गोष्ट चोवीसावी

विनाशाची वेळ जवळ येते, तेव्हा प्राण्याला दुर्बुद्धी आठवते !

या 'महिलारोप्य' नगराच्या सीमेवरील एका वटवृक्षावर जे नानातर्‍हेचे पक्षी राहात होते, त्यामध्ये 'लघुपतनक' नावाचा एक कावळाही राहात होता.

एके दिवशी तो कावळा अन्नाच्या शोधार्थ त्या झाडावरून उडून कुठेतरी चालला असता, त्याला एक काळाकभिन्न फासेपारधी वटवृक्षावरील पक्ष्यांना पकडण्यासाठीच चालला असावा, हे हेरून, लघुपतनक परत त्या वृक्षाकडे गेला व त्या ठिकाणी असलेल्या सर्व पक्ष्यांना उद्देशून म्हणाला, 'पक्षीबांधवहो, एक फासेपारधी इकडे येत आहे. तो जवळपासच्या मोकळ्या जमिनीवर जाळे पसरील व त्यावर तांदूळ फेकील. ते तांदूळ खायला आपण गेलो की जाळ्यात अडकू व प्राणांस मुकू. तेव्हा ते तांदूळ खाण्यासाठी त्या जाळ्याकडे जाऊ नका.' लघुपतनकाचे हे बोलणे पुरे होते न होते, तोच तो पारधी तिथे आला आणि जमिनीवर जाळे पसरून व त्यावर तांदूळ फेकून तो दूरच्या झुडपाआड लपून बसला. लघुपतनकाने सर्वांना अगोदरच सावध केले असल्याने, त्या वटवृक्षावरील एकही पक्षी त्या तांदूळाच्या वाटेस गेला नाही.

परंतु थोड्याच वेळात चित्रग्रीव नावाचा एक कबुतरांचा राजा आपल्या अनुयायांसह त्या बाजूने उडत चालला असता, त्याची व त्याच्या अनुयायांची नजर त्या तांदळांच्या दाण्यांकडे गेली. वास्तविक चित्रग्रीव हा बुद्धिमान होता. 'या वनात तांदळाचे दाणे सहजासहजी दृष्टीस पडणार नाहीत,' हे त्याला कळत होते. शिवाय लघुपतनकानेही त्यालाव त्याच्या अनुयायांना सावध केले होते. तरीही राजा चित्रग्रीव व त्याचे अनुयायी ते दाणे खायला गेले आणि त्या जाळ्यात अडकले ! म्हटलेच आहे ना ?-

पौलस्त्य कथमन्यदाहरणे दोषं न विज्ञातवान्

रामेणापि कथं न हेमहरिणस्यासंभवो लक्षितः ।

अक्षैश्चापि युधिष्ठिरेण सहसा प्राप्तो ह्यनर्थः कथं

प्रत्यासन्नविपत्तिमूढमनसां प्रायो मतिः क्षीयते ॥

(दुसर्‍याची बायको पळविणे ही वाईट गोष्ट असल्याचे रावणाला कळत नव्हते का ? सोन्याचे हरीण असू शकत नाही हे श्रीरामाच्या लक्षात कसे काय आले नाही ? त्याचप्रमाणे जुगार खेळून युधिष्ठिरासारख्याने एकाएकी अनर्थ कसा काय ओढवून घेतला ? वस्तुस्थिती अशी आहे की, आपत्ती जवळ आल्यामुळे संभ्रमित झालेल्यांची बुद्धी बहुधा काम देईनाशी होते.)

जाळ्यात अडकताच ती कबुतरे जेव्हा भयाने आरडाओरडा करू लागली, तेव्हा त्यांचा राजा चित्रग्रीव त्यांना म्हणाला, 'बाबांनो, असे घाबरून जाऊ नका. प्रसंग आनंदाचा असो वा दुःखाचा असो, सूज्ञांनी आपले मन स्थिर ठेवले पाहिजे. म्हटलेच आहे ना ? -

उदये सविता रक्तः रक्तश्चास्तमने तथा ।

सम्पतौ च विपत्तौ च महतामेकरूपता ॥

(सूर्य उगवताना जसा लाल असतो, तसाच तो मावळतानाही लालच असतो. जे थोर असतात ते काळ वैभवाचा असो व विपत्तीचा असो - मनाची वृत्ती सारखीच ठेवतात.)

राजा चित्रग्रीव पुढे म्हणाला, 'बाबांनो, आता सर्वांचे बळ एकवटून आपण एकाच वेळी उडू या, म्हणजे या जाळ्यासकट आपल्याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाता येईल.'

चित्रग्रीवाच्या सूचनेप्रमाणे त्याच्या सर्व अनुयायांनी जोर करून त्या जाळ्यासह एकदम उड्डाण केले व ते सर्व हवेतून दूर दूर जाऊ लागले.'ही कबुतरे आता लवकरच एकमेकांना दोष देऊन आपपासांत भांडू लागतील व खाली येऊन आपल्या हाती सापडतील,' अशा अपेक्षेने तो पारधीही त्यांच्या पाठोपाठ धावू लागला. पण घडले उलटेच. ती कबुतरे दूरवर जात अखेर दिसेनाशी झाली. मग तो पारधी निराश झाला व परतीची वाट चालता चालता स्वतःशी म्हणाला-

न हि भवति यन्न भाव्यं भवति च भाव्यं विनाऽपि यत्‍नेन ।

करतलगतमपि नश्यति यस्य हि भवितव्यता नास्ति ॥

(जे घडायचे नसेल, ते कधीच घड्त नाही, आणि जे घडायचे असेल ते प्रयत्‍न न करताही घडून येते. ज्याचे दैव अनुकूल नसते, अशाच्या हाती जरी एखादी वस्तू आली, तरी ती नाश पावते. )

पारधी दिसेनासा झाल्यावर त्या पक्ष्यांनी चित्रग्रीवाला, 'महाराज, आता आपल्याला या जाळ्यातून कोण मुक्त करील?' असा प्रश्न केला असता तो म्हणाला -

सर्वेषामेव मर्त्यानां व्यसने समुपस्थिते ।

वाङ्‌मात्रेणापि साहाय्यं मित्रादन्यो न सन्दधे ॥

(संकटे ओढवली असता, सर्वच मर्त्य जीवांना त्यांच्या मित्राशिवाय अन्य कोणी साध्या शब्दानेही मदत करीत नाही.)

चित्रग्रीव पुढे म्हणाला, 'इथून थोड्याच अंतरावर राहणारा हिरण्यक नावाचा माझा एक उंदीर मित्र 'उंदराचा राजा' आहे. तो एका किल्लेवजा टेकाडातील बिळात राहतो. तो आपल्याला निश्चित सहाय्य करील.'

'पण किल्ल्यात राहण्यामागचा त्याचा हेतु काय?' असा प्रश्न एका अनुयायाने केला असता, चित्रग्रीव म्हणाला, राजाला स्वतःच्या व आपल्या राज्याच्या रक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यांचे महत्त्व फार आहे. म्हटलेच आहे -

शतमेकोऽपि सन्धत्ते प्राकारस्थो धनुर्धरः ।

तस्मात् दुर्गं प्रशंसन्ति नीतिशास्त्रविदो जनाः ॥

(किल्ल्याचा आश्रय ज्याला आहे, असा एक धनुर्धारीसुद्धा शंभरांना पुरा पडतो. म्हणून राजनीतीत पारंगत असलेले लोक किल्ल्याची प्रशंसा करतात.)

याप्रमाणे माहिती सांगून राजा चित्रग्रीव आपल्या अनुयायांसह हिरण्यक नावाच्या उंदराकडे गेला व त्याला हाका मारू लागला.

चित्रग्रीवाचा आवाज ऐकताच हिरण्यक आपल्या बिळातून मोठ्या आनंदाने बाहेर आला, पण ते दृश्य पाहून म्हणाला, मित्रा चित्रग्रीवा, वास्तविक मित्राचे आपल्या घरी आगमन ही आनंदाची जणू पर्वणी ! पण तुला व तुझ्या अनुयायांना अशा स्थितीत पाहून मला त्या आनंदाचा आस्वादही घेता येत नाही ! मित्रा, हे असे कसे घडून आले ?'

घडलेली हकीकत त्याला सांगून चित्रग्रीवाने त्याला जाळे कुरतडून आपल्याला व आपल्या अनुयायांना मुक्त करण्याची विनंती केली.

हिरण्यक प्रथम चित्रग्रीवाला मुक्त करायला गेला असता, चित्रग्रीव म्हणाला, 'हिरण्यका, तू अगोदर माझ्या सर्व अनुयायांना मुक्त कर आणि सर्वांच्या शेवटी मला सोडव. तू जाळे कुरतडून मला मुक्त केलेस आणि नेमक्या वेळी तुझे दात पडले, किंवा त्या दुष्ट पारध्याने इकडे येऊन आम्हाला गाठले, तर मी सुटेन, परंतु या माझ्या अनुयायांची गत काय होईल ? तेव्हा राजा या नात्याने, स्वतःपेक्षा स्वतःच्या अनुयायांची व सेवकांची काळजी घेणे हे मी माझे कर्तव्य समजतो.' त्याच्या या थोर मनोवृत्तीचे कौतुक करून, हिरण्यकाने आपल्या धारदार दातांनी ते जाळे कुरतडले आणि त्या सर्व कबुतरांना व शेवटी राजा चित्रग्रीवालाही बंधमुक्त केले. मग चित्रग्रीवाने हिरण्यकाचा निरोप घेतला आणि तो आपल्या अनुयायांसह घराकडे निघून गेला. तर हिरण्यक स्वतःच्या किल्ल्यातील बिळात घुसला. या जगात मित्राचं महत्त्व किती आहे, हे स्पष्ट सांगणारं एक सुभाषित असं आहे -

मित्रवान्‌ साधयत्यर्थान्‌ दुःसाध्यानापि वै यतः ।

तस्मान्मित्राणि कुर्वीत समानान्येव चात्मनः ॥

(ज्याला मित्र आहेत, तो असाध्य अशा गोष्टीही साध्य करून घेऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या तोलाचे मित्र जोडावे. )

हा सर्व प्रकार, त्या कबुतरांमागोमाग उडत आलेला व जवळच्याच एका वृक्षाच्या फांदीवर बसून राहिलेला लघुपतनक कावळा पाहात होता. तो मनात म्हणाला, 'हिरण्यकासारखा मित्र लाभणे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. समजा, चित्रग्रीवावर आला, तसाच प्रसंग भविष्यकाळात आपल्यावर आला, तर याचा उपयोग होईल. कुणी कितीही समर्थ असला, तरी वेळी अवेळी दुसर्‍याची मदत घेण्याचा प्रसंग येतोच. सागरालासुद्धा भरतीसाठी चंद्राचे सहाय्य घ्यावे लागतेच ना ? मनात असा विचार करून लघुपतनक हिरण्यक राहात होता त्या बिळाच्या तोंडाशी गेला व आपण कोण आहोत ते सांगून त्याला हाका मारू लागला.

पण बिळात बसल्या बसल्याच हिरण्यक त्याला म्हणाला, 'तू माझा जन्मजात वैरी असताना मी बाहेर कसा येऊ ?'

लघुपतनकाने विचारले, 'अरे हिरण्यका, तुझी व माझी आजवर एकदाही भेट झालेली नसताना, मी तुझा वैरी कसा काय झालो ?'

बिळातूनच हिरण्यकाने उत्तर दिले, 'लघुपतनका, वैर हे दोन प्रकारचे असते. पहिले स्वाभाविक वैर व दुसरे प्रासंगिक वैर. प्रासंगिक वैर मात्र तात्पुरत्या उत्पन्न झालेल्या वैराचे कारण दूर होताच नाहीसे होते. पण स्वाभाविक वैर मात्र जन्मापासून जीवनाचा अंत होईपर्यंत टिकून राहाते. साप व मुंगूस, पाणी व अग्नी, देव व दानव, कुत्रा व मांजर, सिंह व हत्ती, त्याचप्रमाणे सज्जन व दुर्जन यांच्यातील वैर स्वाभाविक असते. या जोड्यांमध्ये कुणीही कुणाचा अपराध केलेला नसला, तरी त्यांच्यात वैराचे अग्निकुंड अखंड धगधगत असते. कावळे व उंदीर यांच्यातले वैरसुद्धा असे स्वाभाविक असल्यामुळे, मी तुझ्याकडे कसा येऊ ?'

'तुझ्यासारख्या बुद्धिमान् व बहुश्रुत सज्जनाला मारण्याचा, माझ्या मनात चुकूनही विचार येणार नाही.' अशी शपथपूर्वक ग्वाही लघुपतनकाने दिली असता हिरण्यक त्याला म्हणाला, 'बाबा रे, एकतर शत्रूंनी घेतलेल्या शपथांवर विश्वास ठेवण्याइतका मी मूर्ख नाही आणि दुसरे म्हणजे ज्याच्या मनावर अज्ञानाचे आवरण असते, तो प्राणी विद्वान् व बहुश्रुत अशा सज्जनालाही मारायला मागेपुढे पाहात नाही. आद्य व्याकरणकार पाणिनी यांचे प्राण एका सिंहाने घेतले, मीमांसाकार जैमिनींना एका हत्तीने ठार केले, तर छंदशास्त्राचा आद्यप्रणेता असलेल्या पिंगलमुनींना एका मगरीने गिळंकृत केले. या थोर पुरुषांनी त्या प्राण्यांचे असे कोणते अपराध केले होते, म्हणुन त्यांना अशी देहांताची सजा मिळावी ?'

हिरण्यकाचा हा बिनतोड सवाल ऐकून थक्क झालेला लघुपतनक त्याला म्हणाला, 'मित्रा, तुझे म्हणणे खरे आहे. पण तू माझ्यावर एवढी तरी कृपा करशील का ? मी अधुनमधून तुझ्याकडे येऊन, तुझ्या बिळाबाहेर बसत जाईन आणि तू मात्र बिळातच बसून माझ्याशी बोलत जा. थोरांचा प्रत्यक्ष सहवास न लाभता, त्यांच्या केवळ विचारांचा जरी लाभ झाला, तरी जीवन उजळून जाते. हेही तुला मान्य नसेल, त्यांच्या केवळ विचारांचा जरी लाभ झाला, तरी जीवन उजळून जाते. हेही तुला मान्य नसेल, तर मात्र मी आत्ताच इथे आमरण उपोषणाला बसून माझा देहान्त करून घेईन.' लघुपतनक याप्रमाणे बोलल्यावर मात्र हिरण्यकाच्या मनात त्याच्याविषयी विश्वास उत्पन्न झाला आणि तो बिळाबाहेर आला व त्याच्याशी मनमोकळेपणाने गप्पागोष्टी करू लागला. हळूहळू त्या दोघांच्या परिचयाचे रूपांतर दाट मैत्रीत झाले. म्हटलेच आहे ना ?-

आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् ।

दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम् ॥

(दुर्जनांची मैत्री दिवसाच्या पूर्वाधातील सावलीप्रमाणे सुरुवातीस मोठी पण हळूहळू लहान होत जाते, तर सज्जनांची मैत्री ही दिवसाच्या उत्तरार्धातील सावलीप्रमाणे प्रारंभी लहान, पण क्रमाक्रमाने मोठी होत जाणारी म्हणजे पहिलीपेक्षा भिन्न असते.)

अशा तर्‍हेने त्यांच्या गाठीभेटी रंगू लागल्या असता, एके दिवशी लघुपतनक हिरण्यकाकडे आला व डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, 'मित्रा, आता सुरू झालेल्या दुष्काळामुळे आजुबाजूच्या गावांतले लोक जेवणापूर्वीचे 'काकबळी' देईनासे झाले आहेत. त्यामुळे माझी उपासमार होऊ लागली आहे. त्यातून लोकांना धान्य मिळेनासे झाल्यामुळे कुठलाही पक्षी दिसताच, त्याला मारून ते खाऊ लागले आहेत. स्वतः मी केवळ सुदैवाने अशाच एका प्रसंगातून वाचलो. तेव्हा इथून बर्‍याच दूर असलेल्या वनात एक मोठे सरोवर असून, तिकडे दुष्काळ नसल्याने - ते पाण्याने तुडुंब भरलेले असल्याचे माझ्या कानी आले आहे. त्या सरोवरात राहात असलेल्या 'मंथरक' नावाच्या कासवाची व माझी दाट मैत्री असल्याने व तिकडे गेल्यास अन्नपाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने, मी त्याच्याकडे जायचे ठरविले अहे.'

एक दीर्घ उसासा सोडून हिरण्यक म्हणाला, 'मित्रा, सध्या तू मला कारण विचारू नकोस, पण मलाही या जागेचा उबग आला आहे. तुझ्यासंगे त्या परदेशी आल्यावर मला जर तिथे मानाने जगता येण्याची शक्यता असली तर मीही तुझ्याबरोबर तिकडे आलो असतो.'

लघुपतनक म्हणाला, 'मित्रा, अरे तूही मजसंगे तिकडे यावेस, या उद्देशाने तर मी तुला ही गोष्ट सांगायला आलो. त्यातून तुझ्यासारख्या विद्वावानाला व गुणवंताला तिकडे मानाने जगण्यात अडचण ती काय ? म्हटलेच आहे ना -

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन ।

स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥

(विद्वत्ता व राजेपण यांची बरोबरी कधीच करता येत नाही. राजाला केवळ त्याच्याच देशात मान मान मिळतो, पण विद्वान् हा सर्वत्र सन्मानिला जातो.)

याप्रमाणे बोलणे झाल्यावर हिरण्यक उंदराला पाठीवर घेऊन, तो लघुपतनक कावळा दूरच्या सरोवरात राहणार्‍या आपल्या मित्राकडे - मंथरक कासवाकडे -उडत गेला.

ते दोघे तिथे जाताच, मंथरकाने त्यांचे मोठ्या प्रेमादराने स्वागत केले व हे पाहुणे कोण व यांना तू पाठीवरून का आणलेस, असे लघुपतनकाला विचारले.

लघुपतनक म्हणाला, 'मित्रा मंथरका, या माझ्या मित्राचं नाव आहे हिरण्यक. मी या माझ्या मित्राला पाठीवरून नव्हे, तर डोक्यावरून घेऊन यायला हवे होते ? इतका हा गुणी व ज्ञानी आहे. अरे, याच्या गुणांबद्दल मी काय व किती म्हणून सांगू ? एक वेळ पर्जन्यधारा किंवा आकाशातल्या तार्‍यांची गणती करता येईल, पण या माझ्या मित्राच्या ठिकाणी असलेल्या गुणांची मोजदाद करता येणार नाही. स्वदेशात राहायचा उबग आला, म्हणूनच केवळ हा माझ्यासंगे इकडे आला.'

'या माझ्या नव्या थोर मित्राला स्वदेशात राहण्याचा उबग का बरे आला?' असा प्रश्न मंथरकाने केला व लघुपतनकानेही आग्रह केला म्हणून हिरण्यक त्यांना ती गोष्ट सांगू लागला-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel