गोष्ट बेचाळिसावी

नशीब व प्रयत्‍न एकत्र येती आणि प्राण्याचे भविष्य घडविती.

'देवशक्ती' नावाच्या एका राजाच्या मुलाच्या पोटात नाग वाढू लागल्याने, त्याची अन्नपाण्यावरील वासना उडाली आणि त्याची प्रकृतीही दिवसानुदिवस अधिकाधिक खंगत चालली. अखेर एके दिवशी तो राजकुमार कुणाला न सांगतासवरता दुसर्‍या राज्यातल्या एका गावी गेला व एका देवळात राहू लागला.

त्या राज्याच्या राजाला दोन राजकन्या होत्या. त्या राजाने एकदा त्या राजकन्यांना 'तुमचे सुख कुणाच्या हाती ?' असा प्रश्न केला असता मोठी राजकन्या म्हणाली, 'बाबा, माझे सुख तुमच्या हाती.' तर धाकटी म्हणाली, 'माझे सुख, माझे नशीब व प्रयत्‍न यांच्या हाती.'

धाकटीच्या या उत्तराने रागावलेल्या राजाने तिचे लग्न मुद्दाम त्या देवळात राहणार्‍या अस्थिपंजर राजकुमाराशी लावून देऊन तो तिला म्हणाला, 'तुझे सुख तुझ्या दैवाच्या व प्रयत्‍नाच्या हाती आहे ना ? मग आता तू सुखी होऊन दाखव.'

'आपला पती आपल्याला साजेसा नसला तरी त्याचा यात काही अपराध नाही,' हे लक्षात घेऊन ती राजकन्या त्याची मनोभावे सेवा करी. थोड्याच दिवसांत ती त्याला घेऊन दूरच्या गावी गेली व एका तळ्याच्या काठी त्याच्यासह उतरली. मग पतीला सामानाची राखण करायला सांगून ती स्वैपाकाचे काही जिन्नस आणायला गावात गेली. पण जिन्नस घेऊन ती परत येते तो, एक वेगळाच प्रकार तिच्या दृष्टीस पडला. तिचा पती गाढ झोपला होता. त्याच्या पोटातला नाग त्याच्या तोंडावाटे बाहेर येऊन, जवळच्या वारुळातून बाहेर आलेल्या दुसर्‍या नागाशी मनुष्यवाणीने काहीतरी बोलत होता. त्या राजकन्येने एका झाडाआड दडून, त्या दोन नागांचे बोलणे ऐकायला सुरुवात केली.

त्या राजपुत्राच्या तोंडातून बाहेर आलेल्या नागाला तो वारुळातला नाग म्हणाला, 'त्या निरपराध राजपुत्राच्या पोटात राहून तू त्याला विनाकारण का त्रास देतोस ? एखाद्या नामवंत वैद्याच्या सल्ल्याप्रमाणे जर तो राजपुत्र मिर्‍यांचे पाणी प्यायला तर तू तडफडत बाहेर येशील व थोड्याच वेळात मरून जाशील.'

यावर राजपुत्राच्या पोटातून बाहेर पडलेला नाग त्या वारुळातील नागाला म्हणाला, 'तू तरी रत्‍नामोहरांनी भरलेले हंडे पुरलेल्या जागी मुद्दाम वारूळ उभारून, ती अपार संपत्ती का वाया घालवतोस ? त्या वारुळात अपार धन असल्याचे कुणाला कळले, आणि त्याने जर त्या वारुळात उकळते तेल वा पाणी ओतले, तर तुला तडफडून मरण येईल व त्या माणसाच्या हाती ते अपार धन जाईल.' त्यांचा तो संवाद झाडाआडून ऐकून राजकन्येने ते दोन्हीही उपाय प्रत्यक्ष आचरणात आणले आणि आपल्या पतीला त्या सापाच्या उपाधीतून मुक्त करून, त्या वारुळाखालचे अपार धनही मिळविले. मग ते दोघेही अत्यंत सुखी जीवन जगू लागले.'

ही गोष्ट सांगून मंत्री प्राकारकर्ण राजा अरिमर्दनाला म्हणाला, 'म्हणून मी म्हणतो की, आपला शत्रू मेघवर्ण याचा नायनाट करण्यासाठी आपण या स्थिरजीवीचा उपयोग करून घ्यावे व आपले काम झाल्यावर या स्थिरजीवीलाही त्या मेघवर्णाच्याच मार्गाने पाठवावा.'

मंत्री प्राकारकर्ण याचा सल्ला पटल्यामुळे राजा अरिमर्दन हा आपले मंत्री, अनुयायी व स्थिरजीवी यांच्यासह आपल्या किल्ल्याकडे जाऊ लागला असता त्याचा पहिला मंत्री रक्ताक्ष हा पुन्हा राजाला म्हणाल, 'महाराज, या स्थिरजीवीचा भरंवसा देता येत नसल्याने, याला ताबडतोब मारण्याचा माझा सल्ला आपण झुगारून देऊन, ज्यांचा सल्ला आपल्या हिताचा नाही, त्यांचे आपण ऐकता, याचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाहीत.

म्हटलंच आहे -

अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानां तु

त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्भिक्षं मरणं भयम् ॥

(जिथे नादानांना मान दिला जातो आणि पूजनीय अपमानिले जातात तिथे दारिद्र्य, मृत्यु व भय या तीन गोष्टी वास करतात.)

जिवाच्या तळमळीने मंत्री रक्ताक्ष पुढे म्हणाला, 'समजा, आज जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा स्थिरजीवी आपल्याला येऊन मिळाला असला, तरी अखेर तो जातीने कावळा असल्याने, त्याला त्याच्या जातभाईंबद्दलच आपुलकी वाटणार. म्हणून तर एका उंदरीने अन्य जातीची मातबर स्थळे नाकारून, शेवटी एका क्षुद्र उंदराशीच लग्न केले ना ?'

'ती गोष्ट काय आहे ?' असे काही घुबडांनी विचारता रक्ताक्ष सांगू लागला-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel