प्रकाश ध्यानधारणेसाठी बसला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो ध्यानातच होता. हल्ली त्याची ध्यानधारणा दिवसेंदिवस वाढतचं चालली होती. अगदी तीन-चार दिवशी बिना अन्न-पाण्याशिवाय एकाच ठिकाणी ध्यानाच्या अवस्थेत बसण्याचे तंत्र त्याला फार आधीपासूनच अवगत होते. घरात कुणीही ध्यानधारणा करत नसतानाही प्रकाशला मात्र लहानपणापासून ध्यान करण्याची सवय लागली होती.

तो ज्यावेळी तीन-चार वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याच्या मनात ध्यानाविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झाले होते. त्यासाठी निमित्त म्हणजे  लहानपणी एकदा तो त्याच्या आई-वडिलांबरोबर त्याच्या गावी गेला होता, त्यावेळी त्याने तिथल्या मंदिरात एका व्यक्तीला ध्यानात बसलेले पहिले. त्याचक्षणी त्याच्या मनात ध्यानाविषयी कुतूहल निर्माण झाले. तीन-चार वर्षांचा मुलगा एक दिवशी कोणालातरी ध्यानधारणा करताना बघतो आणि त्यापासून प्रेरणा घेऊन तोच मुलगा पुढे कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ध्यानातील समाधी अवस्थेपर्यंत पोहोचतो. हे सर्व विलक्षणच होते. वर्षानुवर्षे ध्यानधारणा करणाऱ्या साधकालाही समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी बरीच वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागतात, आणि इतके करूनही त्यापैकी कित्येकांना साधी मनःशांती देखील प्राप्त करता येत नाही, पण प्रकाश मात्र फार अल्पावधीतच म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षीच समाधी अवस्थेपर्यंत पोहोचला होता. हे कुणालाही सांगून सत्य वाटणारे नव्हते.

सुरुवातीच्या काळात वसंतराव आणि लताला त्याची फारच चिंता वाटायची. तसे लहानपणापासूनच प्रकाशचे वागणे बोलणे त्याच्या वयातील मुलांपेक्षा थोडे वेगळे होते. तो अभ्यासात हुशार असला तरी तो सदैव त्याकडे दुर्लक्ष करत असे. इतर मुलांप्रमाणे त्याला खेळण्यातही फारसा रस नव्हता. शांतपणे बसून ध्यान करणे, एकटेच बसून तासंतास कसलातरी विचार करत बसणे जणू हाच त्याचा छंद होता. त्यामुळे कित्येकदा तो आपल्यातच हरवलेला  असायचा. त्यामुळे इतरांकडे त्याचे लक्ष नसायचे. थोडक्यात त्याला बाहेरच्या जगातील कुणाशीच फारसे घेणे-देणे नसायचे.

आपण कसे दिसतो? इतरांशी कसे वागतो? इतरांचे आपल्याबद्दलचे मत काय असावे? या गोष्टींचा त्याने लहानपणापासूनच कधी विचार केल नव्हता. किंबहुना इतरांचे विचारही अनेकदा त्याला न पटणारे होते. त्यामुळे तो आपल्या मनाप्रमाणेच वागत असे. जीवनातील प्रत्येक गोष्टीबाबत त्याचे स्वत:चे स्वतंत्र असे काही विचार होते आणि तत्वही ठरलेली होती. अनेकदा तो त्याचप्रमाणे वागत असे. काही वेळा त्याचे वागणे एखाद्या लहान मुलाप्रमाणे असायचे, तर काही वेळा ते एखाद्या अनुभवी प्रौढ व्यक्तीप्रमाणे असायचे.

 प्रकाशला लहानपणापासूनच आपण ह्या जगातले नाही आहोत, आपण कोणीतरी वेगळेच आहोत असे वाटायचे. लहानपणापासूनच त्याला गुढ गोष्टींमध्ये प्रचंड आकर्षण वाटायचे. आपल्या विश्वाव्यातीरिक्त अजूनही अनेक गुढ विश्व अस्तित्वात आहेत आणि त्यात आपल्यापेक्षा कितीतरी वेगळ्या असलेल्या जीवांचे अस्तित्व आहे. असे त्याला सारखे वाटायचे. अशा प्रकारच्या गूढ गोष्टींमध्ये रमणारे त्याचे मन कधीही भौतिक गोष्टींमध्ये रमायला तयार नसायचे. त्याचे वागणे आणि त्यामागची त्याची भूमिका इतरांनाच काय पण वसंत आणि लतालाही समजणे अशक्य होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel