गोष्ट बावीसावी
मूर्खाला काम सांगावे व स्वतःवर संकट ओढवून घ्यावे.
'एका राजापाशी एक भलेमोठे वानर होते. त्याच्यावर त्याचा अतिशय जीव असल्यामुळे तो जिथे जाई, तिथे त्याला आपल्यासंगे नेई. एकदा दुपारच्या जेवणानंतर राजा झोपला असता, ते वानर त्याला पंख्याने वारा घालू लागले. तेवढ्यात एक माशी आली व राजाच्या छातीवर बसली.
'त्या वानराने तिला हाकलून द्यावे व तिने पुन्हा लगेच त्याच्या छातीवर येऊन बसावे, असे अनेक वेळा झाल्यावर, ते वानर तिच्यावर भलतेच चिडले. त्याने त्या माशीला ठार मारण्यासाठी जवळच असलेली नंगीतलवार हाती घेऊन, तिच्यावर एवढ्या जोराने प्रहार केला की, त्या एका घावासरशी त्या राजाचे दोन तुकडे झाले ! म्हणून ज्याला बरेच दिवस जगायचे असेल, त्याने मूर्खांच्या सहवासात कधीही राहू नये.
'दमनका, माझे तर ठाम मत आहे की, एक वेळ सुज्ञ शत्रू परवडला, पण मूर्ख अशा मित्राच्याच नव्हे, तर भावाच्याही वार्याला उभे राहू नये. ज्याने परक्या व्यापार्यांचे प्राण वाचविण्यासाठी आत्मबलिदान केले, त्या चोरट्या पण सूज्ञ ब्राह्मणाची गोष्ट माझ्या विधानाला पुष्टी देणारी आहे.'
'ती गोष्ट काय आहे बुवा?' असा प्रश्न दमनकाने मोठ्या उत्कंठाने विचारला असता करटक म्हणाला, 'त्याचं असं झालं-