गोष्ट पंधरावी

ऐक्य जिथे असे, यश तिथे वसे.

एका वनातील तमालवृक्षाच्या फांदीवर चिमणाचिमणीचे एक जोडपे घरटे बांधून राहात होते. त्या घरट्यात चिमणीने अंडी घातली होती. एकदा दुपारच्या वेळी एक मदोन्मत्त हत्ती सावलीसाठी त्या वृक्षाखाली येऊन उभा राहिला. विसावा घेता घेता त्याने काही एक कारण नसता त्या चिमणाचिमणीचे घरटे असलेली फांदी मोडून टाकली. त्यामुळे त्या घरट्यात असलेली त्या चिमणीची सर्व अंडी खाली जमिनीवर पडून फुटून गेली. ती चिमणाचिमणी मात्र कशीबशी वाचली.

आपली सर्व अंडी फुटल्याचे पाहून ती चिमणी मोठमोठ्याने रडत असता, आणि स्वतःही दुःखी झालेला चिमणा तिची समजूत घालत असता, 'काष्ठकूट' नावाचा एक सुतारपक्षी तिथे आला व चिमणीला म्हणाला, 'चिमूताई, अशा रडू नका. तुम्ही आता कितीही जरी रडलात, तरी फुटून नाश पावलेली अंडी काही तुम्हाला परत मिळणार नाहीत. म्हटलंच आहे -

नष्टं मृतमतिक्रान्तं नानुशोचन्ति पण्डिताः ।

पण्डितानां च मूर्खाणां विशेषो‍यं यतः स्मृतः ॥

(नष्ट, मृत किंवा नाहीशा झालेल्यांसाठी सूज्ञ लोक शोक करीत नाहीत. सूज्ञ व मूर्ख यांच्यात हाच तर विशेष फरक मानला जातो.)

चिमणी म्हणाली, 'हे काष्ठकूटा ! आमचा मित्र व हितचिंतक म्हणून तू नुसता शुष्क उपदेश करण्याऐवजी, त्या दुष्ट हत्तीचा वध होऊ शकेल, असा काहीतरी उपाय आम्हाला सांग. कारण आपले वाईट करणार्‍याला योग्य ते शासन मिळाले की, कुणालाही बरे वाटते.'

काष्ठकूट म्हणाला, 'चिमूताई, तुमचं म्हणणं खरं आहे. नुसता उपदेश कुणीही करू शकतो. संकटात खरेखुरे सहाय्य करतो, तोच मित्र. म्हटलंच आहे-

स सुह्रद् व्यसने यः स्यात् स पुत्रो यस्तु भक्तिमान् ।

स भृत्यो यो विधेयज्ञः सा भार्या यत्र निर्वृतिः ॥

(संकटाचे वेळी जो धावून येतो तो मित्र, ज्याची मायपित्यांवर भक्ती असते तो पुत्र, जो जाणून कामे करतो तो सेवक आणि जिच्यापासून मनाला दिलासा मिळतो, तीच खरी पत्‍नी.)

काष्ठकूट पुढे म्हणाला, 'चिमूताई, तुमची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्याला जिचा मोठा उपयोग होईल, अशी एक बुद्धिवान् माशी माझ्या ओळखीची आहे. तिचा आपण सल्ला घेऊ.'

यानंतर तो सुतार पक्षी चिमणा-चिमणीसह एका माशीकडे गेला व घडलेला प्रकार तिच्या कानी घालून तिला म्हणाला, 'माशीमावशी, अशा त्या उन्मत्त हत्तीचा जर वेळीच वध केला नाही, तर तो 'आपल्याला हटकणारे कुणी नाही,' अशा समजुतीने आपल्यासारख्या दुर्बळांना असाच छळीत राहील. तेव्हा त्याच्या नाशाचा एखादा नामी उपाय तू सांग.'

माशी म्हणाली, 'निरपराध जीवांना त्रास देणार्‍या त्या हत्तीला मारले हे पाहिजेच. पण या बाबतीत आपण माझा मित्र असलेल्या 'मेघनाद' नावाच्या विद्वान् बेडकाचा सल्ला प्रथम घेऊ. कारण म्हटलंच आहे-

हितैः साधुसमाचारैः शास्त्रज्ञैर्मतिशालिभिः ।

कथंचिन्न विकल्पन्ते विद्वद्बिश्चिन्तिता नयाः ॥

(हितचिंतक, सज्जन, शास्त्र जाणणारे व बुद्धिवंत यांना विचारून जे बेत केले जातात, ते कधीही असफल होत नाहीत.)

मग चिमणा-चिमणी व तो काष्ठकुट पक्षी यांच्यासह ती माशी त्या विद्वान् बेडकाकडे गेली आणि चिमणाचिमणीवर गुदरलेल्या संकटाची तिने कल्पना दिली. त्यानंतर तिने त्या बेडकाला त्याला प्रश्न केला, 'बेडूकराव, त्या माथेफिरू हत्तीला मारण्याचा तुम्हाला एखादा उपाय सुचतो का?'

यावर तो बेडूक म्हणाला, 'हात्तिच्या ! ऐक्य व युक्ती यांच्या बळावर आपण त्या हत्तीला सहज मारू शकू. दुपारच्या वेळी तो एखाद्या झाडाच्या सावलीत आराम करीत बसला असता, माशीमावशीने त्याच्या कानात गोड आवाजात गुणगुणावे. त्या गोड आवाजाने धुंद होऊन त्या हत्तीने, त्याचे डोळे अर्धवट मिटले असता, काष्ठकूटाने स्वतःच्या अणकुचीदार चोचीने त्याचे दोन्ही डोळे झटपट फोडून त्याला आंधळे करावे, आणि तो आंधळा हत्ती तहान लागल्यावर पाणी पिण्याकरिता नेहमीच्या सरोवराकडे चाचपडत चालला असता, मी माझ्या परिवरासह वाटेतील एका खोल खड्ड्यापाशी डरॉँव डरॉँव ओरडत बसावे. आमचा आवाज कानी पडला की, इथेच सरोवर असावे, असा समज होऊन तो आंधळा हत्ती त्या खड्ड्याकडे जाईल, व त्यात कोसळून तहानभुकेने चार-दोन दिवसांत त्याला मृत्यु येईल.' मेघनाद बेडकाने सुचविलेल्या युक्तीनुसार त्या सर्वांनी केले व त्या उन्मत्त हत्तीला जिवे मारले.'

ही गोष्ट सांगून टिटवी त्या टिटव्याला म्हणाली, 'तेव्हा नाथ, तुम्हीसुद्धा अशीच युक्तिवंतांची व बुद्धिवंताची मदत घ्या, म्हणजे त्या समुद्राला जिरविण्याची तुमची इच्छा तडीस जाईल.'

पत्‍नीचे म्हणणे पटल्यामुळे त्या टिटव्याने बगळा, सारस, मोर इत्यादी पक्ष्यांना एकत्र जमवून त्यांच्यापुढे आपले दुःख उघड केले व समुद्राला कोरडा करण्याच्या कार्यात आपल्याला मार्गदर्शन करण्यास त्यांना सांगितले.

टिटव्याचे म्हणणे ऐकून घेऊन ते पक्षी म्हणाले, 'टिटवोजी, तुम्हा जोडप्यावर ओढवलेल्या संकटाबद्दल आम्हालाही दुःख होते. पण आपले दुःख अशांपाशी उघड करावे की, जे ते दुःख दूर करू शकतील. या बाबतीत पक्ष्यांचा बलशाली राजा गरुड याचा आपल्याला निश्चितच उपयोग होईल. तेव्हा आपण त्याच्याकडे जाऊ या. म्हटलेच आहे ना ?-

सुह्रदि निरन्तरचित्ते गुणवति भृत्येऽनुवर्तिनी कलत्रे ।

स्वामिनि शक्तिसमेते निवेद्य दुःखं सुखी भवति ॥

(ज्याचे मनाला नित्य स्मरण होते असा मित्र, गुणवान सेवक, मनाप्रमाणे वागणारी पत्‍नी आणि सामर्थ्यसंपन्न स्वामी यांनाच दुःख सांगितले असता सांगणारा सुखी होतो. )

याप्रमाणे बोलणे झाल्यावर ते सर्व पक्षी त्या टिटवा -टिटवीसह गरुडाकडे गेले. आणि आपल्या येण्यामागचा हेतु त्याच्यापुढे उघड करून त्याला म्हणाले, 'महाराज, आज त्या समुद्राने या टिटवा-टिटवीची अंडी पळवून एक प्रकारे आपल्या अखिल पक्षीजातीचीच खोडी काढली आहे. ती जर आपण पचू दिली, तर उद्या दुसरा कुणीतरी आपली अशीच खोडी काढील. लोकांना काय ? एक करतो तसे इतर करू लागतात. म्हटलंच आहे ना ? -

एकस्य कर्म संविख्ष्य करोत्यन्योऽपि गर्हितम् ।

गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः ॥

(एखाद्याला एखादी गोष्ट करताना पाहून - ती जरी वाईट असली तरी - दुसराही तशीच गोष्ट करू लागतो. लोक गतानुगतिक - म्हणजे रुळलेल्या मार्गाने जाणारे - असतात. लोक सत्याच्या मुळाशी जात नाहीत.)

ते पक्षी पुढे म्हणाले, 'महाराज, आपण आमचे राजे. राजा म्हणजे आम्हा प्रजेचं सर्वस्व. म्हटलंच आहे ना ? -

राजा बन्धुरबन्धूनां राजा चक्षुरचक्षुषाम् ।

राजा पिता च माता च सर्वेषां न्यायवर्तिनाम् ॥

(ज्यांना भाऊ नसतो, त्यांचा राजा भाऊ होतो, ज्यांना डोळे नसतात, त्यांचे राजा डोळे होतो. राजा हा न्यायाने गावकर्‍यांच्या जणू मातापित्यांच्या ठिकाणी असतो.)

त्या पक्ष्यांचे एकूण म्हणणे पटल्यामुळे, 'समुद्राकडून टिटवा-टिटवीवर झालेला अन्याय कसा दूर करायचा, 'याबद्दल तो गरुड विचार करू लागला. तेवढ्यात भगवान् विष्णूंचा दूत त्याच्याकडे आला व म्हणाला, 'हे पक्षीराज, भगवंतांना काही तातडीच्या कामासाठी तुझ्यावर बसून अमरावतीस जायचं आहे, म्हणून त्यांनी तुला आत्ताच बोलावलंय.'

आलेल्या संधीचा उपयोग करून घेण्याचा विचार मनात येऊन, गरुड त्याला म्हणाला, 'दूता, भगवंतांना सांग की, आजवर मी कधीही आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले नाही. पण त्यांच्या आश्रयाने राहणारा समुद्र हा जोवर माझ्या प्रजाजनांतील टिटवा-टिटवीची अंडी परत करीत नाही, तोवर मला भगवंतांच्या सेवेत राहायची इच्छा नाही. त्यांनी वाटल्यास माझ्या जागी दुसर्‍या एखाद्या पक्ष्याची नेमणूक करावी.'

कधीही अशी उद्धटपणाची भाषा न बोलणारा गरुड, आजच असे का बोलत आहे, याबद्दल त्या दूताने त्याच्याकडून सर्व माहिती मिळविली व भगवंतांकडे जाऊन त्यांच्या कानी घातली. ती ऐकून भगवान् म्हणाले, 'यात माझ्या गरुडाची चूक नाही. त्याच्या प्रजाजनांतील कुणाचाही अपमान जसा त्याचा आहे, तसाच तो माझाही आहे आणि गरुडासारख्या माझ्या निष्ठावंत सेवकाचे गार्‍हाणे दूर करणे, हे माझे कर्तव्यच आहे. म्हटलेच आहे ना ? -

भक्तं शक्तं कुलीनं च न भृत्यमपमानयेत् ।

पुत्रवत् लालयेत् नित्य य इच्छेत् श्रियमात्मनः ॥

(ज्याला आपले हित साधण्याची इच्छा असेल, त्याने आपल्यावर भक्ती करणार्‍या शक्तिमान् व कुलीन सेवकाचा कधीही अपमान करू वा होऊ देऊ नये. त्याचे पोटच्या पोराप्रमाणे लालनपालन करावे. )

याप्रमाणे बोलून भगवान् विष्णु स्वतः गरुडाकडे गेले. मग त्यांनी त्याची समजूत घालून व त्याच्यावर आरूढ होऊन ते समुद्राकडे गेले आणि त्याने टिटवीची अंडी होती त्या स्थितीत परत न केल्यास, त्याच्यावर अग्न्यस्त्र सोडण्याचे त्याला भय दाखविले. त्याबरोबर हातून घडलेल्या अपराधाबद्दल समुद्राने भगवंतांची क्षमा मागितली व टिटवीची अंडी त्याने निमूटपणे परत केली.'

या गोष्टी सांगून दमनक कोल्हा त्या संजीवक नावाच्या बैलाला म्हणाला, 'मित्रा, मला सांगायचं आहे ते हेच की, दुर्बळाला जरी थोरामोठ्याचा आधार मिळाला, तरी तो दुर्बळ प्रबळ होतो, मग पिंगलकमहाराज हे स्वतः तर प्रबळ आहेतच, आणी त्यातून पार्वतीदेवीचे ते वाहक असल्यामुळे तिचेही त्यांना पाठबळ आहे. तेव्हा तू त्यांच्या वाटेस न जाता, इथून पळ काढावास हेच बरे.'

संजीवक म्हणाला, 'दमनका, त्या गोष्टीचा निर्णय मी नंतर घेईन. तू मला अगोदर हे सांग की, समजा, मी त्या पिंगलकाची भेट घेतलीच, तर तो माझ्यावर रागावला आहे, हे मी कसे काय ओळखू ?'

दमनक म्हणाला, 'ते ओळखणे सोपे आहे. तुला त्यांचे डोळे लाल झालेले दिसतील, अंगावरचे केस उभे राहिलेले दिसतील आणि शिवाय तुला पाहून ते जिभल्या चाटू लागतील. मग तर तुझी खात्री होईल ना ? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. ही गोष्ट मी तुला सांगितल्याचे तू कुणापाशी चुकूनही बोलू नकोस. पण हा सर्व पाल्हाळ हवाच कशाला ?

स्वतःचा जीव वाचविण्याच्या दृष्टीने तूच हे रान सोडून जा ना ! म्हटलंच आहे -

त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।

ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥

(कुळासाठी एका व्यक्तीचा त्याग करावा, गावासाठी कुळाचा त्याग करावा, राज्यासाठी गावाचा त्याग करावा आणि स्वतःसाठी तर पृथ्वीचाही त्याग करावा म्हणजे तिलाही कःपदार्थ मानावे. )

दमनक असे म्हणाला, आणि 'मी जरा जाऊन येतो, तू जपून राहा, ' असे मायावी प्रेमळपणाने संजीवकाला सांगून, आपला भाऊ करटक याच्याकडे तो निघून गेला.

करटकाकडे जाताच त्याने विचारले, 'दमनका, तू कोणता उपद्‌व्याप करून आलास ?' त्याच्या या प्रश्नाला दमनकाने उत्तर दिले, 'दादा, जो उपद्‌व्याप करायला हवा होता, तोच केला. अरे, उपद्‌व्याप किंवा उद्योग न करता, केवळ दैवावर विसंबून राहून का कुठे भाग्य फळफळते ? म्हटलेच आहे अन ?-

उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी-

र्दैवं हि देवमिति कापुरुषा वदन्ति ।

दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या

यत्‍ने कृते यदि न सिद्ध्यति कोऽत्र दोषः ॥

(उद्योगी पुरुषश्रेष्ठावरच लक्ष्मी प्रसन्न होते.' 'दैव हाच देव असे केवळ क्षुद्र पुरुषच बोलतात. दैवाला बाजूला सारून आपल्या शक्तीनुसार प्रयत्‍न करूनही जर यश मिळाले नाही, तर त्यात कुणाचा दोष ?)

दमनक पुढे करटकाला म्हणाला, 'दादा, मी पिंगलकमहाराज व संजीवक या दोघांची वेगवेगळी भेट घेऊन, त्यांची मने एकमेकांविरुद्ध कलुषित केली. आता एकतर संजीवक हा पिंगलकमहाराजांकडून ठार मारला जाऊन, त्याच्या मांसाची आपल्याला मेजवानी मिळेल, किंवा तो पळून गेल्यास; महाराजांच्या दरबारी आपल्या शब्दाची किंमत वाढेल.'

करटकाला दमनकाने केलेले हे कारस्थान न आवडल्याने त्याने त्याची निर्भत्सना केली असता दमनक चिडून म्हणाला, 'दादा, माझ्या स्पष्ट बोलण्याचा राग मानू नकोस. ज्याच्यामुळे राजदरबारात आपल्याला काडीचीही किंमत उरली नव्हती, त्या संजीवकाचा परस्पर काटा काढण्यात किंवा त्याला पळवून लावण्यात काहीही गैर नाही. चतुरक नावाच्या एका कोल्ह्याचे असेच एक कारस्थान केल्यामुळे त्याला अख्ख्या उंटाचे मांस खायला मिळाले ना ?'

'ते कसे काय?' असे करटकाने मोठ्या उत्कंठेने विचारले असता दमनक त्याला ती गोष्ट सांगू लागला-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel