गोष्ट पंचवीसावी

धनाच्या उबेचा प्रभाव मोठा, प्राण्याला चढे भलताच ताठा.'दक्षिणेकडील' महिलारोप्य नावाच्या नगराबाहेर असलेल्या श्रीमहादेवाच्या मंदिरात 'ताम्रचूड' नावाचा एक जोगी राहात असे. दिवसा गावात भिक्षा मागून जमविलेले धान्य रात्री शिजवून, त्यातले आपल्याला आवश्यक तेवढे तो खाई आणि उरलेले अन्न तो भिक्षापात्रात झाकून ठेवी. मग दुसर्‍या दिवशी सकाळी, ते अन्न, तो एकदोघा गरिबांना देई आणि त्या अन्नाच्या बदल्यात तो त्यांच्याकडून त्या देवळाची झाडलोट व सडासारवण करून घेई.'

आपण सांगत असलेली हकीकत लघुपतनक व मंथरक हे लक्ष देऊन ऐकत असल्याचे पाहून हिरण्यक पुढे म्हणाला, 'एके दिवशी माझे चार-पाच अनुयायी व सेवक माझ्याकडे आले व मला म्हणाले, 'महाराज, देवळातला बैरागी रात्री जे अन्न शिजवतो, त्यातले स्वतःला आवश्यक तेवढे खाऊन, बाकीचे अन्न तो एका भांड्यात घालून ते भांडे आम्हा उंदरांच्या भयाने भिंतीतील एका उंच खुंटीवर टांगून ठेवतो. आम्हाला तेवढी उंच दडी मारून त्या भांड्यातले अन्न खाता येणे शक्य नाही. पण आपल्याला तशी उडी मारता येणे सहज शक्य आहे. तसे झाले, तर आपणा सगळ्यांनाच अन्नासाठी इकडे तिकडे फिरावे न लागता, एकाच जागी पोटीपोटभर व ताजे अन्न मिळेल.'

त्यांची ही विनंती ऐकून मी रात्री त्या देवळात गेलो व एका उडीसरशी त्या खुंटीवर टांगलेल्या भांड्यावर जाऊन बसलो. मग मी अगोदर त्या भांड्यातले अन्न माझ्या सेवकसहाय्यकांसाठी खाली टाकले आणि त्यांचे पोटीपोटभर खाऊन झाल्यावर भांड्यात उरलेले मी खाल्ले. त्यानंतर हा आमचा रोजचा रात्रक्रम सुरू झाला. थोड्याच दिवसांनी तो जोगी रात्री अंथरूणात पडल्यावर, हाती एक बांबूची पिचलेली काठी घेऊन, अधुनमधून ती त्या खुंटीखालच्या जमिनीवर आपटू लागला. पण मी असल्या धाकाला भीक घालणारा नव्हतो. मधूनच जेव्हा डुलकी लागून तो जोगी घोरू लागे, तेव्हा मी तेवढ्या अवधीत त्या खुंटीवर टांगलेल्या भांड्यातले अन्न लुटू लागे.

असे होता होता एके दिवशी संध्याकाळी बृहत्‌स्फिक नावाचा दुसरा एक जोगी त्या मंदिरात आला. तो ताम्रचूडाचा परममित्र होता. रात्री जेवण झाल्यावर तो पाहुणा गप्पा मारू लागला असता, ताम्रचूड - एकीकडे त्याचे बोलणे ऐकता ऐकता दुसरीकडे - आपल्या हातातील काठी अधुनमधून त्या खुंटीखालच्या जमिनीवर आपटू लागला.

त्याच्या अशा वागण्याचा अतिशय राग येऊन तो पाहुणा त्याला म्हणाला, 'ताम्रचूडा, मी तुझ्याशी बोलत असताना तू अशी काठी का आपटत राहिला आहेस ? तुला माझे बोलणे ऐकण्यात गोडी वाटत नाही का ? मी तुझ्याकडे आलो, हाच मोठा मूर्खपणा केला ! कारण म्हटलेच आहे -

गृही यत्रागतं दृष्ट्वा दिशो वीक्षेत वाप्यथः ।

तत्र ये सदने यान्ति ते श्रृङ्गरहिता वृषाः ॥

(ज्या घरी पाहुणे आले असता त्या घरची माणसे इतरत्र किंवा खाली बघत राहतात, अशा घरी जाणारे हे जणू शिंगे नसलेले बैलच असतात. )

त्याचप्रमाणेनाभ्युत्थानक्रिया यत्र नालापा मधुराक्षराः ।

गुणदोषकथा नैव तत्र हर्म्ये न गम्यते ॥

(जिथे पाहुणे आले असता उठून स्वागत होत नाही, गोड शब्द ऐकू येत नाहीत किंवा बर्‍यावाईट गोष्टी मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत, अशा घरी जाऊ नये.)

रागावलेला पाहुणा पुढे म्हणाला, 'ताम्रचूडा ! राहण्यासाठी एक मठवजा देऊळ मिळाले म्हणून या तुझ्या मित्राला तुच्छतेनं वागवण्याइतका तू शेफारून गेलास का ? पण मठात राहिल्याने स्वर्गाचा नव्हे, तर नरकाचा मार्ग सुलभ होत असतो, हे तू लक्षात ठेव. एका गुरूनेच आपल्या शिष्याला सांगितलं, 'वत्सा-

नरकाय मतिस्ते चेत् पौरोहित्यं समाचर ।

वर्षं यावत् किमन्येन मठचिन्तां दिनत्रयम् ॥

(आपण नरकाला जावं, असं जर तुला वाटत असेल, तर तू एक वर्षभर पुरोहिताचं काम कर, किंवा केवळ तीन दिवस एखाद्या मठाची उठाठेव कर. )

आपल्या पाहुण्या मित्राला क्षणभर थांबवून ताम्रचूडाने आपण काठी का आपटत होतो याबद्दल खुलासा केला. तेव्हा पाहुण्याने विचारले, 'काय रे, मांजरापेक्षा किंवा माकडापेक्षाही उंच उडी मारणार्‍या त्या उंदराचे बीळ एखाद्या पुरलेल्या धनाच्या साठ्यालगत आहे का ? कारण धनाची ऊब असल्याशिवाय त्या उंदराला एवढी मस्ती चढणार नाही.

म्हटलंच आहे -

ऊष्मापि वित्तजो वृद्धिं तेजो नयति देहिनाम् ।

किं पुनस्तस्य सम्भोगस्त्यागकर्मसमन्वितः ।

(संपत्तीच्या उबेमुळेच प्राण्याच्या अंगी मस्ती चढते. त्यातून तिचा उपभोग घेतला किंवा तिचे दान केले की, मग तर विचारण्याची सोयच उरत नाही.)

पाहुणा जोगी पुढं म्हणाला, 'शिवाय ज्या अर्थी तो उंदरडा केवळ अन्नासाठी एवढं धाडस करतोय, त्या अर्थी त्यामागे त्याचा काहीतरी खास हेतु असण्याचीही शक्यता आहे. अरे ताम्रचूडा, ती शांडिलीबाई दुसर्‍याकडल्या साध्या तिळांच्या बदल्यात, त्याला जे स्वतःकडले सोललेले तीळ द्यायला तयार झाली, तो त्यामागे तिचा काही उद्देश होता म्हणूनच ना ?'

'त्या शांडिलीबाईची गोष्ट काय आहे ?' असा प्रश्न ताम्रचूडाने केला असता पाहुणा जोगी बृहत्‌स्फिक म्हणाला, 'शांतपणे ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel