गोष्ट सत्तरावी

कधी कधी अपूर्व योग जुळून येती व अशक्य गोष्टी प्रत्यक्षात उतरती !

'भद्रसेन' नावाच्या एका राजाची मुलगी 'रत्‍नवती' हिच्या प्राप्तीसाठी एक राक्षस धडपड करू लागला. तिच्या लक्षात ही गोष्ट आली व एके रात्री, तिच्या महालात आलेल्या तिच्या मैत्रिणीला ती म्हणाली, 'सखे, एक राक्षस अकाली माझ्याकडे येण्याचा प्रयत्‍न करीत असतो. कोणत्या उपायाने मी त्याचा प्राण घेऊ ?'

वास्तविक राजकन्येने एक राक्षस अकाली येतो असे म्हटले होते त्याचा अर्थ 'नको तेव्हा' असा होता, पण त्याच महालाबाहेरील अंधाराच्या आडोशाला उभ्या असलेल्या त्या राक्षसाचा गैरसमज झाला. त्याला वाटले, आपल्याप्रमाणे 'अकाली' नावाचा दुसराही एक राक्षस हिच्या प्राप्तीसाठी धडपडत आहे. तेव्हा त्या राक्षसाने मायेच्या सहाय्याने एका उमद्या घोड्याचे रूप घेतले व दुसरा राक्षस पहायला मिळावा म्हणून तो राजकन्येच्या महालापासून थोड्या अंतरावर उभा राहिला.

तेवढ्यात तिथे एक चोर आला आणि 'हा घोडा छान आहे,' असे स्वतःशी म्हणून त्याच्यावर स्वार झाला व त्याला दौडवू लागला. त्या प्रकाराने घोड्याच्या रूपात असलेला राक्षस घाबरला. 'याने आपल्याला ओळखले असावे, हा आता आपल्याला दूर नेणार व आपला जीव घेणार,' असा समज होऊन तो वेगाने पळू लागला. गंमत अशी की 'हा अनावर घोडा आपल्याला पाडून टाकील.' अशा भयाने, तो चोर वाटेत लोंबत असलेल्या एका वडाच्या पारंबीला पकडून लोंबकळत राहिला.

'चला, आपण त्या अकाली राक्षसाच्या कटकटीतून सुटलो,' असे मनात म्हणून तो राक्षस मूळ स्वरूप धारण करून पळून जाऊ लागला असता, त्या वटवृक्षावरचा एक विघ्नसंतोषी वानर त्या राक्षसाला म्हणाला, 'अरे राक्षसदादा, ज्याला तू घाबरत आहेस, तो कुणी महाराक्षस नसून, एक सामान्य माणूस आहे. त्याला खाऊन टाक.'

तेवढ्यात त्या चोराने, फांदीखाली लोंबत असलेल्या त्या कळलाव्या वानराच्या शेपटीला कडकडून चावा घेतला. त्यामुळे तो वानर मोठ्याने चीत्कारला. त्या वानराचा तो भयंकर आवाज ऐकून, त्याच्याकडे पाहून तो राक्षस म्हणाला, 'अरे मर्कटा, त्या अकाली राक्षसाने तुला खायला सुरुवात केली असल्याने तुझा चेहेरा अगोदरच भयग्रस्त झाला आहे. तशाही स्थितीत त्या राक्षसाने मलाही खावे म्हणून तुझा प्रयत्‍न चालला आहे. पण मी असा फसणार नाही.' असे म्हणून तो राक्षस पळून गेला.

ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला, 'चक्रधरा, तुझा चेहेराही आता त्या 'अकाली' राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या वानराच्या चेहेर्‍याप्रमाणे भयग्रस्त झाला आहे. तो मला बघवत नसल्याने मी तुझा निरोप घेतो. तुझ्या कर्माची फळे तू भोग.'

चक्रधर त्राग्याने म्हणाला, 'मित्रा, चांगली कर्मे केली की चांगली फळे मिळतात. आणि वाईट कर्मे केली की, वाईट फळे पदरात पडतात, हे बोलणे खोटे आहे. रावणाने एवढ्या बंदोबस्तात बांधलेल्या लंकानगरीचीसुद्धा, त्या मारुतीने राखरांगोळी केली, आणि वाईट कर्मे करूनसुद्धा आंधळा, कुबडा व ती तीन स्तनांची राजकन्या सुखी झाली.'

यावर हे तीन स्तनांच्या राजकन्येचे प्रकरण काय आहे?' असे सुवर्णसिद्धाने विचारले असता चक्रधर म्हणाला, 'ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel