गोष्ट एकवीसावी

ही देवाची योजना आहे, 'शेर आहे तिथे सव्वाशेर' ही आहे.

एका गावात 'जीर्णधन' नावाचा एक वैश्यपुत्र होता. व्यापारात जबरदस्त खोट खाल्ल्यामुळे त्याला अतिशय वाईट दिवस आले, म्हणून तशा स्थितीत त्याला त्या गावात राहणे लाजिरवाणे वाटु लागले व त्याने काही काळाकरिता बाहेरगावी जायचे ठरविले.

यत्र देशेऽथवा स्थाने भोगान् भुक्त्वा स्ववीर्यतः ।

तस्मिन् विभवहीनो यो वसेत् स पुरुषाधमः ॥

(ज्या देशात वा ठिकाणी ज्याने स्वतःच्या हिंमतीवर वैभव भोगले, तिथे जो वैभवहीन झाल्यावरही राहातो, तो पुरुष सर्वात अधम असतो.)

त्याचप्रमाणे -

येनाहङ्कारयुक्तेन चिरं विलसितं पुरा ।

दिनं वदति तत्रैव यः परेषां स निन्दितः ॥

(ज्याने एखाद्या ठिकाणी पूर्वी अभिमानाने विलास व चैन आस्वादण्यात बराच काळ घालविला, तो जर नंतर त्याच ठिकाणी लाचारीने बोलू लागला, तर दुसर्‍यांच्या निंदेचा विषय बनतो.)

म्हणून त्या वैश्यपुत्राने घरात असलेला वडिलोपार्जित असा एक मोठा वजनदार लोखंडी तराजू, एका व्यापार्‍याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिला आणि मग तो दूरच्या प्रदेशात निघून गेला.

चार-सहा वर्षांनंतर, थोडीफार कमाई केल्यावर, जेव्हा तो आपल्या गावी परतला व त्या व्यापार्‍याकडे जाऊन आपला तराजू मागू लागला, तेव्हा तो व्यापारी त्याला म्हणाला, 'तू माझ्याकडे ठेवायला दिलेला लोखंडी तराजू उंदराने कुरतडून कुरतडून खाल्ला व पार संपवून टाकला. मग आता तो तराजू मी तुला कसा काय परत करणार ?' शेटजीचे हे उत्तर ऐकून तो वैश्यपुत्र समजूत झाल्याप्रमाणे गप्प बसला. त्यामुळे तो लबाड व्यापारी स्वतःच्या चातुर्यावर खूष झाला. त्या वैश्यपुत्राने - म्हणजे जीर्णधनाने त्या शेटजींशी पूर्वीपेक्षाही अधिक स्नेहाचे संबंध ठेवले, त्यांच्याकडे जाणे येणे चालू ठेवले, पण मनात मात्र त्याला धडा शिकविण्याचे ठरविले.

जीर्णधनाचे ते वाजवीपेक्षाही अधिक प्रेमाचे वागणे पाहून त्या शेटजीच्या मनात मधूनच विचार येई, 'हा आपल्याशी इतका प्रेमाने का बरं वागतो ? याच्या मनात तराजूच्या बदल्यात आपल्याकडून काही उकळावयाचे तर नसेल ना ? कारण कुणीही कुणाशी विनाकारण चांगला वागत नसतो. म्हटलंच आहे ना ?

न भक्त्या कस्यचित् कोऽपि प्रियं प्रकुरुते नरः ।

मुक्त्वा भयं प्रलोभं वा कार्यकारणमेव वा ॥

(केवळ प्रेमापोटी कुणी कुणाचे हित करायला जात नाही. त्यामागे भीती, लोभ किंवा असेही काही खास कारण असते.)

त्याचप्रमाणे -

अत्यादरो भवेत् यत्र कार्यकारणवर्जितः ।

तत्र शङ्का प्रकर्तव्या परिणामेऽसुखावहा ॥

(जिथे कारण नसतानाही अतिशय आदर दाखविला जातो, तिथे शंका घ्यावी; नाहीतर परिणाम दुःखद होतो.)

एके दिवशी तो जीर्णधन, त्या लबाड शेटजीच्या घरावरून आंघोळीसाठी नदीवर जात असता, त्या शेटजीचा लहान मुलगा त्याच्या पाठीशी लागला व शेटजीने संमती दिल्यामुळे जीर्णधन त्या मुलाला घेऊन गेला. मात्र दोघांच्या आंघोळी झाल्यावर जीर्णधनाने त्या मुलाला त्याच्या घरी पोहोचते करण्याऐवजी त्याला एका अज्ञात स्थळी लपवून ठेवले. बराच वेळ झाला तरी आपला मुलगा घरी परत न आल्याचे पाहून, तो शेटजी जीर्णधनाकडे गेला व 'माझा मुलगा कुठे आहे?' असे त्याला विचारू लागला. 'तुझ्या मुलाला मी नदीवर आंघोळ घालत असता तिथे एक बहिरीससाणा आला व तुझ्या मुलाची मान चोचीत पकडून दूर उडून गेला,' असे उत्तर जीर्णधनाने मुद्दाम दिले तेव्हा त्या शेटजीने त्याच्याविरुद्ध न्यायालयात दावा केला.

न्यायाधीशाने विचारले, 'जीर्णधना, ससाण्यासारखा छोटासा पक्षी, शेटजींच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाची मान चोचीत पकडून दूर उडून जाणे शक्य आहे का?'

जीर्णधनाने उत्तर दिले, 'का शक्य नाही ? चार-सहा वर्षांपूर्वी मी बाहेरगावी जाताना, याच शेटजींकडे ठेवायला दिलेला बर्‍याच शेर वजनाचा लोखंडी तराजू जर याच्याकडला एक यःकश्चित् उंदीर कुरतडून खलास करू शकला, तर नदीवर आलेला तो बलदंड ससाणा याच्या मुलाची मानगूट चोचीत पकडून उडून जाण्यात यशस्वी झाला, यात अशक्य ते काय ?' त्याच्या या बोलण्याने तो न्यायाधीश त्याच्याकडे अचंबित नजरेने पाहू लागताच जीर्णधनाने पूर्वीच्या तराजू-प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत त्याला सांगितला. त्याबरोबर न्यायाधीश खदखदून हसला. मग त्याने त्या लबाड व्यापार्‍याला फैलावर घेतले आणि तो मुलगा व तो तराजू ज्याचा त्याला परत करण्याचे त्या दोघांना हुकूम फर्मावले.'

ही गोष्ट सांगून करटक दमनकाला म्हणाला, 'तुला स्वतःच्या बुद्धीचा जसा वाजवीपेक्षा अधिक अभिमान वाटू लागला आहे, तसाच त्या संजीवकाचा उत्कर्षही सहन होईनासा झाला आहे. म्हटलंच आहे ना ?

मूर्खाणां पण्डिता द्वेष्या निर्धनानां महाधनाः ।

व्रतिनः पापशीलनामसतीनां कुलस्त्रियः ॥

(पंडितांचा द्वेष किंवा हेवा मूर्ख लोक करतात, धनहीन धनवंताचा, पापी व्रतस्थांचा तर दुराचारी स्त्रिया कुलवान स्त्रियांचा करतात. )

'हे दमनका, स्वतःला शहाणा समजणार्‍याएवढा मूर्ख या जगात दुसरा कुणी नसतो. तू तसाच असल्यामुळे, तुझ्याशी प्रेमाचे संबंध ठेवल्याने, मूर्ख वानराशी मैत्री जोडल्यामुळे एका राजावर जसा मरणाचा प्रसंग ओढवला, तसा प्रसंग माझ्यावर ओढवेल.'

'राजाची व वानराची ती गोष्ट काय आहे?' असे दमनकाने विचारले असता करटक म्हणाला, 'काही वर्षांपूर्वीची गोष्ट -

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel