गोष्ट बहात्तरावी

हेकटपणाचे वागणे म्हणजे स्वनाशाला आमंत्रण देणे.

एका सरोवरात एकच पोट पण दोन तोंडे असलेला 'भारुंड' नावाचा पक्षी राहात होता. एकदा समुद्रकिनारी तो हवेतून संचारत असता, त्याला पाण्यावर तरंगत असलेले एक सुंदर फळ दिसले. आपल्या एका तोंडाने ते फळ अर्धवट खाऊन झाल्यावर, तो पक्षी त्याच तोंडाने म्हणाला, 'वाः ! आजवर अनेक फळे खाल्ली पण असे अमृतमधुर फळ कधी माझ्या खाण्यात आले नव्हते.'

त्याचे ते बोलणे ऐकून त्याचे दुसरे तोंड त्याला म्हणाले, 'धनी, त्या अमृतमधुर फळाचा आस्वाद घेण्याची संधी तुम्ही फक्त त्याच तोंडाला दिलीत. ते फळ जर इतके गोड आहे, तर त्याचा उरलेला अर्धा भाग तुम्ही मला द्या ना?'

यावर तो पक्षी म्हणाला, 'अरे, कुठलीही वस्तू या तोंडाने खाल्ली काय, किंवा तू खाल्लीस काय, शेवटी ती वस्तू एकाच पोटात जाऊन शरीराच्या सर्व अवयवांना उपयोगी पडते ना? त्यातूनही हे फळ मी तुला दिले असते. पण मला ते माझ्या लाडक्या भारुंडीसाठी घरी न्यायचे आहे.' त्या भारुंड पक्ष्याच्या बोलण्याने ते दुसरे तोंड रागावले.

काही दिवसांनी तो पक्षी असाच घिरट्या घालत असता त्याला एक फळ दिसले. त्याच्याजवळ जाताच त्या दुसर्‍या तोंडाने ते पटकन् उचलले, पण ते विषारी असल्याचे त्याला आढळून आले. तेव्हा ते तोंड निराशेने म्हणाले, 'अरेरे ! माझे नशीबच वाईट ! त्या दिवशी त्या तोंडाला अमृततुल्य फळ मिळावे, आणि आज माझ्या वाट्याला मात्र हे फळ यावे ? मग असले दुर्दैवी जीवन जगण्यापेक्षा हे विषारी फळ खाऊन मेलेलेच काय वाईट ?'

यावर भारुंड त्या तोंडाला म्हणाला, 'अरे, असं करू नकोस. ते फळ जरी तू खाल्लेस, तरी तुझ्याबरोबर सर्व अवयवांना व शेवटी मलाही मरावे लागेल.' पण हे ऐकूनही ते तोंड आपला हेकटपणा सोडीना. त्याने ते फळ खाल्ले व त्यामुळे त्या भारुंड पक्ष्याला मरण आले.' ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी तिथून काढता पाय घेऊ लागला असता, चक्रधर त्याला म्हणाला, 'मी माझ्या हेकटपणाने हे संकट पाचारलं असलं तरी तू मला सोडून जाऊ नकोस.'

'माझी जर तुला मदत होण्यासारखी नाही, तर मग इथे उगाच कशाला राहू?'

'असं तू म्हणू नकोस. जगात कुणाची, कुणाला व कुठे मदत होईल ते सांगता येत नाही. म्हणून तर एक क्षुल्लक खेकडा एका ब्राह्मण तरुणाचे प्राणांतिक संकटातून रक्षण करू शकला ना ?' यावर 'ते कसे?' असा प्रश्न सुवर्णसिद्धीने केला असता, चक्रधर त्याला ती गोष्ट सांगू लागला-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel