त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व मंगले होती. परंतु आज काय आहे? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोडकी घरे दिसतात. गाव पाहून वाईट वाटते. त्या गावचा जुना इतिहास आठवून डोळे भरून येतात. परंतु सा-या हिंदुस्थानचेच असे नाही का झाले? किती रडणार, आणि रडून काय होणार?
त्या गावात एक बाई होती. ती विधवा होती. लहान लहान मुले घरात होती, परंतु कर्ते माणूस घरात कोणी नव्हते. सारी त्या मातेवर जबाबदारी होती, काही शेतीवाडी होती. एक लहानसा मळा होता. ती बाई घरी शेती करी. शेजारी-पाजारी मदत करीत. कोणी नांगर देत, कोणी बैलाची जोडी दोन दिवस देई. तिचा संसार साजरा करीत.
परंतु सावकारीचा साप तिच्या संसारात शिरला होता. जेथे हा साप शिरतो तेथे सत्यानाश होतो. हा साप प्रथमच घरात शिरू देऊ नये. परंतु एकदा घरात आला म्हणजे त्याचा विळखा निघता निघत नाही. त्याचा दंश टळत नाही. मग मेल्याशिवाय सुटका नाही.
त्या बाईचा नवरा मेल्यावर सावकार काही दिवस शांत होता. बाईचा मोठा मुलगा सज्ञान केव्हा होतो, त्याची तो वाट पाहात होता. शेवटी आनंदा वयात आला. सज्ञान झाला. सावकाराचे हस्तक त्या गावात होते. एके दिवशी सावकार गावात आला. आनंदाला बोलावणे गेले. सावकार गोड बोलत होता. त्याच्या ओठांवर साखर होती, पोटात जहर होते.
सावकार : आनंदा, आता तू मोठा झालास. आईला मदत करतोस की नाही?
आनंदा : मदत न करीन तर पाप होईल. आम्हांला तिने काबाडकष्ट करून पोसले. लहानाचे मोठे केले. मी स्वत: मोट धरतो, मळा करतो.
सावकार : तुझा बाप फार देवमाणूस होता. त्याची नियत चांगली. त्याला मी कधी 'नाही' म्हणत नसे. रात्री बेरात्री आला तरी त्याला पैसे देत असे.
आनंदा : थोर आहात तुम्ही.
सावकार : हे बघ आनंदा, तुम्ही लहान होतात म्हणून आजपर्यंत मी बोललो नाही. म्हटले, तुझ्या आईला का द्यावा त्रास? परंतु तू आता मोठा झाला आहेस. तुझ्या वडिलांनी पैसे घेतले होते. आज पुन: नव्याने कागद करू. ही लिहून ठेवली आहे प्रॉमिसरी. सही कर म्हणजे झाले.