गोष्ट चौदावी

नशिबाचे तट्टू पावलास अडे,

तर प्रयत्‍नाचा घोडा चौखूर दौडे.

एका सरोवरात अनागतविधाता, प्रत्युत्पन्नमती, व यद्भविष्य या नावाचे तीन मासे आपापल्या बंधुबांधवांसह राहात होते. त्यांच्यापैकी 'अनागतविधाता' हा मासा भविष्यकाळात संकट येण्याची शक्यता दिसताच, त्या संकटाऊन सहीसलामत सुटण्याची अगोदरच उपाययोजना करील 'प्रत्युत्पन्नमती' हा - आयत्या वेळी का होईना - युक्ती लढवून, आलेल्या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडण्यात यश मिळवी; तर तिसरा 'यद्भविष्य' हा मासा 'नशिबात असेल ते होईल' असे म्हणून स्वस्थ बसून राही.

एके दिवशी संध्याकाळी, काही कोळी, दुसर्‍या एका सरोवरातले मासे पकडून, ते तीन मासे रहात असलेल्या सरोवराच्या काठाने चालले असता, त्यांना ते मासे दिसले. ते पाहून ते कोळी आपापसांत म्हणाले, 'वाः ! केवढे मोठमोठे मासे आहेत या तळ्यात ! सध्या आपल्यापाशी भरपूर मासे असल्याने, व आता अंधारूनही लागले असल्याने, आपण उद्या सकाळी या तळ्याकडे येऊ व इथल्या माशांना पागवून नेऊ.'

कोळ्यांचे ते बोलणे एखाद्या वज्राघातासारखे कानी पडताच, अनागतविधाता मासा त्या सरोवरातल्या माशांना जवळ बोलावून घेऊन म्हणाला, 'ते कोळी जे बोलले ते ऐकालेत ना? तेव्हा आपण सर्वांनी आत्ताच्या आत्ता दुसर्‍या जवळच्या तळ्याच्या आश्रयाला गेले पाहिजे. नाहीतर ते कोळी उद्या सकाळी येतील आणि पाण्यात जाळी टाकून, खाण्यासाठी वा विकण्यासाठी आपणा सर्वांना पकडून नेतील. तेव्हा या संकटातून आपला बचाव करण्यासाठी अगोदरच उपाय योजलेला बरा. म्हटलंच आहे -

अशक्तैर्बलिनः शत्रोः कर्तव्य प्रपलायनम् ।

संश्रितव्योऽथवा दुर्गो नान्या तेषां गतिर्भवेत् ॥

(आपला शत्रु जर प्रबळ असेल, तर अशक्तांनी एक तर पळ काढावा किंवा एखाद्या किल्ल्ल्याचा आश्रय तरी घ्यावा. जीव वाचविण्याचा याशिवाय त्याला अन्य मार्ग नसतो.)

अनागतविधात्याचं हे बोलणं ऐकून प्रत्युत्पन्नमती म्हणाला, 'तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण आजच्या आज इथून त्या दुसर्‍या सरोवरात गेले पाहिजे. आता 'वाडवडील राहात आलेले हे ठिकाण सोडून दुसरीकडे कसे जायचे?' असा विचार आपल्यापैकी एखाद्याच्या मनात येईल, पण त्यात अर्थ नाही. कारण -

यस्यास्ति सर्वत्र गतिः स कस्मात्‍

स्वदेशरागेण हि याति नाशम् ।

तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणाः

क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति ।

(जो सर्व ठिकाणी - म्हणजे कुठेही - जाउ शकतो, त्याने मायेपोटी स्वदेशात राहून, स्वतःला का म्हणून बरबाद करून घ्यायचे ?' कशीही असली तरी ही वडिलांची विहिर आहे.' असे म्हणणार्‍या क्षुद्र लोकांवर त्या विहिरीचे खारे पाणी पीत राहण्याचा प्रसंग येतो.)

प्रत्युत्पन्नमतीने याप्रमाणे अनागतविधात्याच्या म्हणण्याला दुजोरा देताच यद्भविष्य नावाचा मासा खदखदून हसला व त्यांना म्हणाला, 'हे पहा, ते कोळी' उद्या येऊ' असे जरी म्हणाले असले, तरी नक्की येतीलच असे थोडेच आहे ? त्यातून समजा जरी ते आले तरी जय माशांचे आयुष्य संपत आलेले असेल, तेच त्यांच्या जाळ्यांत सापडणार व मरणार. अशा परिस्थितीत, वाडवडील रहात आलेले हे सरोवर सोडून मी तरी दुसरीकडे जाणार नाही.'

यद्भविष्य माशाचा ते सरोवर सोडून न जाण्याचा निर्धार पाहून अनागतविधाता व प्रत्युत्पन्नमती हे दोन मासे आपापल्य परिवारांसह लगेच दुसर्‍या दिवशी सकाळी त्या पहिल्या सरोवराकडे आले आणि जाळी पाण्यात टाकून, त्यांनी यद्भविष्य व त्याच्याबरोबर राहिलेले मासे पकडून त्यांना घरी नेले आणि मारून खाल्ले. नशिबावर अवलंबून रहाणार्‍यांवर असे दुर्धर प्रसंग ओढवतात.'

टिटवीने ही गोष्ट सांगताच टिटवा म्हणाला, 'प्रिये, तू सांगितलेली ही गोष्ट मला लागू नाही. मी काही नशिबावर विसंबून रहाणारा नाही. मी त्या खोडसाळ समुद्राला कोरडा, शुष्क करण्याचा निर्धार केला आहे.'

टिटवी म्हणाली, 'नाथ, रागाच्या भरात असे तोंडाला येईल ते बरळू नका. कुठे तो समुद्र आणि कुठे आपण यःकश्चित्‌ पक्षी !'

टिटवा म्हणाला, 'लाडके, त्या समुद्राच्या तुलनेत जरी मी लहान असलो, तरी दुर्दम्य उत्साह व उत्कट इच्छाशक्ती यांच्या बळावर ही असाध्य गोष्टही मी करून दाखवीन. आणि चोचीने थेंब थेंब पाणी पिता पिता त्या समुद्राला कोरडा ठणठणीत करून दाखवीन. म्हटलंच आहे ना ?-

हस्ती स्थूलतरः स चाड्‌कुशवशः किं हस्तिमात्रोऽङ्‌कुशः

दीपे प्रज्वलिते प्रणश्यति तमः किं दीपमात्रं तमः ।

वज्रेणापि हताः पतन्ति गिरयः किं वज्रमात्रो गिरिः

तेजो यस्य विराजते स बलवान् स्थूलेषु कः प्रत्ययः ॥

(हत्ती हा आकाराने बराच मोठा असून अंकुशाला वश होतो; वास्तविक हत्ती केवढा मोठा व अंकुश किती लहान ? दीप प्रज्वलित केला असता, अंधाराचा नाश होतो; तसं पाहिलं तर अंधारापुढे दिवा किती लहान ? व्रजाच्या आघाताने पर्वत कोसळतात; तसं पहाता पर्वताच्या आकारापुढे वज्र किती लहान ? तात्पर्य हेच की, ज्याच्या ठिकाणी तेज असते, तोच खरा बलवान. आकारमान हे काही सामर्थ्याचे प्रमाण नव्हे.)

यावर टिटवी म्हणाली, 'ते जरी खरं असलं, तरी ज्या सागरात गंगा, सिंधून यांच्यासारख्या शेकडो नद्या प्रतिक्षणी अमर्याद पाणी टाकत असतात, तो समुद्र पिऊन टाकण्याची प्रतिज्ञा करण्यात काही अर्थ आहे का? त्यापेक्षा तुम्ही तुमच्या लहानसान का असेनात - बर्‍याच मित्रांना आपल्या सहाय्यार्थ बोलवा आणि त्या समुद्राला धडा शिकवा. कारण बारीकसारीक गोष्टी एकेकट्या जरी कुचकामी ठरत असल्या, तरी जर का त्या एकत्र आल्या, तर त्यांचे संघटित सामर्थ्य, असाध्य वाटणारी गोष्टही साध्य करू शकते. म्हटलंच आहे ना ?-

बहूनामप्यसाराणां समवायो हि दुर्जयः ।

तृणैरावेष्ट्यते रञ्जुर्यया नागोऽपि बद्ध्यते ॥

(कमकुवत का असेनात, त्या गोष्टींचा मोठा समूह झाला की, त्यांना जिंकणे कठीण जाते. म्हणून तर गवताच्या काड्यांपासून बनविलेल्या दोरीने हत्तीलासुद्धा बांधून ठेवता येते.)

टिटवी पुढं म्हणाली, 'नाथ, म्हणूनच एक चिमणी, सुतारपक्षी, बेडूक व माशी यांच्यासारखे यःकश्चित्‌ प्राणी संघटितपणे एका उन्मत्त हत्तीच्या विरुद्ध गेल्यामुळे त्यांना त्या हत्तीचा नाश करता आला ना?'

'तो कसा काय ?' असा प्रश्न टिटव्याने विचारला असता टिटवी सांगू लागली-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel