गोष्ट आठवी

'बुद्धिवंताची शक्ती खरी, तो जाई तिथे विजयाची गुढी उभारी'

एका वनात भासुरक नावाचा सिंह राहात असे. तो कारण नसता दररोज त्या वनातल्या अनेक पशूंची शिकार करी व त्यांतल्या एखाद्यालाच खाऊन, बाकीचे तसेच टाकून देई. त्यामुळे त्या वनातल्या पशूंची संख्या रोडावू लागली. अखेर एके दिवशी त्या वनातले हत्ती, रानरेडे, डुक्कर, ससे वगैरे प्राण्यांचे एक शिष्टमंडळ त्या सिंहाकडे गेले व त्याला वंदन करून म्हणाला, 'महाराज, आपली दररोजची भूक भागविण्यासाठी आपल्याला एखादा पशू पुरा पडत असताना, आपण पशूंची अमर्याद हत्या करता. हे असेच चालू राहिले, तर लवकरच हे वन पशूरहित होईल व आपल्यावरही उपासमारीचा प्रसंग येईल. तेव्हा यापुढे आम्हीच आपापसांत ठरवून दररोज आपल्याकडे ठरलेल्या वेळी एक वा दोन पशू पाठवीत जाऊ. त्यामुळे श्रम न पडता आपली भूक भागेल आणि आम्हा पशूंची विनाकारण होणारी हत्याही थांबेल.'

तो सिंह या गोष्टीचा विचार करू लागल्याचे पाहून हत्ती म्हणाला, 'महाराज, राजनीती या ग्रंथात असं सांगितलं आहे -

गोपालेन प्रजाधेनोर्वित्तदुग्धं शनैः शनैः ।

पालनात्पोषणाद् ग्राह्यं न्याय्यां वृत्तिं समाचरेत् ॥

(प्रजा ही गाईसारखी आहे, तर राजा हा गवळ्यासारखा आहे. तेव्हा या गवळ्याने प्रजारूपी गाईचे पालनपोषण करून, तिला त्रास न होईल अशा तर्‍हेने, तिच्यापासून धीरे धीरे धनरूपी दूध मिळवावे, व न्याय्य वृत्तीने आपले जीवन जगावे.)

मग रानरेडा पुढे होऊन म्हणाला, 'महाराज, राजनीतीत तर असंही सांगितलंय-

अजामिव प्रजां मोहाद्यो हन्यात् पृथिवीपतिः ।

तस्यैका जायते तृप्तिर्न द्वितीया कथचंन ।

(बोकडाला कापणार्‍या एखाद्या कसायाप्रमाणे जो राजा धनलोभापायी आपल्या प्रजेला पुरेपूर मारतो - म्हणजे लुटतो - त्याचे फारतर एकदा समाधान होऊन शकते पण दुसर्‍या वेळेला ती समाधानाची संधी त्याला कधीही लाभत नाही.)

रानरेड्याचे बोलणे पूर्ण होते न होते, तोच एक चतुर ससा पुढे सरसावून म्हणाला, 'महाराज, आपल्याला माझ्यासारख्यानं काय सांगावं ? तरीही 'राजनीती' या ग्रंथातल्या एका मौल्यवान वचनाची मी आपल्याला आठवण करून देतो-

यथा बीजांकुरः सूक्ष्मः प्रयत्‍नेनाभिरक्षितः ।

फलप्रदो भवेत् काले तद्वल्लोकः सुरक्षितः ।

जसे सूक्ष्म अशा बीजांकुराचे प्रयत्‍नपूर्वक रक्षण केले असता कालांतराने ते वृक्षरूप होऊन फळे देऊ लागते. तसेच प्रजेला सुरक्षित ठेवले असता (राजाला) तिच्यापासून वैभव प्राप्त होते.)

शिष्टमंडळाचे हे म्हणणे पटल्यामुळे भासुरकाने ते मान्य केले व ठरल्याप्रमाणे ते पशू दर दिवशी त्यांच्यापैकी एकेकाला त्या वनराजाकडे अगदी ठरविल्यावेळी पाठवू लागले. असे होता होता एके दिवशी. त्या शिष्टमंडळाबरोबर गेलेल्या बुद्धिमान् सशाचीच त्या भासुरकाकडे भक्ष्य म्हणून जाण्याची पाळी आली.

अश्रुभरल्या डोळ्यांनी आपल्या बायकापोरांचा निरोप घेऊन त्या सशाने सिंहाच्या गुहेचा रस्ता धरला. पण चालता चालता त्याच्या मनात विचार आला, 'या वनराज भासुरकाचा या वनातल्या पशूंना काहीतरी उपयोग आहे का ? मुळीच नाही. उलट याने बेछूटपणे प्रजाजनांना मारू नये म्हणून त्याच्याच गुहेत दररोज एका प्राण्याने आपणहून जायचे, व त्याच्या भक्ष्यस्थानी पडायचे, हा काय न्याय झाला ? त्यापेक्षा यालाच कायमचे नाहीसे केले तर ?' तो मनात असे म्हणतो न म्हणतो तोच, त्याला सभोवती दगडी बेंड बांधलेली एक विहीर दिसली. त्या विहिरीकडे जाऊन त्याने आत डोकावून पाहिले असता, त्याला आतल्या पाण्यात स्वतःचे स्पष्ट प्रतिबिंब दिसले आणि त्याचक्षणी त्याच्या तरल बुद्धीने त्या बेफाम सिंहाला कसे मारायचे याबाबत त्याला मार्गदर्शन केले.

मग उगाच इकडे तिकडे भटकण्यात वेळ घालवून तो ससा बर्‍याच उशिरा त्या सिंहाकडे गेला व संतप्त स्थितीत गुहेबाहेर येरेझारा घालणार्‍या सिंहाला नमस्कार करून म्हणाला, 'महाराज, आपण माझ्यावर रागावलात ते योग्य असले, तरी मला यायला उशीर झाला, यात माझा अपराध नाही. आपली भूक पुरेपूर भागावी, म्हणून मी माझ्या आणखी चार नातेवाईकांसह आपल्याकडे येण्यासाठी घरून वेळीच निघालो होतो, पण वाटेत दुसर्‍याच एका सिंहाने आम्हाला आडवून विचारले, 'काय हो, एवढ्या घाईने तुम्ही कुठे निघालात ?'

'महाराज, आम्ही त्याला खरे ते सांगताच तो सिंह मला म्हणाला, 'या वनाचा राजा मी असताना, तुम्ही त्या उपटसुंभ भासुरक्याला का म्हणून वनाचा राजा मानता?' तू एकटाच त्याच्याकडे जाऊन सांग की, तुझ्यात ताकद असली, तर तू माझ्याशी लढायला ये.' याप्रमाणे बोलून, त्या सिंहाने माझ्या चार नातेवाईकांना त्याच्याकडे ओलीस म्हणून ठेवून घेतले व स्वतःचा निरोप तुम्हाला सांगण्याकरिता फक्त मलाच तेवढे इकडे पाठवून दिले.'

त्या सशाने सांगितलेली ही हकीकत त्या भासुरकाला खरी वाटली व त्याच्या अंगाची लाहीलाही झाली. रागाने लटलट कापू लागलेला तो त्या सशाला म्हणाला, 'काय, तो महामूर्ख मला असं म्हणाला ? तर मग तू मला आत्ताच त्याच्याकडे घेऊन चल. मी त्याला नाही ठार केले तर 'भासुरक' हे नाव लावणार नाही.'

यावर त्याला अधिक डिवचण्यासाठी तो ससा मुद्दामच म्हणाला, 'पण महाराज, त्या सिंहाची गुहा, सभोवताली दगडी तटबंदी असलेल्या एका छोट्याशा वर्तुळाकार किल्ल्यात आहे. तो केव्हाही त्या किल्ल्यातील गुहेचा आश्रय घेऊ शकतो. आणि किल्ल्याचं सामर्थ्य किती असतं, ते काय आपल्याला मी सांगायला हवं ? युद्धशास्त्रावरील एका ग्रंथा म्हटलं अहे -

न गजानां सहस्त्रेण न च लक्षेण वाजिनाम् ।

यत्कृत्यं साध्यते राज्ञां दुर्गेणैकेन सिद्ध्यति ॥

(राजाचे जे काम हजार हत्तींच्या किंवा लाख घोड्यांच्या सहाय्याने होऊ शकत नाही, ते काम एका किल्ल्यामुळे होते.)

भडकलेला भासुरक म्हणाला, 'अरे, तो किल्ल्यातच काय, पण सप्तपाताळात जरी दडून राहिला, तरी मी त्याला शोधून ठार करीन. या बाबतीत शास्त्र असं सांगतं -

जातमात्रं न यः शत्रुं रोगं च प्रशमं नयेत् ।

महाबलोऽप तेनैव वृद्धिंप्राप्य स हन्यते ॥

(शत्रू काय किंवा अग्नी काय, निर्माण होतो न होतो, तोच त्याचा नायनाट करावा. एकदा का तो वाढला, की मोठ्या बलवंताचाही तो प्राण घेतो.)

परंतु तरीही ससा मुद्दाम म्हणाला, 'महाराज, आपलं म्हणणं योग्य असलं तरी मला 'राजनीतिशास्त्र' या ग्रंथातलं एक वचन आपल्या निदर्शनास आणावंस वाटतं. ते वचन असं आहे-

अविदित्वत्मनः शक्तिं परस्य च समुत्सुकः ।

गच्छन्नभिमुखो नाशं याति वह्नौ पतङ्गवत् ॥

(शत्रूच्या व आपल्या सामर्थ्याचा अंदाज न घेता, जो त्याच्यावर घाईने चालून जातो, त्याचा अग्नीवर झेप घेणार्‍या पतंगाप्रमाणे नाश होतो.)

पण लगेच स्वतःला सावरल्यासारखे दाखवून तो ससा भासुरकाला म्हणाला, 'अर्थात्‌ हे वचन आपल्यासारख्याला लागू होत नाही. कारण देवांनाही भारी होण्याएवढं सामर्थ्य आपल्या अंगी असताना, त्या शेळपटाची आपल्यापुढे डाळ कशी काय शिजणार ?' सशाने केलेल्या स्तुतीमुळे हवेत तरंगू लागलेला तो भासुरक मोठ्या ऐटीत त्याच्या पाठोपाठ चालू लागला.

बर्‍याच वेळाने ती विहीर दृष्टीच्या टप्प्यात येताच ससा त्याला म्हणाला, 'महाराज, तोच आपल्या कट्टर शत्रूचा किल्ला. आपले नुसते दुरून दर्शन होताच, बेट्याने त्या किल्ल्यातील गुहेत दडी मारलेली दिसते.'

भासुरकाने त्या विहिरीजवळ जाऊन आत डोकावून पाहिले असता, आतल्या पाण्यात पडलेले आपलेच प्रतिबिंब दिसले. आपल्याला आव्हान देणारा हाच तो आपला शत्रू अशा समजुतीने त्याने गर्जना केली. तिचा प्रतिध्वनी निघताच 'आपला शत्रूही आपल्याकडे पाहून गरजतोय, 'असा समज होऊन, त्याने त्या प्रतिबिंबावर झेप घेतली आणि त्या पाण्यात थोडा वेळ गटांगळ्या खाऊन, भासुरकाला अखेर जलसमाधी मिळाली. अशा रीतीने एका सामान्य शक्तीच्या सशाने आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर भासुरकाला मारले आणि स्वतःचेच नव्हे तर भविष्यकाळात बळी जाणार असलेल्या असंख्य वन्य पशूंचे प्राण वाचविले.

ही गोष्ट करटकाला सांगून दमनक कोल्हा त्याला म्हणाला, 'दादा, मीसुद्धा माझ्या बुद्धीच्या सामर्थ्यावर पिंगलक व संजीवक यांच्या मैत्रीत फूट पाडतो. फक्त तू मला आशीर्वाद दे.' करटकाने 'तू तुझ्या कामात यशस्वी हो,' असे म्हणताच दमनक पिंगलकाकडे गेला व नमस्कार करून चूपचाप उभा राहिला. त्याला तसे उभे राहिलेले पाहून पिंगलकाने विचारले, 'दमनका, आताशा तू माझ्याकडे चुकूनही येत नाहीस, हे कसे ?'

दमनक बोलू लागला, 'महाराज, त्या संजीवकाशी मैत्री जुळवल्यापासून आम्ही इतर सर्व मंत्री जर आपल्या दृष्टीने कुचकामी ठरलो आहोत, तर उगाच आपल्याकडे यायचे तरी कशाला ? मात्र आता आपल्यावर व आपल्या राज्यावर संकट येऊ पाहात असल्याने, मंत्री असलेल्या मला चूप बसून राहता येत नाही, म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. म्हटलेच आहे ना?'

प्रियं वा यदि वा द्वेष्यं शुभं वा यदि वाऽशुभम् ।

अपृष्टोऽपि हितं ब्रूयात्‍ यस्य नेच्छेत्पराभवम् ॥

(ज्याचा पराभव होऊ नये असे आपणास वाटते, त्याला बरे वाटो वा तिरस्करणीय वाटो, शुभ वाटो वा अशुभ वाटो, त्याने न विचारताच आपण-त्याच्या हिताचे जे असेल ते सांगून टाकावे.)

दमनक पुढे म्हणाला, 'महाराज, आता मी जे आपल्याला सांगणार आहे ते संजीवकाला मात्र सांगू नका. महाराज, तो आताशा मनातून आपला अतिशय तिरस्कार करतो. तो कालच मला म्हणाला, 'पिंगलकमहाराजांना काडीचीही अक्क्ल नाही. तेव्हा लवकरच मी त्यांना ठार करीन आणि मी स्वतःच या वनाचा राजा होईन.'

पिंगलक म्हणाला, 'दमनका, एकतर माझा संजीवक असं बोलणं शक्य नाही आणि समजा दुसरं म्हणजे, तो चुकून असे बोलला असला, तरी ज्याला अभय देऊन मी आपला मानला, त्याला मी कधीही अंतर देणार नाही. म्हटलंच आहे ना? -

अनेकदोषदुष्टोऽपि कायः कस्य न वल्लभः ।

कुर्वन्नपि व्यलीकानि यः प्रियः प्रिय एव सः ॥

(अनेक दोष किंवा व्याधी यांमुळे त्रासदायक झाले, तरी आपले शरीर कुणाला प्रिय असत नाही ? त्याचप्रमाणे जो प्रिय असतो, त्याने जरी नको त्या गोष्टी केल्या, तरी तो प्रियच राहतो.)

'पण महाराज, जो आपल्या वाईटावर आहे. त्यालाही आपण आपला मानता?' असा प्रश्न दमनकाने केला असता पिंगलक म्हणाला, 'बाबा रे -

उपकारिषु यः साधूः साधुत्वे तस्य को गुणः ।

अपकारिषु यः साधुः स साधुः सद्बिरुच्यते ॥

(जो उपकारकर्त्याशी चांगला वागतो, त्याच्या चांगलेपणाला काय अर्थ आहे ? आपल्यावर उपकार करणार्‍याशीही जो चांगला वागतो, तोच खरा साधुपुरुष, असे सज्जन म्हणतात.)

दमनक म्हणाला, 'महाराज, आपले हे तत्त्वज्ञान एखाद्या साधूच्या तोंडी शोभून दिसणारे असले, तरी राजाच्या तोंडी शोभून दिसणारे नाही. राज्य चालविण्याच्या दृष्टीने पार निकामी असलेल्या त्या गवतखाऊ संजीवकाच्या नादी लागून, आपल्यातलं क्षात्रतेज लोप पावू लागलं आहे, राज्याकडे व सेवकांकडे आपलं दुर्लक्ष होऊ लागलं आहे आणि त्यामुळे सेवक आपल्याला सोडून इतरत निघून जाऊ लागले आहेत. हीच स्थिती जर पुढेही चालू राहिली, तर मला आपले व आपल्या राज्याचे भवितव्य आशादायक दिसत नाही. तेव्हा आपण त्या संजीवकाची संगत सोडा. एका ढेकणाच्या संगतीमुळे मंदविसर्पिणी नावाची ऊ प्राणास मुकली ती गोष्ट आपल्याला ठाऊक आहे ना?

'नाही, ती गोष्ट मला सांग,' असा आग्रह पिंगलकाने धरताच दमनक म्हणाला, 'ऐका-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel