गोष्ट त्र्याहत्तरावी

क्षुल्लक मानू नये कुणाला, प्रसंगी महत्त्व प्रत्येकाला.

एका गावात 'ब्रह्मदत्त' नावाचा एक ब्राह्मण तरुण राहात होता. एकदा तो बाहेरगावी जायला निघाला असता, त्याची आई त्याला म्हणाली, 'बाळा, तू असा एकटा प्रवास करू नकोस. प्रवासात नेहमी कुणालातरी सोबतीला घ्यावे.'

'पण आई, मी जाणार असलेल्या मार्गावर कुणाचेच भय नसल्याने, मला कुणाच्याही सोबतीची गरज नाही.' असे ब्रह्मदत्त म्हणाला असतानाही, त्याच्या आईने परसदारी असलेल्या विहिरीतून एक खेकडा आणला आणि एका कापडाच्या तुकड्यात कापरांच्या वड्यांसह तो घालून व कापडाची पुरचुंडी करून, तिने तो खेकडा सोबतीसाठी त्याच्या स्वाधीन केला.

बाहेरगावची वाट चालता चालता उन्हे उभी राहिल्याने तो तरुण वाटेत लागलेल्या एका छायाळ वृक्षाखाली विश्रांतीसाठी म्हणून आडवा झाला आणि पडल्या पडल्या त्याचा डोळा लागला. तेवढ्यात एका वृक्षाच्या ढोलीतून एक जहरी नाग बाहेर पडला व त्या तरुणापाशी गेला. पण त्याच्याजवळच असलेल्या त्या पुरचुंडीतून कापराचा वास बाहेर पडू लागल्याने व सापाला कापूर प्रिय असल्याने, तो आपल्या अणकुचीदार दातांनी ती पुरचुंडी उलगडू लागला. ती तशी उलगडली जाताच, तिच्यातून बाहेर पडलेल्या खेकड्याने आपल्या नांग्यांच्या कैचीत त्या नागाचे मानगूट आवळून त्याला ठार केले. जाग आल्यावर जेव्हा त्या तरुणाच्या दृष्टीस - आपण झोपेत असताना घडलेला प्रकार कळला, तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, 'आई म्हणाली तेच खरे. या जगात कुठलीच गोष्ट क्षुल्लक नसते. प्रसंग येताच तिचे महत्त्व पटते. मग आपल्या आईच्या धोरणी वृत्तीचे मनात कौतुक करीत तो तरुण पुढल्या वाटेला लागला.'

चक्रधराने ही गोष्ट सांगताच सुवर्णसिद्धी त्याला म्हणाला, 'मित्रा, खेकडा हा कितीही जरी क्षुद्र असला, तरी सर्पाची मानगूट पकडून त्याला मारण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते. इथे तसे नाही. कुबेराच्या सेवकांनी दिलेल्या शिक्षेतून तुझी सोडवणूक करायला गेलो, तर माझ्याही पाठीशी अशीच एखादी भयंकर उपाधी लागण्याची शक्यता आहे. तेव्हा तांब्याच्या खाणीवर व रुप्याच्या खाणीवर संतुष्ट असलेले आपले ते दोन मित्र वाट पहात राहिले असल्याने, त्यांच्या संगतीसोबतीने गावी जाणे मी पसंत करतो.' असे म्हणून सुवर्णसिद्धी निघून गेला.

अशा या मनोरंजक पण बोधप्रद गोष्टी त्या तीन राजकुमारांना सांगून 'पंचतंत्राच्या' पाचव्या तंत्राची समाप्ती करताना विष्णुशर्माने त्यांना मुद्दामच विचारले, 'बाळांनो, या गोष्टी ऐकण्यात तुमचा वेळ चांगला गेला ना?' यावर ते राजकुमार नम्रपणे अभिवादन करून म्हणाले, 'गुरुदेव, आयुष्याचा मौल्यवान वेळ नुसत्याच मनोरंजनात घालविणे, हे निष्क्रियतेचे व सामान्य बुद्धी असल्याचे लक्षण आहे. आयुष्याचा क्षण अन् क्षण सत्कारणी लावला पाहिजे. या मनोरंजक पण बोधप्रद गोष्टींतून आपण आम्हाला या जगाकडे पाहण्याची व या जगात वागण्याची एक नवी दृष्टी दिलीत. आपण दिलेली ही 'शिदोरी' घेऊन, आम्ही आयुष्याची पुढली वाटचाल यशस्वीपणे करू. फक्त आपले आशीर्वाद आम्हाला द्या.'

विष्णुशर्मा हात उंचावून म्हणाला, 'तथास्तु !'

॥ पाचवे तंत्र समाप्त ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel