गोष्ट पहिली

धन आहे तर सर्व आहे, धनाविना जीवन व्यर्थ आहे

विष्णुशर्मा त्या तीन राजकुमारांना म्हणाला, 'तुम्ही राहात असलेल्या या महिलारोप्य नगरात फार वर्षापूर्वी 'वर्धमानक' नावाचा एक वैश्यपुत्र राहात होता. एके रात्री तो अंथरुणात पडला असता त्याच्या मनात विचार येऊ लागले, आपल्याला जरी पैशांची कमतरता नसली तरी, आहे या संपत्तीत समाधान मानण्यात काय अर्थ आहे ? म्हटलंच आहे ना?

न हि तद्विद्यते किंचिद्यदर्थेन न सिद्ध्यति ।

यत्‍नेन मतिमांस्तस्मादर्थमेकं प्रसाधयेत् ॥

(जे पैशानेही साध्य होत नाही, असे या जगात काहीही नाही. म्हणून बुद्धिवंताने प्रयत्‍न करून फक्त पैसाच मिळवावा.)

या पैशात केवढं प्रचंड सामर्थ्य आहे ?

यस्यार्थास्तस्य मित्राणि यश्यार्थास्तस्य बान्धवाः ।

यस्यार्थाः स पुमांल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः ॥

(ज्याच्याकडे पैसा असतो त्याला मित्र असतात, ज्याच्यापाशी पैसा असतो त्याला नातेवाईक मिळतात, ज्याच्याजवळ पैसा असतो तोच या जगात श्रेष्ठ पुरुष मानला जातो आणि ज्याच्याकडे पैसा असतो तोच विद्वान म्हणून समजला जातो.)

त्याचप्रमाणे -

इह लोके हि धनिनां परोऽपि स्वजनायते ।

स्वजनोऽपि दरिद्राणां सर्वदा दुर्जनायते ॥

(या जगात श्रीमंत लोक जरी परके असले, जरी त्यांना आपले मानले जाते आणि दरिद्री जरी आपले नातेवाईक असले, तरी त्यांना वाईट समजून दूर लोटले जाते.)

तसेच-

पूज्यते यदपूज्योऽपि यदगम्योऽपि गम्यते ।

वन्द्यते यदवन्द्योऽपि स प्रभावो धनस्य च ॥

(एखादा श्रीमंत माणूस अपूजनीय असला तरी त्याची पूजा केली जाते. ज्याच्याकडे चुकूनही जाऊ नये, असा जरी तो असला तरी त्याच्याकडे जाणे योग्य ठरते, आणि तो वंदन करण्याच्या दृष्टीने कितीही अपात्र असला तरी त्याला वंदन केले जाते.)

शिवाय -

गतवयसामपि पुंसां येषामर्था भवन्ति ते तरुणाः ।

अर्थेन तु ये हीना वृद्धास्ते यौवनेऽपि स्युः ॥

(ज्यांच्यापाशी धन आहे अशी माणसे तरुंणासारखी वागतात, तर धनहीन तरुण असले तरीही ते वृद्धांसारखे वागतात. )

पण ती संपत्ती कोणत्या तर्‍हेने मिळवायची ? कारण, संपत्ती मिळवायचे एकूण सहा मार्ग आहेत.

१) भिक्षा मागणे

२) राजाची सेवा

३) शेती,

४) विद्यादान

५) सावकारी,

६) व्यापार.

त्यापैकी भीक मागून धन मिळविणे हे लाजिरवाणे असते. राजाची सेवा तशी वाईट नसते, पण त्याची मर्जी केव्हा फिरेल याची शाश्वती नसते. शेती पिकणं न पिकणं, हे सर्वस्वी पावसाच्या लहरीवर अवलंबून असतं. विद्यादान करणे चांगले, पण विद्यार्थी जे काही त्यांच्या इच्छेला येईल तो गुरूला देत असल्याने, त्या अल्पस्वल्प उत्पन्नावर गुरूला आपले आयुष्य बहुधा दारिद्र्यातच घालवावे लागते. सावकारीत शरीराला कष्ट कमी, पण सावकाराचा पैसा कर्ज म्हणून दुसर्‍याच्या हाती जातो आणि त्या ऋणकोने हात वर केले की, धनको पार बुडून जातो. त्या दृष्टीने व्यापार हाच सर्वात उत्तम. त्यातून इथल्या वस्तू बाहेरगावी व बाहेरगावच्या वस्तू इथे आणून विकण्याचा व्यापार तर फारच फायदेशीर.

मनात हा विचार येताच, त्या वर्धमानाने आपल्या गावात निर्माण होणार्‍या वस्तु मथुरेस, व मथुरेस तयार होणार्‍या वस्तू आपल्या गावी आणून विकण्याचे ठरविले. त्याप्रमाणे आपल्या गाडीला संजीवक व नंदक नावाचे दोन बैल जुंपून, विकावयाचा माल गाडीत भरपूर भरून, व बरोबर दोन-तीन सेवक घेऊन तो नजिकच्या शुभ मुहूर्तावर मथुरेच्या मार्गाला लागला.

वाटेत लागलेल्या घनदाट वनातून वाहणार्‍या यमुना नदीच्या काठाकाठाने बैलगाडी चालली असता, तिला जुंपलेल्या संजीवक बैलाचा पाय मुरगळला. त्याला पुढे चालणे अशक्य झाले. मग वर्धमानाने आपल्या दोन सेवकांना त्या बैलाच्या सेवेसाठी मागे ठेवले आणि जवळच्याच एका गावातून एका नवा बैल विकत घेऊन त्याला गाडीला जुंपले, व उरलेल्या सेवकासह त्याने मथुरेस प्रयाण केले.

त्याने मागे ठेवलेले दोन सेवक जेमतेम दोन दिवस त्या संजीवक बैलाची सेवा करीत राहिले, पण 'वाघ-सिंहानी भरलेल्या या अरण्यात राहणे धोक्याचे आहे,' असा विचार करून, ते सेवक, त्या बैलाला तसाच सोडून धन्याला गाठण्याकरिता मथुरेस गेले व त्याला खोटेच म्हणाले, 'धनी, आपला संजीवक बैल कैलासवासी झाला. तो आपला अतिशय लाडका असल्याने, आम्ही त्याला विधियुक्त अग्नी दिला.' परंतु शुद्ध हवा, पाणी आणि पाचूसारखा हिरवेगार कोवळे गवत मिळाल्यामुळे, संजीवक थोड्याच दिवसात पूर्ण बरा झाला व इकडे तिकडे फिरू लागला. त्याची प्रकृतीही चांगली धष्टपुष्ट झाली. म्हटलंच आहे ना ? -

अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं सुरक्षितं दैवहतं विनश्यति।

जीवत्यनाथोऽपि वने विसर्जितः कृतप्रयत्‍नोऽपि गृहे विनश्यति ॥

(दैवानेच ज्याचे रक्षण केले आहे, असा एखादा जरी रक्षणरहित असला, तरी तो सुरक्षित राहतो आणि ज्याच्यावर दैवच उलटले आहे, असा एखादा कितीही जरी रक्षणात असला तरी तो नाश पावतो. तसेच वनात सोडून दिलेला एखादा अनाथ प्राणी जिवंत राहतो आणि जो जगावा म्हणून प्रयत्‍नांची शर्थ चालू असते, असा घरात असलेला माणूस मरून जातो !)

अशा तर्‍हेने काही दिवस निघून गेल्यानंतर एके दिवशी त्या वनाचा राजा पिंगलक सिंह हा पाणी पिण्यासाठी यमुनातीरी चालला असता, त्याच्या कानी संजीवक बैलाची डुरकाळी पडली. पिंगलकाने आयुष्यात कधी बैल पाहिलेला नसल्याने, किंवा त्याची डरकाळीही ऐकलेली नसल्याने, तो आवाज कानी पडताच तो घाबरला व पाणी न पिताच दूरच्या एका वडाच्या बुंध्यापाशी आपल्याभोवती मंत्र्यांचे व अनुयायांचे संरक्षक कोंडाळे करून घेऊन बसला.

पिंगलक सिंहाच्या एकेकाळच्या मंत्री असलेल्या एका कोल्ह्याला करटक व दमनक नावाचे दोन मुलगे होते. ते दोघेही पित्याच्या पश्चात पिंगलकाचे मंत्री बनले होते, पण पिंगलकाने त्यांना - काही कारणास्तव - मंत्रीपदावरून दूर केले होते. यमुनेवर गेलेला आपला राजा, हा पाणी न पिताच भयभीत मनःस्थितीत वटवृक्षाकडे परत गेल्याचे पाहून दमनक करटकाला म्हणाला, 'दादा, पिंगलकमहाराज पाणी न पिताच भयग्रस्त मनःस्थितीत का बरं परतले ? आपण त्यांच्याकडे चौकशी करून येता का?'

करटक म्हणाला, 'बाबा रे, आपल्याला या नसत्या उठाठेवी हव्यात कशाला ? करवतीने अर्धवट कापलेल्या लाकडात सुतारांनी ठोकलेली पाचर कारण नसता काढायला गेलेल्या त्या वानराची गत काय झाली, ते तुला ठाऊक आहे ना ?'

'ती गोष्ट काय आहे?' असे दमनकाने विचारताच करटक सांगू लागला-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel