगेत जवळ-जवळ वीस-बावीस चुली होत्या. तशाच चुलींच्या दहा रांगा तिथे त्याच्या दृष्टीस पडल्या. चुलींच्या रांगा संपल्यावर बाजूच्या दुसऱ्या एका भव्य जागेत माणसांची हाडे जमा करण्यात आली होती. त्यात मानवी कवटी, हाता-पायांची हाडे, बरगड्या अशा प्रकारे प्रत्येक हाडे वेगळी करुन ठेवलेली होती. त्या ठिकाणी हाडांचे मोठे ढिग साचलेले होते. पुढे काही ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने त्या हाडांचा चुरा केला जात होता. तर काही ठिकाणी त्यांना विशिष्ट आकार देऊन त्यापासून भांडी बनवण्याचे काम सुरु होते. त्याच ठिकाणी मानवी दातांचाही मोठा ढिग पडला होता. यंत्रामार्फत त्या दातांनाही गोल आकार देऊन, त्यांच्या मधोमध एक लहान छिद्र पाडण्याचे काम सुरु होते.

बाहेर उकळणाऱ्या रक्ताचा वास सर्वत्र पसरलेला होता. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी फार वेळ व्यतित करणे असहनीय झाले. पटापट पावले टाकत तो पुढील दुसऱ्या एका खोलीत गेला. त्या ठिकाणी हाडांचा चुरा कसल्यातरी चिकट द्रव्यपदार्थात मिसळून त्या मिश्रणातून टेबल,खुर्च्या, कपाटे बनवली जात होती. त्याच्या थोडे पुढे मानवी केसांपासून चटया तयार केल्या जात होत्या. त्याच्या पुढील खोल्यांमधील चित्र तर अजूनच भयानक होते. तिथे माणसाचे हृदय वितळवले जात होते आणि त्यापासून जॅमसारखा पदार्थ तयार केला जात  होता. ते वितळविण्याकरीता भल्या मोठ्या दगडी चुलीचा वापर करण्यात आला होता. अशा प्रकारे त्या प्रयोगशाळेतील प्रत्येक ठिकाणी मानवी शरीरातील कुठल्या न कुठल्या अवयवाच्या सहाय्याने काही ना काही बनवण्याचे काम सुरु होते.

ते ठिकाण, तसे अंधारमय होते. पण ठिकठिकाणी पेटवलेल्या मशालीमुळे समोरचे दिसण्याइतका प्रकाश तिथे निर्माण करण्यात आला होता. तेथील सर्व माणसे आपापली कामे व्यवस्थित करत होती. पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट मात्र विचित्र होती. ती म्हणजे त्यांची भाषा. ते कुठल्यातरी सांकेतिक भाषेतून एकमेकांशी बोलत होते. हे त्यांना बघताच क्षणी त्याने ओळखले होते. आतापर्यंत त्याने तो सर्व परिसर बघितला होता. म्हणून तो आता तेथून बाहेर पडला.

बाहेर पडल्यावर त्याच्या दृष्टीस मोठ-मोठे डोंगर दिसू लागले. पण ते त्याच्यापासून थोडे दूर असल्याचे त्याच्या लक्षात आले. तरीही त्याची त्या डोंगराच्या पलीकडे जाण्याची इच्छा झाली. डोंगराच्या पलिकडे नक्कीच कोणतेतरी गाव असावे जिथे माणसांची वस्ती असेल असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो त्या डोंगराच्या दिशेने चालू लागला. त्या दिशेने चालत असताना वाटेत त्याला एक मोठी नदी लागली. कसलाही विचार न करता तो त्या नदीत उतरला आणि किनाऱ्याच्या दिशेने पोहू लागला. बऱ्याच वेळानंतर तो किनारा गाठण्यास यशस्वी झाला. किनाऱ्यावर आल्यावर त्याने आपली अंगवस्त्रे सुकण्यासाठी एका झाडाच्या फांदीवर सुकत टाकले. ‘वस्त्रे सुकेपर्यंत थोडा वेळ आराम करावा,’ म्हणून तो एका झाडाला टेकून झोपला. काही वेळाने जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या भल्या मोठ्या नदीमधून तो पोहत आला होता ती नदी आता त्याच्या दृष्टीस पडत नव्हती. त्या ठिकाणावरुन अचानक नष्ट झालेल्या नदीमुळे तो विचारमग्न झाला होता. त्याने आपली सुकलेली वस्त्रे परिधान केली आणि ज्या ठिकाणी नदी होती त्या ठिकाणी त्याने जाऊन बघितले तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. नदीचे पात्र तिथेच होते पण त्यातील सर्व पाणी आटले होते. हे सर्व घडणे कसे काय शक्य आहे? याच विचारात तो पुन्हा डोंगराच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने त्याला डोंगराचा पायथा दिसू लागला. त्यामुळे तो थोडा सुखावला.

डोंगराच्या पायथ्याशी एक भली मोठी गुहा होती. त्या गुहेत कोणीतरी राहत असावे असे त्याला वाटले. तो त्या गुहेत शिरल्या बरोबर त्याच्या दृष्टीस हाडांपासून बनवलेली विविध हत्यारे दिसली. त्याचप्रमाणे हाडांपासून बनवलेली विविध भांडी तिथे व्यवस्थित लावून ठेवली होती. त्या भांड्यांवर नक्षीकाम सुद्धा केलेले होते. काही भांडी झाकून ठेवलेली होती. त्यातील एक भांडे त्याने उघडून बघितले तसा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने लगेच त्या भांड्याचे झाकण लावून टाकले. त्या भांड्यामध्ये लाल रंगाचा एक घट्ट पदार्थ ठेवलेला होता. माणसाच्या हृदयापासून बनवलेला तो एक प्रकारचा जॅम होता. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. हा पदार्थ त्याच प्रयोगशाळेतील असावा असा त्याने अंदाज बांधला. आणि पुन्हा तो पुढे चालू लागला. तितक्यात त्याची नजर तिथल्या एका कपाटाकडे गेली. ते कपाटही हाडांचा चुरा आणि दुसऱ्या कसल्यातरी मिश्रणापासून बनविलेले होते. हे लगेच त्याच्या लक्षात आले. त्याने ते कपाट उघडून पाहिले पण ते आतून पूर्णपणे रिकामे होते. तो कपाटाच्या दारावरील कोरलेल्या नक्षीवरुन हात फिरवत होता. तितक्यात त्याची नजर कपाटाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका लहान छिद्राकडे गेली. त्या छिद्राजवळच त्यात जाईल तितक्याच आकाराची, हाडांपासून बनवलेली एक नळी ठेवलेली होती. त्याने ती नळी त्या छिद्रामध्ये टाकली तशी कपाटाच्या आतल्या बाजुची भिंत खाली सरकू लागली. क्षणार्धात त्याच्यासमोर एक गुप्त भुयार उघडे झाले. त्याने त्या भुयारात डोकावून पहिले तिथे भरपूर अंधार होता म्हणून त्याने त्या गुहेतीलच एक मशाल आपल्या हाती घेतली. ती मशाल त्याने भूयारासमोर धरली तसे त्याला भुयारातील खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या दिसू लागल्या.

हळू-हळू एक-एक पायरी उतरल्यानंतर त्याच्या पायाला जमिनीचा स्पर्श झाला. अत्यंत विशाल जागा होती ती. हे सर्व कोणी निर्माण केले असावे? हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. मशालीच्या उजेडात हळू-हळू पावले टाकत तो पुढे-पुढे चालला होता. त्याच्या दृष्टीस सर्वत्र मोकळा परिसर दिसत होता. काही वेळाने त्याच्या दृष्टीस पुढे, एका ठिकाणी काहीतरी असल्याचे अस्पष्ट दिसू लागले. म्हणून तो त्या दिशेने चालू लागला.

त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने माणसांची प्रेतं एका रांगेत एकमेकांवर रचून ठेवलेली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही प्रेताच्या शरीरावर कुठल्याही प्रकारची वस्त्रे नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी इतकी प्रेतं असूनही त्यांचा जरासुद्धा वास येत नव्हता. माणसाच्या मृत्युनंतर काही तासांमधेच त्याचे शरीर सडण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते. पण तिथे मात्र असे काहीच घडत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तिथली प्रत्येक प्रेतं अगदी जशीच्या तशीच होती. ती किती काळापासून तिथे असतील? हा प्रश्न त्याच्या मनात घुटमळू लागला. ज्यावेळी तो त्या प्रेतांच्या ढिगाऱ्याजवळ गेला त्यावेळी एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती; ती म्हणजे प्रत्येक प्रेताच्या मानेवर शस्त्रापासून केलेला एक-एक वार दिसत होता. याचाच अर्थ, त्या सर्व माणसांना मारण्यात आले होते. त्यामुळे आता त्याला त्या ठिकाणाची भीती वाटू लागली. इथे जर कोणी आपल्याला बघितले, तर ते आपल्यालाही मारतील असे त्याला वाटू लागले.

पण तरीही, त्याला ती संपूर्ण जागा बघायची होती. म्हणून तो त्या प्रेतांचे ढिग असलेल्या जागेतून मार्ग काढत पुढे-पुढे चालू लागला. पुढे गेल्यावर त्याला कसलेतरी आवाज एकू येऊ लागले. म्हणून तो आवाजांचा वेध घेऊन त्या दिशेला चालू लागला. त्याच्या समोर त्याला एक दरवाजा दिसत होता. त्याने आपल्या हातातील मशाल खाली जमिनिवर, भिंतीला टेकवून नीट करून ठेवली आणि मग त्याने हळूच तो दरवाजा आतल्या दिशेला ढकलला आणि दरवाज्याच्या आतल्या खोलीत डोकावून पाहिले. खोलीच्या आतमध्ये काही माणसे दिसू लागली. ती माणसेसुद्धा प्रयोगशाळेतील माणसांप्रमाणेच दिसत होती. त्यांनी वस्त्र म्हणून शरीराभोवती जनावरांची कातडी  गुंडाळलेली होती. ती माणसे देखील आपापसात सांकेतीक भाषेत बोलत होती. पण काही वेळा बोलताना त्यांच्या तोंडातून विचित्र आवाज बाहेर काढत होते. त्या ठिकाणी उजेडासाठी ठिक-ठिकाणी मशाली पेटवलेल्या होत्या. त्यामुळे आतले सर्व काही त्याला स्पष्ट दिसत होते.

तेथे आतमध्ये एका बाजूला, मारुन ठेवलेल्या माणसांच्या शरीरातून रक्त वेगळे केले जात होते. पण त्याच्या माहितीप्रमाणे असे करणे केवळ अशक्यच होते. कारण मृत्युनंतर शरीरातील रक्त गोठ्ण्यास सुरुवात होते. पण इथले सर्व मृतदेह जणू आताच त्यातील प्राण निघून गेल्यासारखे ताजे टवटवीत दिसत होते. त्या मृतदेहामधून रक्त बाहेर काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जात होता. शरीरातील हृदय काढून झाल्यावर, ते त्या शरीराला, तिथेच असलेल्या एका मोठ्या हौदात टाकत होते. एका बाजुला मृतदेह त्या हौदात टाकण्याचे काम सुरु होते, ‘म्हणजेच त्या हौदामध्ये मानवी शरीर वितळवून, त्यातील हाडे विलग करणारा कुठलातरी पदार्थ नक्कीच असणार.’ याची त्याला आता खात्री झाली. वर काढलेल्या हाडांच्या सांगाड्यातून कवटी, दात, हाता-पायांची हाडे आणि बरगड्या हे भाग वेगवेगळे करुन ते सर्व भाग पोत्यात भरुन ठेवण्यात येत होते. त्यामुळे यासर्व गोष्टींचा संबंध त्या प्रयोगशाळेशी असून मानवी शरीराचे हे सर्व भाग तिथेच पोहोचवले जात असावेत असा अंदाज त्याने बांधला.

घामाघुम होऊन प्रकाश झोपेतून जागा झाला. इतके भयंकर विचित्र स्वप्न बघितल्याने तो भयभीत झाला होता. त्याच्या उशाशी तांब्यात ठेवलेले पाणी तो गटागटा पिऊ लागला. तितक्यात मोहनराव त्या खोलीत आले आणि त्यांच्या  पाठोपाठच अजून दोन व्यक्ती त्याच्या समोर आल्या. त्या दोन व्यक्ती म्हणजे..... त्याचे आजोबा.....आणि नागतपस्वी...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel