गोष्ट पंचावन्नावी

ज्याला स्वाभिमान नसे, त्याच्या कमरेत लाथ बसे.

विकण्टक नावाच्या नगरीत 'ईश्वर' नावाचा एक मध्यम परिस्थितीतील गृहस्थ राहात होता. एकदा त्याचे चारही जावई त्याच्याकडे पाहुणे म्हणून आले. ईश्वर व त्याची पत्‍नी यांनी त्यांचे चांगले आगतस्वागत केले व त्यांना जेवूखाऊ घातले. पण पुरते सहा महिने होऊन गेले तरी ते जाण्याचे नाव काढीनात. तेव्हा ईश्वर आपल्या बायकोला म्हणाला, 'आपले जावई भलतेच चिवट आहेत. त्यांचा अपमान केल्याशिवाय ते निघून जाणार नाहीत. म्हणून आज जेवणाच्या वेळी तू त्यांना पाय धुवायला पाणी देऊ नकोस.' बायकोने ही सूचना अंमलात आणताच फक्त मोठा जावई तेवढा रागाने निघून गेला.

दुसर्‍या दिवशी त्या गृहस्थाच्या सूचनेवरून त्याच्या बायकोने उरलेल्या तिघा जावयांना बसायला अगदी लहान पाट दिले. तेव्हा क्रमांक दोनचा जावई डोक्यात राख घालून घरी निघून गेला.

तिसर्‍या दिवशी सासूने पतीच्या सूचनेनुसार त्या उरलेल्या दोन जावयांना ताटांत आदल्या दिवशीचे उरलेले शिळे अन्न वाढले. त्यामुळे तिसर्‍या क्रमांकाच्या जावयाच्या रोमारोमात अंगार फुलला आणि पाय आदळीत आपटीत तोही निघून गेला. उरलेला चौथा जावई मात्र कुठलाच अपमान मनाला लावून घेत नसल्याचे पाहून, सासर्‍याने त्याला गचांडी देऊन घालवून लावला.

ताम्रमुख ही गोष्ट पूर्ण करतो न करतो तोच समुद्रातला एक प्राणी नजिकच्या किनारी आला आणि त्या मगराला उद्देशून म्हणाला, 'मगरमामा, त्या जांभूळखाऊ वानराचे गोड काळीज आणून देण्याचे वचन देऊन तुम्ही घरातून बाहेर पडल्याला बराच वेळ झाला तरी परत आला नाहीत, तेव्हा तुमचे आता बायकोवर प्रेम उरले नाही, असा समज करून घेऊन मगरमामींनी देहान्त करून घेतला.'

हे वृत्त ऐकून तो मगर मोठ्याने रडत रडत म्हणाला, 'अरेरे ! किती दुर्दैवी मी ! म्हटलंच आहे ना ?-

माता यस्य गृहे नास्ति भार्या च प्रियवादिनी ।

अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ।

(ज्याच्या घरात आई व गोड बोलणारी पत्‍नी नसते, त्याने बेशक अरण्यात जावे, कारण त्याच्या दृष्टीने अरण्य व घर ही सारखीच असतात.)

याप्रमाणे रडता रडता मधेच 'आता मी काय करू?' अशा प्रश्न त्याने ताम्रमुखाला विचारला असता तो म्हणाला, 'अरे मूर्खा, जिने तुला तुझ्या मित्राला कपटाने मारण्याचा सल्ला दिला व तुला घरी परतायला जर उशीर होताच संशयाने ग्रासून जिने देहान्त करून घेतला अशा स्त्रीला काय बायको म्हणायचं? म्हटलंच आहे ना ?

या भार्या दुष्टचरिता सततं कलहप्रिया ।

भार्यारूपेण सा ज्ञेया विदग्धैर्दारुणा जरा ॥

(जी बायको वाईट वागणुकीची असून नेहमी भांडण करण्यात गोडी मानणारी असते, ती बायको नसून बायकोच्या रूपाने अवतरलेली पण वृद्धपण आणणारी एक ब्यादच असते.)

मगर म्हणाला, 'तू म्हणतोस तो मुद्दा जरा बाजूला ठेवू. पण बायकोपरी बायको गेली आणि तुझ्यासारख्याशी असलेली मैत्रीही संपुष्टात आली. तेव्हा आता मी काय करू ? कारण माझी गत त्या गोष्टीतल्या शेतकर्‍याच्या बायकोसारखी झाली आहे.'

यावर म्हणजे कशी ?' अशी पृच्छा त्या वानराने केली असता तो मगर सांगू लागला-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel