गोष्ट नववी

'संगत धरता दुष्टाची, शाश्वती नुरे जीविताची.'

एका राजाच्या शयनमहालातील पलंगावरच्या गाद्या-गिरद्यात 'मंदविसर्पिणी' नावाची एक पांढरी ऊ राहात होती. रात्री राजाला गाढ झोप लागली की, ती हळूहळू त्याचे रक्त पिई व सुखात राही.

एकदा तिच्याकडे 'अग्निमुख' नावाचा टपोरा ढेकूण आला. ती त्याला निघून जायला सांगू लागताच, तो म्हणाला, 'बाईसाहेब, घरी आलेल्या अतिथीला मानाने वागवावे, असे आपले धर्मशास्त्र सांगते. मी आजवर नेभळट माणसांचे बेचव रक्त प्यायलो, दुष्टांच्या कडू रक्ताची चव घेतली, भडक लोकांच्या तिखट रक्ताचा आस्वाद घेतला आणि आंबटशौकीन लोकांच्या रक्ताचीही रुची घेतली. पण गोड गोड पक्वान्नांवर ज्याचं शरीर पोसलं गेलं आहे, अशा एखाद्या राजाच्या गोड रक्ताचा मनसोक्त आस्वाद घेण्याची माझी इच्छा अजून अपुरी राहिली आहे. ती पूर्ण व्हावी, म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. तेव्हा आजची रात्र मला इथे आसरा द्या. बाईसाहेब, राव असो, रंक असो, प्रत्येकाला एकदा तरी चांगलं -चुंगल खावं -प्यावंस वाटतंच. म्हटलंच आहे ना?' -

रंकस्य नृपतेर्वापि जिव्हासौख्यं समं स्मृतम्

तन्मात्रं च स्मृतं सारं यदर्थ यतते जनः ॥

(रंक असो वा राजा असो, सर्वांमधे जिभेचे चोचले पुरविण्याची जागरूकता सारखीच असते. या जगात तीच तर महत्त्वाची गोष्ट मानली जाते व तिच्यासाठी लोकांची धडपड चाललेली असते.)

अग्निमुख पुढं म्हणाला, 'बाईसाहेब, मला बिलकूल उताविळी नाही. वाटल्यास तुम्ही प्रथम राजाचे रक्त पोटी-पोटभर पिऊन घ्या आणि मग त्याला माझ्या हवाली करा. मग तर झालं?' अग्निमुखाच्या या बोलण्यावर त्या मंदविसर्पिणीचा विश्वास बसला व तिने त्याला लपून राहण्यासाठी त्या पलंगाचा एक कोपरा दाखविला.

तेवढ्यात राजा आला व पलंगावर पहुडला. त्याला पाहताच, त्याचे गोड रक्त पिण्याच्या हव्यासामुळे त्या अग्निमुखातला उतावळेपणा जागृत झाला आणि मंदविसर्पिणीला आपण काय आश्वासन दिले आहे ते विसरून, त्याने राजाजवळ जाऊन त्याच्या मांडीचा कडकडून चावा घेतला. स्वभाव कुठे बदलतो ? म्हटलंच आहे ना ?-

स्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा ।

सुतप्तमपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम् ॥

(पाणी जरी कितीही तापविले तरी ज्याप्रमाणे ते पुन्हा थंड होते, त्याचप्रमाणे कितीही जरी उपदेश केला, तरी स्वभाव बदलणे अशक्य असते. )

त्या अग्निमुखाने घेतलेल्या चाव्यामुळे एखादी सुई टोचल्यासारखी वेदना होऊन, राजा अंथरुणातून उठला व त्याने महालाच्या दरवाजावर पहारा देणार्‍या सेवकाला तो ढेकूण शोधून मारण्याचा हुकूम दिला.

त्या 'राजद्रोही' ढेकणाला शोधून मारण्यासाठी त्या सेवकाने पलंगावरची अंथरुणे-पांघरुणे उलटीपालटी करायला सुरुवात करताच, त्या चपळ ढेकणाने पलंगाच्या चौकटीतील फटीत दडी मारली आणि त्या सेवकाला एका कोपर्‍यात चूपचाप बसलेली मंदविसर्पिणी दिसली. त्याबरोबर 'हीच ऊ महाराजांच्या मांडीला चावली असावी,' असा समज होऊन, त्या सेवकाने तिला चिरडून टाकले.

ही गोष्ट सांगून दमनक पिंगलकाला म्हणाला, 'महाराज, तापलेल्या लोखंडावर जर पाणी पडले, तर ते वाफारून नाहीसे होते आणि स्वाती नक्षत्रात, जर ते समुद्रातील एखाद्या शिंपल्यात पडले तर ते मोती बनते. वाईट व चांगल्या संगतीचा परिणाम असा भिन्नभिन्न होतो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की, आपल्या व राज्याच्या दृष्टीने पूर्ण कुचकामी असलेल्या त्या कपटी व गवतखाऊ संजीवकाच्या संगतीत आपण निदान यापुढे तरी राहू नका. आपल्या माहितीतल्या लोकांना दूर सारून, जो परक्यांना जवळ करतो त्याच्यावर - जसा त्या ककुद्रमावर ओढवला तसा - मरण्याचा प्रसंग ओढवतो.'

'तो कसा काय ?' असा प्रश्न पिंगलकाने केला असता दमनक सांगू लागला-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel