गोष्ट सदोतिसावी

अविचाराने केलेली कृती, प्रसंगी घेई प्राणांची आहुती !

हरिदत्त नावाचा एक गरीब ब्राह्मण एके दिवशी आपल्या शेताच्या बांधावरील वृक्षाच्या छायेत बसला असता, त्याला जवळच असलेल्या वारुळातून बाहेर डोकावणारा, एक भला मोठा नाग दिसला. त्याला पाहून, 'हा आपल्या शेताची राखण करणारा 'क्षेत्रपाल' असावा' असे वाटून त्याने त्याला नमस्कार केला, व कुठून तरी वाटीभर दूध आणून व ती वाटी त्या नागापुढे ठेवून तो त्याला म्हणाला, 'हे क्षेत्रपाला, तू इथे राहतोस हे ठाऊक नसल्यामुळे माझे आजवर तुझ्याकडे दुर्लक्ष झाले. त्याबद्दल मला क्षमा कर व मी आणलेल्या या दुधाचा स्वीकार करून, माझ्यावर कृपा कर.' याप्रमाणे बोलून तो ब्राह्मण आपल्या घरी निघून गेला.

दुसर्‍या दिवशी सकाळी हरिदत्त त्या वारुळापाशी पुन्हा वाटीभर दूध ठेवायला गेला, असता त्याला आदल्या दिवशी ठेवलेल्या वाटीतील दूध नागाने पिऊन, तिच्यात 'दिनार' नावाचे एक सुवर्णनाणे ठेवले असल्याचे आढळून आले. मग दररोज सकाळी त्याने वाटीभर दूध त्या वारुळाच्या तोंडाशी ठेवावे व दुसर्‍या दिवशी सोन्याच्या दिनारासहित असलेली आदल्या दिवशीची वाटी घेऊन चूपचाप घरी जावे, असा दिनक्रम सुरू झाला. थोड्याच दिवसांत त्या ब्राह्मणाची परिस्थिती सुधारली.

एके दिवशी हरिदत्ताने तीन-चार दिवसांकरिता बाहेरगावी जाताना, नागाला दुधाची वाटी नेऊन देण्याचे व त्याने दिलेले सुवर्णनाणे गुपचूप घरी घेऊन येण्याचे काम आपल्या मुलावर सोपविले.

पण शेतावर गेलेल्या त्या मुलाला, आदल्या दिवशीच्या वाटीत दिनार दिसताच तो मनात म्हणाला, 'हे वारूळ सोन्याच्या दिनारांनी वास्तविक खच्चून भरलेले असणार. असे असूनही हा कंजूष नागोबा वाटीभर दुधाच्या बदल्यात फक्त एकच दिनार देतो. पण आपण जर याला मारले व याचे वारुळ खोदले, तर आपल्याला एकदम हजारो दिनार मिळून, आपण एका दिवसात श्रीमंत होऊ.' मनात असा विचार येताच, त्या मुलाने तो नाग बाहेर येताच त्याच्या मस्तकावर हातातल्या काठीने जोरदार प्रहार केला. परंतु त्या नागाच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून, ती काठी त्याच्या फणेला चुटपुटती लागली व तो वाचला. मात्र लगेच त्या मुलाच्या अंगावर झेपावून त्या नागाने त्याला कडकडून दंश केला व त्यामुळे तो मुलगा तत्क्षणीच मरण पावला. मग त्या मुलाच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेताला अग्नी दिला.

दुसर्‍या दिवशी ब्राह्मण घरी परतताच, त्याला घडलेला प्रकार कळला व तो रडू लागला. त्याचे नातेवाईक त्याचे सांत्वन करू लागले, तेव्हा दुःखाचे दीर्घ उच्छ्‌वास सोडीत तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, 'आपल्या हितचिंतकांशी जे क्रूरपणे वागतात, ते पद्मसरोवरातील सुवर्णहंसांना गमावून बसलेल्या राजा चित्ररथाप्रमाणे नंतर पश्चात्तापदग्ध होतात.'

'राजा चित्ररथाची ती गोष्ट काय आहे?' असा प्रश्न त्या नातेवाईकांनी केला असता हरिदत्त त्यांना ती गोष्ट सांगू लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel