गोष्ट चौसष्ठावी

ज्यांचे ज्ञान नुसतेच पुस्तकी, त्यांचे हसे होई या लोकी.

एका गावातले चार ब्राह्मण तरुण विद्यावंत होण्यासाठी कनोज शहरी गेले. तिथे गुरूकडे असलेले सर्व ग्रंथ त्यांनी - खोलात न जाता - मुखोद्‌गत केले आणि मग गुरूची परवानगी घेऊन, ते आपल्या गावाकडे जायला निघाले.

चालता चालता रस्त्याला आणखी एक फाटा फुटलेला त्यांना दिसला. 'आता डाव्या रस्त्याने जायचे की उजव्या? ' असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. योगायोगाने त्याच वेळी डाव्या फाट्याने बरीच माणसे एका वाण्याच्या मुलाचे प्रेत नेताना त्यांच्या दृष्टीस पडली. त्यांना पाहुन त्या चौघांपैकी एक पढतमुर्ख टाळी वाजवून म्हणाला, 'महाजनो येन गतः स पन्थः । म्हणजे बरेच लोक ज्यावरून जात असतात तोच (योग्य) मार्ग समजावा असं शास्त्र सांगतं. मग ते लोक चालले आहेत, त्यांच्या पाठीमागेच जाऊ या की !' त्याचे हे म्हणणे बाकीच्या तिघांनाही पटले व चौघेही त्या लोकांमागोमाग स्मशानात पोहोचले.

तिथे एक गाढव उभे होते. त्याला पाहून दुसरा पढतमूर्ख आपल्या मित्रांना म्हणाला, 'ज्या अर्थी प्रत्यक्ष स्मशानातसुद्धा हा आपल्यासंगे उभा आहे त्या अर्थी हाच आपला हितचिंतक व नातेवाईक आहे. कारण माझ्याजवळच्या ग्रंथात स्पष्टपणे सांगितलं आहे-

उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुसंकटे ।

राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ॥

(उत्सवप्रसंगी, संकटात, दुष्काळात, शत्रूपासून धोका उत्पन्न झाला असता, राजाच्या दरबारात; एवढेच नव्हे, तर स्मशानातसुद्धा जो आपल्यामागे उभा राहतो तोच खरा आप्त.)

आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्याने ग्रंथ उघडून ते वचन दाखविताच बाकीच्या तिघांनाही त्याचे म्हणणे पटले व ते त्या गाढवापाशी जाऊन त्याचे मोठ्या प्रेमाने लाड करू लागले.

तेवढ्यात तिथून जलदगतीने चालेल्या उंटाला पाहून व हा प्राणी कोण आहे ? - हे जाणून घेण्यासाठी आपल्याजवळचा ग्रंथ उघडून तिसरा शहाणा म्हणाला, 'अहो ! धर्मस्य त्वरिता गतिः । म्हणजे धर्म हा कुणासाठी थांबत नाही, असं ज्या अर्थी शास्त्रवचन आहे व ते ज्या अर्थी या प्राण्याला लागू पडत आहे, त्या अर्थी हा वेगाने चाललेला प्राणी धर्मच असला पाहिजे.'

यावर चौथा शहाणा म्हणाला, 'तुझं म्हणणं बरोबर आहे. पण ज्या अर्थी माझ्याजवळच्या ग्रंथात 'इष्टं धर्मेण योजयेत् । म्हणजे 'आपल्याला योग्य वा प्रिय असलेल्या गोष्टींची धर्माशी सांगड घालावी,' असे सांगितले आहे, त्या अर्थी आपण आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या गाढवरूपी नातेवाईकाची सांगड करून ती या 'धर्मा' च्या गळ्यात बांधू या.' त्या शहाण्याचे हे म्हणणे बाकीच्या तिघांनाही पटल्याने, त्यांनी त्या गाढवाला ओढत त्या उंटाकडे नेले व त्याला त्या उंटाच्या गळ्यात बांधू लागले. तेवढ्यात गाढवाचा मालक तिथे आला आणि त्याने त्या चौघांनाही काठीने चोप दिल्यामुळे त्यांनी तिथून पोबारा केला.

पुढे वाटेत एक नदी लागली. तिला पाणी बरेच असल्याने पैलथडी कसे जायचे - असा त्यांना प्रश्न पडला. पण त्यांच्यापैकी एका शहाण्याच्या एका ग्रंथात 'आगमिष्यति यत्पत्रं तदस्मांस्तारयिष्यति । (प्रसंगी जरी एका पानाचा आधार मिळाला, तरी ते आपल्याला तारू शकते.) हे वचन आढळले. त्याने तो शास्त्राधार आपल्या सहकार्‍यांना म्हणून दाखवून तो त्या नदीतल्या पाण्यातून वाहात चाललेल्या पळसाच्या पानावर बसू लागला. पण त्या खटपटीत तो बुडू लागला. तेव्हा दुसरा शहाणा म्हणाला,

सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः ।

अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशो हि दुःसहः ॥

(सर्वनाश होण्याचा प्रसंग आला असता, सूज्ञ अर्ध्यावर पाणी सोडतो. कारण उरलेल्या अर्ध्याने काहीतरी कार्यभाग साधता येतो. पण सर्वस्वाचा नाश असह्य होतो.)

याप्रमाणे बोलून व आपल्या बुडणार्‍या सहकार्‍याची शेंडी पकडून, त्याने त्याचे मुंडके कापून घेतले आणि 'चला, पूर्ण मित्रालाच काही मुकावे लागले नाही,' असे म्हणून तो व त्याचे दोन सहकारी कसेतरी पुढे प्रवास करू लागले.

मग ते मुंडके विधीपूर्वक जाळून ते तिघे वाटेला लागलेल्या एका गावात शिरले. त्या गावात त्यांना तीन गावकरी भेटले. त्यांच्यापैकी प्रत्येकाने एकेकाला आपापल्या घरी जेवायला बोलावले. त्यांच्यापैकी एकासाठी यजमानाने बायकोला शेवया करायला सांगितल्या. पानात शेवयांचे लांब लांब धागे पाहताच त्या पाहुण्या पंडिताला 'दीर्घसूत्री विनश्यति ।' हे शास्त्रवचन आठवले. वास्तविक त्या शास्त्रवचनाचा अर्थ 'कुठल्याही कामात दिरंगाई करणारा नाश पावतो' असा होता. पण त्या शहाण्याने या वचनाचा अर्थ 'लांब धागे ज्याच्याकडे असतात तो नाश पावतो.' असा घेतला व तो पानावरून पळून गेला.

दुसरा 'शहाणा' ज्याच्या घरी गेला होता त्याची बायको मांडे करीत होती. विस्तवात पटकन् फुगून मोठे होणारे मांडे पाहून त्या शहाण्याला एक शास्त्रवचन आठवलं -

अति विस्तारविस्तीर्णं न तद्भवेत् चिरायुषम् ।

(ज्याचा वेगाने विस्तार होतो ते लवकर नाश पावते.)

'मग हे असले अन्न खाण्यात काय अर्थ ?' - असे म्हणून तोही रात्रीच्या अंधारातून पळून गेला.

तिसरा पुस्तकी पंडित ज्या घरी गेला, त्याच्या पानात यजमानिणीने आंबोळी वाढली होती. तिला पडलेली छिद्रे पाहून तो यजमानाला म्हणाला, 'अहो महाराज, शास्त्रात स्पष्टपणे सांगितलं आहे की, 'छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ।' म्हणजे एखाद्या गोष्टीला एकदा छिद्रे पडली की त्या छिद्रांमधून संकटपरंपरा सुरू होते. सदर्‍याला एक भोक पडले की, तो फाटू लागतो. नौकेच्या तळाशी एक छिद्र पडले तरी, ती बुडू लागते. पण या आंबोळीला तर शेकडो छिद्रे आहेत. तेव्हा अनेक संकटांना कारणीभूत होणारी ही आंबोळी मी कशी खाऊ ?' असे म्हणून तोही पुस्तकी पंडित उपाशी पोटी निघून गेला.'

ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी चक्रधराला म्हणाला, 'म्हणून मी म्हणालो, नुसती विद्वत्ता उपयोगाची नाही. व्यवहारबुद्धीही हवी.'

यावर चक्रधर बोलू लागला, 'या सगळ्या दैवाच्या गोष्टी आहेत. म्हणून तर शतबुद्धी व सहस्त्रबुद्धी हे मासे त्या कोळ्याच्या हाती लागले आणि ते बेडूक जोडपे मात्र सामान्यबुद्धीचे असूनही सुखात राहिले.' हे ऐकून सुवर्णसिद्धाने 'ते कसे?' असे विचारले असता चक्रधर म्हणाला, 'नीट ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel