गोष्ट एकसष्ठावी

अविचारासारखा शत्रु विरळा, ज्याने त्याला थारा दिला, तो बरबाद झाला.

एका गावी देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण, आपली पत्‍नी व एक लहान मूल यांच्यासह गरिबीत दिवस ढकलीत होता. त्याने एक मुंगूसही पाळला होता. त्या उभयता पतिपत्‍नींचा जर त्या मुंगुसावरही जीव होता, तर त्यांना आपला गोजिरवाणा मुलगा किती प्रिय असेल ? बाकी स्वतःचा मुलगा कसाही जरी असला तरी तो 'आपला' म्हणून आईबापांना प्रिय असतोच. म्हटलंच आहे-

कुपुत्रोऽपि भवेत् पुंसां ह्रदयानन्दकारकः ।

दुर्विनीतः कुरूपोऽपि मूर्खोऽपि व्यसनी खलः ॥

(आपला मुलगा वाईट असो, कुरूप असो, मूर्ख असो वा व्यसनी किंवा दुष्ट असो, लोकांना तो आनंददायीच वाटतो.)

एकदा आपले मूल निजले असता ती ब्राह्मणी, आपल्या पतीला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून पाणी भरण्यासाठी नदीवर गेली. ती जाताच, आपल्या मुलाला कोण काय करणार आहे, पण भिक्षा मागण्यासाठी आपण उशीरा बाहेर पडल्यास मात्र इतर भिक्षुक अगोदर भिक्षा मागून गेल्याने, आपल्या आजच्या भिक्षेवर परिणाम होणार आहे, असा विचार करून तोही घराबाहेर पडला. त्यानंतर लगेच एक सर्प त्या घरात शिरला व त्या निजलेल्या मुलाच्या दिशेने जाऊ लागला. त्या इमानी मुंगुसाच्या लक्षात तो धोका येताच, त्याने वाटेतच त्याच्याशी झुंज घेतली व त्याला चावचावून त्याची खांडोळी करून टाकली. मग थकलेला तो मुंगूस पुढल्या उंबरठ्यात बसून, आपल्या मालक-मालकिणीची वाट पाहू लागला.

पाणवठ्यावरून घरी येताच, जेव्हा त्या ब्राह्मणीने त्या मुंगुसाचे रक्ताने माखलेले तोंड पाहिले तेव्हा या दुष्टाने आपल्या बाळालाच खाल्ले, असा समज झाल्याने तिचे माथे भडकले व कमरेवरची पाण्याने भरलेली घागर त्याच्या मस्तकावर आदळून, तिने त्याला ठार केले. मग घरात जाताच जेव्हा तिला खरा प्रकार दिसला, तेव्हा तिला पश्चात्ताप झाला.

थोड्या वेळाने भिक्षेसह घरी आलेल्या पतीला घडलेला प्रकार सांगून, ती रडत रडत म्हणाली, 'मी सांगूनही, तुम्ही अधिक भिक्षा मिळविण्याच्या लोभाने घराबाहेर गेलात, म्हणूनच हा सारा प्रकार घडला. लोभ वाईट. या अतिलोभामुळेच ना, त्या ब्राह्मणाच्या मस्तकाभोवती चक्र फिरत राहिले ?' यावर त्या ब्राह्मणाने 'ते कसे ?' असे विचारले असता त्याची बायको म्हणाली, 'प्रकार असा झाला -

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel