गोष्ट तेरावी

'प्रसंगाचे भान ठेवावे अन्यथा करून घ्यावे नुकसान.'

एका सरोवरात कंबुग्रीव नावाचे एक कासव राहात होते. त्याच सरोवरात जलविहार करण्यासाठी संकट व विकट या नावचे दोन हंसे येत व अधुनमधून त्या कासवाला देवादिकांच्या बोधप्रद गोष्टी सांगत. संध्याकाळ व्हायला आली; की ते हंस दूरच्या झाडांवर असलेल्या आपल्या घरट्यांकडे निघून जात.

एका वर्षी पाऊस न पडल्याने ते सरोवर आटले. तेव्हा ते हंस त्या कासवाला म्हणाले, 'कंबुग्रीवा, या तळ्यात आता बव्हंशी चिखलच उरला आहे. उद्या हे तळे कोरडे ठणठणीत झाले की, तुझे काय होणार, याची आम्हाला चिंता लागली आहे. आम्ही दोघे पाण्याने तुडुंब भरलेल्या दुसर्‍या एका दूरच्या सरोवराकडे जलविहारासाठी जाऊ शकतो. पण तू कुठे जाणार?'

ते कासव म्हणाले, 'मी कधीही उद्याची चिंता करीत नाही. पण तुम्हीच विषय काढलात म्हणून सांगतो- तुम्ही बेतशीर लांबीची एक काठी घेऊन या. मी त्या काठीचा मध्यभाग माझ्या तोंडात घट्ट पकडतो. मग तुम्ही दोघे त्या काठीचे एकेक टोक तुमच्या चोचीत घट्ट धरा व उडत उडत मला त्या भरपूर पाणी असलेल्या सरोवरात नेऊन सोडा.'

ते हंस म्हणाले, 'कंबुग्रीवा, तू युक्ती तर नामी शोधून काढलीस. पण आम्ही दोघे हवेतून उडत असताना, तू कुठल्याही परिस्थितीत तोंड मात्र उघडू नकोस. नाहीतर उंचावरून जमिनीवर जोरात आदळशील व फुकट मरून जाशील.' यावर ते कासव म्हणाले, 'मित्रांनो, माझी चिंता वहायला मी समर्थ आहे.' मग त्या हंसांनी एक काठी आणली. त्या कासवाने तिला मध्यभागी तोंडात घट्ट पकडली, आणि त्या हंसांपैकी प्रत्येकाने तिचे एकेक टोक चोचीत दाबून धरून आकाशात भरारी घेतली.

अशा तर्‍हेने ते हंस त्या कासवासह हवेतून उडत उडत एका गावावरून चालले असता, त्यांना त्या गावातल्या गावकर्‍यांनी पाहिले व ते गावकरी एकमेकांना विचारू लागले, 'काय हो, ते दोन हंस वाटोळे वाटोळे असे जे काहीतरी घेऊन चालले आहेत, ते काय असेल ?'

ते त्यांचे शब्द कानी पडताच त्या कासवाने, त्या हंसांना, 'मित्रांनो, त्या मूर्ख गावकर्‍यांना, मी कासव आहे ही साधी गोष्टसुद्धा कळू नये?' असे विचारण्याकरिता तोंड उघडले, त्याबरोबर - काठीचा आधार सुटल्यामुळे - ते कासव आकाशातून जमिनीवर कोसळून छिन्नविच्छिन्न झाले.' ही गोष्ट सांगून टिटवी टिटव्याला म्हणाली, 'त्या हंसांनी सांगितलेली हिताची गोष्ट सांगून दुर्लक्षिल्यामुळे त्या कासवाचा असा दारूण शेवट झाला.'

ती टिटवी पुढं म्हणाली, 'उद्याची चिंता आज कशाला करायची ? किंवा 'माझी चिंता वाहायला मी समर्थ आहे,' असे म्हणून बेसावध कधीही राहू नये. तसे बेसावध राहिल्यामुळे व आपले भविष्य नशिबावर सोपविल्यामुळेच त्या 'यद्भविष्य' नावाच्या माशावरती प्राण गमावण्याचा प्रसंग आला.'

'ती गोष्ट काय आहे?' असे त्या टिटव्याने मोठ्या उत्कंठेने विचारले असता, टिटवी म्हणाली, 'नीट ऐका-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel