गोष्ट तीसावी

हातचे सोडून पळत्यामागे जाई, त्याच्यावर हातचेही गमावण्याची पाळी येई.

एका गावात 'तीक्ष्णविषाण' नावाचा एक धष्टपुष्ट बैल राहात होता. एकदा तो नदीकाठी पाणी प्यायला गेला असता, तिथे राहात असलेल्या प्रलोभक नावाच्या कोल्ह्याच्या बायकोचे लक्ष त्या बैलाच्या खाली लोंबत असलेल्या वृषणाकडे गेले. ते पाहून ती पतीला म्हणाली, 'अहो, त्या बैलाचे मांसपिंड बघा किती खालीपर्यंत लोंबताहेत ! लवकरच ते तुटून जमिनीवर पडतील व आपल्याला खायला मिळतील. तेव्हा तो जिथे जाईल, तिथे आपणही जात राहू या.'

प्रलोभक कोल्हा म्हणाला, 'कांते, ते मांसपिंड त्या बैलाच्या शरीराला एकसंध असे चिकटले असताना, ते खाली कसे पडतील ? तेव्हा रात्रीच्या वेळी या नदीकाठी पाणी प्यायला येणार्‍या उंदरांना पकडून आपण आजवर जसा चरितार्थ चालविला, तसाच पुढे चालवावा हे बरे. म्हटलंच आहे ना ?-

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवाणि निषेवते ।

ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ॥

(जो भरंवशाच्या गोष्टी सोडून बिनभरवंशाच्या गोष्टींमागे लागतो, त्याच्या हातून जे भरवंशाचे असते ते जाते आणि बेभरंवशाची गोष्ट तर गेल्यातच जमा असते.)

नवर्‍याचे हे बोलणे न पटून कोल्ही त्याला म्हणाली, 'तुम्ही अगदीच अल्पसंतुष्ट आहात; त्यामुळे आहे ती परिस्थितीही तुम्हाला चांगली वाटते. म्हटलंच आहे ना ?-

सुपूरा स्यात्‌ कुनदिका सुपूरो मूषकाञ्जलिः ।

सुसन्तुष्टः कापुरुषः स्वल्पकेनापि तुष्यति ॥

(ओढ्याला थोड्याशा पावसानेही 'महापूर' येतो आणि त्या पाण्याने उंदराची ओंजळ भरून जाते. क्षुद्र पुरुष हा अशा लहानसान गोष्टींनीही संतुष्ट होऊन जातो. )

'अहो, पुरुषाचं भाग्य केव्हा फळफळतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसल्यास ऐका -

यत्रोत्साहसमारम्भो यत्रालस्यविहीनता ।

नयविक्रमसंयोगस्तत्र श्रीरचला ध्रुवम् ॥

(जिथे उत्साहाने कामाला प्रारंभ केला जातो व जिथे आळशीपणा नसतो, त्याचप्रमाणे जिथे नीती व साहस यांचा संगम झालेला असतो, तिथेच लक्ष्मीचा निरंतर वास असतो. )

अविचारी बायकोच्या या बोचक बोलण्याने तो प्रलोभक कोल्हा सारासार विचार गमावून, तिच्यासह त्या बैलाच्या मागोमाग जाऊ लागला. अविचारी अशा स्त्रीच्या अधीन झालेला पुरुष, काय करायचे बाकी ठेवतो ? म्हटलंच आहे ना ? -

तावत् स्यात् सर्वकृत्येषु पुरुषोऽत्र स्वयं प्रभुः ।

स्त्रीवाक्यांकुशविक्षुण्णो यावन्नो ह्रियते बलात् ॥

(जोवर स्त्रीच्या वाक्यरूपी अंकुशाने जोराने टोचला जात नाही, तोवरच पुरुष हा या जगात सर्व बाबतीत आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो.)

पण एकदा का तो तिच्या आहारी गेला की -

अकृत्यं मन्यते कृत्यमगम्यं मन्यते सुगम् ।

अभक्ष्यं मन्यते भक्ष्यं स्त्रीवाक्यप्रेरितो नरः ॥

(अविचारी स्त्रीच्या बोलण्याने प्रेरणा मिळालेला पुरुष करू नये ते करणे योग्य मानू लागतो, जिकडे जाणे कठीण आहे तिकडे जाणे सोपे मानतो, आणि खाऊ नये ते खाण्यास योग्य आहेसे समजू लागतो.)

अशा रीतीने अविचारी बायकोच्या पूर्णपणे आहारी गेलेला तो कोल्हा सतत पंधरा वर्षे तिच्यासह त्या बैलाच्या पाठीपाठीशी हिंडत राहिला. पण त्या बैलाची वृषणे काही खाली गळून पडली नाहीत, आणि त्यामुळे ती त्या कोल्हाकोल्हीला खायला मिळाली नाहीत. शेवटी निराश झालेला तो कोल्हा पत्‍नीसह आपल्या मूळच्या राहण्याच्या ठिकाणी परत गेला.'

ही गोष्ट सांगून सोमिलक त्या अदृश्य पुरुषाला म्हणाला, 'हे पुरुषश्रेष्ठा, तेव्हा इतर कुठल्याही वराचे आमिष न दाखवता, तू मला धनवान् होण्याचाच वर दे.'

यावर तो अदृश्य पुरुष म्हणाला, 'सोमिलका, ठीक आहे. तुझी इच्छाच श्रीमंत होण्याची आहे, तर मी तुला तसा वर देईन. पण तत्पूर्वी तू पुन्हा त्या वर्धमान नगरीत जा. तिथे मृत्यु पावलेल्या एका व्यापार्‍याचे 'गुप्तधन' व 'उपभुक्तधन' या नावाचे दोन मुलगे आपापल्या स्वतंत्र वाड्यात राहतात. त्यांचा अनुभव घेऊन तू पुन्हा याच ठिकाणी ये व तुला त्या दोन भावांपैकी कुणासारखे व्हावेसे वाटते ते तू मला सांग, म्हणजे मी तुला तसा वर देईन.' त्या अदृश्य पुरुषाच्या सांगण्यानुसार सोमिलक पुन्हा वर्धमान नगरीत गेला. त्याने प्रथम 'गुप्तधना' ची भेट घेतली व त्याच्याकडे रात्रीचे एक जेवण आणि त्याच रात्रीपुरती झोपायला जागा देण्याची विनंती केली.

कंजूष गुप्तधनाने सोमिलकाला प्रथम 'फुकट्या', 'ऐतखाऊ' अशा शिव्या देऊन हाकलून लावण्याचा प्रयत्‍न केला, पण सोमिलक ठाणच मांडून बसला. अखेर नाईलाज होऊन त्याने सोमिलकाला रात्रीपुरती, वाड्याच्या मागल्या उघड्या पडवीत राहण्यास परवानगी दिली व त्याच्या पुढ्यात अन्नाचे केवळ चार घास असलेली थाळी ठेवली. पण कंजूष गुप्तधन तेवढ्यावर थांबला नाही. पाहुण्याला चार घास अन्न दान करावे लागले, म्हणून त्या नुकसानीची भरपाई करून घेण्यासाठी, त्याने आपल्याला चार घास कमी अन्न वाढण्याचा हुकूम अगदी सोमिलकाला ऐकू जाईल, अशा आवाजात बायकोला फर्मावला. तो प्रकार पाहून सोमिलकाला त्याच्या श्रीमंतीचा उबग आला आणि ती रात्र त्याच्याकडे कशीबशी काढून, दुसर्‍या दिवशी सकाळी तो 'उपभुक्तधना' च्या वाड्यावर गेला.

उपभुक्तधनाने सोमिलक हा एक सामान्य कोष्टी आहे, हे कळूनही त्याची राहण्या-जेवण्याची अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली. गोरगरिबांना तो करीत असलेला दानधर्म पाहून सोमिलकाने त्याला विचारले, 'शेटजी, तुमचा भाऊ गुप्तधन हा तिकडे अतिशय कंजूषपणाने जगत असता, तुम्हाला हा एवढा खर्च कसा काय परवडतो ?'

उपभुक्तधन म्हणाला, 'जो दुसर्‍यांना मदत करीत राहतो, त्याला देवसुद्धा कुठल्या ना कुठल्या तर्‍हेने मदत करतो. या देशाचे राजे परममित्र आहेत. ते मला अधुनमधून भरघोस सहाय्य करतात.' उपभुक्तधन ही गोष्ट सांगत असतानाच राजसेवक रथातून आले, आणि उपभुक्तधनाला राजाकडील भेट म्हणून सुवर्णमोहरांनी भरलेली परात देऊन गेले. ते दृश्य पाहून संतुष्ट झालेल्या सोमिलकाने 'आपणही उपभुक्तधनाप्रमाणेच संपत्तीचा उपभोग घेणारे व दान करणारे व्हावे,' असे मनाशी ठरविले. मग उपभुक्तधनाप्रमाणेच संपत्तीचा उपभोग घेणारे व दान करणारे व्हावे, 'असे मनाशी ठरविले. मग उपभुक्तधनाचा निरोप घेऊन तो आपल्या गावाच्या रस्त्याला लागला व वाटेत त्या 'अदृश्या पुरुषा' ची भेट झाल्यावर त्याने त्याच्याकडे तसाच वर मागितला.'

या गोष्टी सांगून मंथरक हिरण्यकाला म्हणाला, 'मित्रा, तू धनधान्याचा साठा करण्यामागे लागलास, म्हणून तुझ्यावर हा प्रसंग ओढवला. लक्ष्मी ही चंचल असते. ती तीनपैकी कुठल्यातरी एका मार्गाने जाते.

दानं भोगो नाशस्तिस्त्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।

यो न ददाति न भुङ्‌क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ॥

(धन संपण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला दान, दुसरा उपभोग व तिसरा नाश. जो दान करीत नाही वा उपभोगही घेत नाही, त्याचे धन तिसर्‍या मार्गाने नाहीसे होते. )

'हिरण्यका, अरे धनधान्याचा बराच साठा जवळ असल्याने किंवा त्याचा येथेच्छ उपभोग घेतल्यानेच जीवन सुखी होते, असे थोडेच आहे ?

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते

शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति ।

कन्दैः फलैर्मुनिवरा गमयन्ति कालं

सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम् ॥

(साप वारा पिऊन राहतात, म्हणून काही ते दुर्बल नसतात. सुके गवत खाऊनसुद्धा हत्ती बलवान होतात. कंदमुळे व फळे यांवर ऋषी निर्वाह करतात. तेव्हा संतोष हेच माणसाचे मोठ्यात मोठे सुखाचे निधान आहे.)

मंथरक पुढे म्हणाला, 'हिरण्यका, अरे धन हे खरे धन नसून, संतोष हेच खरे धन आहे. म्हणून तर म्हटलं आहे -

दानेन तुल्यो निधिरस्ति नान्यो

लोभाच्च नान्योऽस्ति रिपुः पृथिव्याम् ।

विभूषणं शीलसमं न चान्यत्

सन्तोषतुल्यं धनमस्ति नान्यत् ॥

(दानासारखा दुसरा मोलाचा साठा नाही. या जगात लोभासारखा दुसरा शत्रु नाही. शीलासारखा दुसरा अलंकार नाही, आणि संतोषासारखे दुसरे धन नाही.)

याप्रमाणे उपदेश करून मंथरक शेवटी म्हणाला, 'हिरण्यका, तू काही सामान्य नाहीस. अरे, जे निर्बुद्ध असतात, ते ओल्या मातीचा गोळा जमिनीवर आपटला असता जसा आपटल्या जागी पडून राहतो, तसे संकटात अवसान गाळून बसतात. पण जे बुद्धिमान् असतात, ते मात्र आपटलेल्या चेंडूप्रमाणे संकटामुळे दुप्पट वेगाने उसळी घेऊन वर येतात.'

मंथरकाचे हे बोलणे संपताच लघुपतनक हिरण्यकाला म्हणाला, 'मित्रा, मंथरकाने केलेला उपदेश काहीसा कटु असला, तरी तो तुझ्या हिताचा आहे आणि हेच तर खर्‍या मित्राचं लक्षण आहे. म्हटलंच आहे -

अप्रियाण्यपि पथ्यानि ये वदन्ति नृणामिह ।

त एव सुह्रदः प्रोक्ता अन्ये स्युर्नामधारकाः ॥

(या जगात लोकांशी जे अप्रिय पण हितकारक बोलतात तेच खरे मित्र. बाकीचे नावाचे मित्र असतात. )

लघुपतनक याप्रमाणे हिरण्यकाला बोलत असतानाच चित्रांग नावाचे एक हरीण धापा टाकीत तिथे आले व म्हणाले, 'एका पारध्याचा बाण निसटता लागल्यामुळे कसाबसा वाचलेला मी तुमच्या आश्रयाला आलो आहे. तेव्हा मला आधार द्या.'

यावर मंथरक म्हणाला, 'मित्रा, शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्याचे दोन मार्ग आहेत.

द्वावुपायाविह प्रोक्रौ विमुक्तौ शत्रुदर्शने ।

हस्तयोश्चालनादेको द्वितीयः पादवेगजः ॥

(शत्रु दृष्टीस पडला असता त्याच्यापासून सुटका करून घेण्याचे दोन उपाय या जगात आहेत. एक तर त्याच्याशी दोन हात करणे, किंवा दुसरा उपाय म्हणजे पलायन करणे. )

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता मंथरक उपदेश करण्यात वेळ घालवू लागल्याचे पाहून लघुपतनक कावळा पटकन् उडून जवळच्याच एका झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला व सभोवार नजर टाकून चित्रांगाला म्हणाला, 'मित्रा, त्या पारध्याने तुझा नाद सोडून दिला आहे आणि मारलेल्या दोन हरिणांसह तो त्याच्या घरी चालला आहे तेव्हा तू निश्चिंतपणे या ठिकाणी वास्तव्य कर.' मग तो चित्रांगही त्या तिघांसमवेत राहू लागला आणि सुभाषिते व दृष्टांतकथा एकमेकांना सुनावण्यात त्यांचा काळ फार मजेत जाऊ लागला.

एके दिवशी नित्याप्रमाणे दूरवर चरायला गेलेला चित्रांग, ठरलेल्या वेळी परत न आल्याने, मंथरकाच्या सांगण्यावरून लघुपतनक कावळा त्या वनावरून घिरट्या घालू लागला. तोच त्याला एका फासेपारध्याच्या जाळ्यात अडकून पडलेला चित्रांग दिसला. तेव्हा दुःखद मनाने त्याच्यापाशी जाऊन लघुपतनकाने त्याला विचारले, 'मित्रा, तू एवढा सावध असताना या जाळ्यात कसा काय अडकलास ?' यावर चित्रांगाने उत्तर दिले -

कृतान्तपाशबद्धानां दैवोपहतचेतसाम् ।

बुद्धयः कुब्जगामिन्यो भवन्ति महतामपि ॥

(यमपाशांनी बद्ध झाले असता, किंवा दैवाने मारायचे ठरविले असता, थोरामोठ्यांची बुद्धीही वाकड्या चालीने चालू लागते. )

'तेव्हा लघुपतनका, इतर सर्व जाऊ दे. लवकरच पारधी येऊन, मला ठार मारून घेऊन जाणार असल्याने, तुझी व माझी ही शेवटची भेट आहे. म्हणून माझी विनंती हीच की, तुम्हा तिघांना जर मी जाणता अजाणता कधी दुखविले असेल तर मला क्षमा करा.'

लघुपतनक म्हणाला, 'चित्रांगा, तू असा धीर सोडू नकोस. मी हिरण्यकाला घेऊन येतो. तो त्याच्या धारदार दातांनी हे जाळे तोडील आणि तुला मुक्त करील.' बोलल्याप्रमाणे लघुपतनक आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेला व तातडीने हिरण्यकाला घेऊन परत आला. हिरण्यकाने ते जाळे भराभर तोडले व चित्रांगाला मुक्त केले.

तेवढ्यात हळूहळू मंथरकही आपल्याकडे येत असल्याचे पाहून, हिरण्यक व चित्रांग यांना लघुपतनक म्हणाला, 'मंथरक इकडे आला, हे काही त्याने चांगले केले नाही. समजा, याच वेळी तो पारधी आला, तर आपण तिघे झटकन्‌ पळू शकतो, पण मंदगतीच्या मंथरकाचे कसे काय होणार ?' लघुपतनकाचे बोलणे कानी पडल्यामुळे मंथरक त्याला म्हणाला, 'अरे, ते सर्व मलाही कळते, पण जाळ्यात अडकलेला आपला चित्रांग मोकळा झाला की नाही, हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष इकडे आल्याशिवाय मला चैनच पडेना.' मंथरकाचे हे बोलणे संपते न संपते तोच, खरोखरच पारधी आला. त्याला पाहून चित्रांग चौखूर धावून एका दूरच्या झुडुपात दडून राहिला. लघुपतनक उडून एका झाडावर जाऊन बसला, तर हिरण्यक हा जवळच्याच एका बिळात घुसला. मंथरक मात्र त्या पारध्याच्या हाती लागला.

जाळ्यातून हरीण निसटल्याचे पाहून पारध्याने मिळालेल्या कासवालाच घरी कालवणासाठी न्यायचे ठरविले. त्याला एका दर्भासनात गुंडाळून ठेवले आणि ते दर्भासन आपल्या जवळच्या बाणात अडकवून, तो घराची वाट चालू लागला.

तो थोडासा दूर जाताच, हिरण्यक, लघुपतनक व चित्रांग हे झटपट एकत्र आले. हिरण्यकाला तर दुःख आवरता आवरेना. अश्रु ढाळीत तो म्हणाला, 'अरेरे ! माझा जन्म केवळ दुःखे भोगण्यासाठीच आहे का ? माझा वाडा आतील धनधान्याच्या साठ्यासह नष्ट झाला, माझा परिवार मला सोडून गेला, मला परदेशाचा आश्रय घ्यावा लागेल, प्रसंग आला ? संकटाबद्दल जे म्हटलं जातं ते काही खोटं नाही-

क्षते प्रहारा निपतन्त्यभीक्ष्णं धनक्षये वर्धति जाठाराग्निः ।

आपत्सु वैराणि सुमल्लसन्ति छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ॥

(झालेल्या जखमेवरच पुनःपुन्हा लागत राहते. संपत्ती संपल्यावर भूक अतिशय तीव्र होऊ लागते. संकटकाळी नवी वैरे उत्पन्न होतात. एकदा का एका संकटाला वाट सापडली की अनेक संकटे येऊ लागतात.)

याप्रमाणे बोलता बोलताच आपले दुःख आवरते घेऊन हिरण्यक म्हणाला, 'बाकी आता दुःख करण्यात वेळ न घालवता, मंथरकाला सोडविण्याचा उपाय शोधून काढला पाहिजे.'

यावर लघुपतनक म्हणाला, 'मला एक युक्ती सुचते. तो पारधी ज्या वाटेने घरी जात आहे, त्या वाटेवर थोड्याच वेळात त्याला एक सरोवर लागेल. चित्रांगाने त्या पारध्याच्या दृष्टीस न पडता, आडवाटेने त्याच्यापुढे पळत जाऊन त्या तळ्याकाठी मृतवत् पडून राहावे, आणि मी त्याच्या मस्तकावर बसून, चोचीने त्याचा डोळा खात असल्याचे सोंग करावे, असे केले की, 'चित्रांग मरून पडला आहे,' असा त्या पारध्याचा समज होईल व हाती असलेल्या मंथरकाला जमिनीवर ठेवून तो चित्रांगाला उचलण्यासाठी त्याच्याकडे जाईल. तत्पूर्वीच हिरण्यकाला मी पाठीवर घेऊन तिकडे जातो व त्या पारध्याने मंथरकाला जमिनीवर ठेवताच, हिरण्यकाला मंथरकाभोवती गुंडाळलेल्या दर्भासनाचे पाश तोडण्याची सूचना देतो. तो पारधी चित्रांगाकडे जाऊ लागताच चित्रांग पटकन् पळून जाईल, व हिरण्यकाकडून मुक्त झालेला मंथरक, त्या पारध्याची पाठ असताना वेगाने तळ्यात शिरून दिसेनासा होईल.' लघुपतनकाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी केले, आणि ती युक्ती सफल होऊन मंथरकाचे प्राण वाचले. मग ते चौघेही मित्र आपल्या मूळ ठिकाणी सुखात राहू लागले.'

अशा या गोष्टी सांगून दुसर्‍या तंत्राचा समारोप करताना विष्णुशर्मा त्या तीन राजकुमारांना म्हणाला, 'मित्र हे प्रत्येकाच्या जीवनात आनंद व निर्भयता निर्माण करणारे एक अमोघ साधन आहे. म्हणून तुम्ही चांगले मित्र जोडा व सुखी व्हा. कारण मित्राबद्दल असं म्हटलं आहे -

यो मित्राणि करोत्यत्र न कौटिल्येन वर्तते ।

तैः समं न पराभूतिं संप्राप्नोति कथंचन ॥

(जो या जगात मित्र जोडून त्यांच्याशी कपटाने वागत नाही, त्याच्यावर पराभवाचे दुःख करण्याचा प्रसंग कधीच येत नाही. )

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel