गोष्ट अडु्सष्ठावी

सोनेरी स्वप्नांचे साम्राज्य खोटे, वेळ येताच भ्रमाचा भोपळा फुटे.

एका शहरात 'स्वभावकृपण' नावाचा एक कंजूष ब्राह्मण होता. दररोज मिळणार्‍या भिक्षेचे धान्य तो दळून त्याचे पीठ करी आणि स्वतः मुद्दाम कमी भाकर्‍या खाऊन, वाचविलेले पीठ तो एका मडक्यात साठवी. त्याने ते मडके भिंतीतल्या खुंटीला एका दोरखंडाने टांगून ठेवले होते. त्याच्याखाली ठेवलेल्या बाजेवर तो रात्री उताणा झोपे आणि झोप येईपर्यंत त्या मडक्याकडे एकटक नजरेने बघत असे.

एके रात्री नित्याच्या सवयीनुसार त्या मडक्याकडे बघत राहिला असता, मनात म्हणाला, 'हे मडके आता पिठाने भरत आले आहे. ईश्वरकृपेने जर आता दुष्काळ पडला, तर धान्याचे भाव कडाडतील आणि या घडभर पिठाचे मला शंभर रुपये सहज मिळतील. मग त्या शंभर रुपयांच्या मी शेळ्या खरेदी करीन. त्या दर सहा महिन्यांनी व्यायला लागल्या, की माझ्याकडे शेळ्याच शेळ्या होतील. मग त्या शेळ्यांचे दूध व काही शेळ्या विकून जमलेल्या पैशात मी गाई-म्हशी व नंतर घोडे देईन. आणि शेळ्या, गाईम्हशी व नंतर घोडे यांच्या विक्रीवर धनवंत होऊन, चौसोपी वाडा बांधीन.

'त्यानंतर थोरामोठ्यांच्या मला सांगून येणार्‍या मुलींतून एक सुंदर व गुणी मुलगी निवडून तिच्याशी मी लग्न करीन आणि पहिला मुलगा झाला की, त्याचे नाव मी 'सोमशर्मा' असे ठेवीन.

'पुढे तो मुलगा रांगू लागला की, घोड्याच्या पागेच्या बाजूला असलेल्या एकांतात मी ग्रंथ वाचत असता, मला त्रास द्यायला येईल. मग मी बायकोला आज्ञा फर्मावीन, 'अगं तू तुझ्या मुलाला घेऊन जा.' यावर ती मला म्हणेल, 'मुलगा काही माझा एकटीचा नाही. तो तुमचाही आहे.' तिचे ते उलटे उत्तर ऐकून मी तिच्यावर वचक बसविण्यासाठी तिला अशी जोरदार लाथ मारीन...' विचारांच्या तंद्रीत त्या ब्राह्मणाने त्या पिठाने भरलेल्या घड्यालाच बायको समजून अशी जोराने लाथ मारली की, तो घडा फुटून त्यातले पीठ त्याच्या अंगावर पडले आणि त्याचे सर्व अंग गोरेभुरे झाले.'

ही गोष्ट सांगून चक्रधर म्हणाला, 'मित्रा सुवर्णसिद्धी, म्हणून मीही अशा निष्कर्षाला आलो आहे की, माणसाने स्वतःच्या भविष्याबद्दलची भलतीच स्वप्ने रंगवीत बसू नयेत.' त्याचे हे विधान ऐकून सुवर्णसिद्धी म्हणाला, 'या सर्वांच्या मुळाशी अती लोभी वृत्तीच असते. काही प्रमाणात असलेला लोभ वाईट नसतो, पण एकदा का माणूस त्या लोभाच्या आहारी गेला की, तो त्या चंद्रराजाप्रमाणे स्वतःचा नाश करून घेतो.' यावर 'तो कसा काय?' असा प्रश्न चक्रधराने केला असता सुवर्णसिद्धी म्हणाला, 'ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel