आनंदा : सही मला येत नाही, शाळेत कोणी घातले नाही.

सावकार : बरे, आंगठा कर पुढे. त्याला शाई लावून येथे उठवितो.

आनंदा तयार होईना. परंतु सभोवतालच्या मंडळींनी 'दे आंगठा; सावकार का फसवील?' असे सांगून आनंदाचा आंगठा घेतला. आनंदास सुपारी फोडून देण्यात आली. त्याच्यापुढे विडी फेकण्यात आली. आनंदा म्हणाला, ''मी विडी ओढीत नाही.''

ती लहानशी गोष्ट आनंदा घरी बोलला नाही. आंगठयाला लागलेली ती शाई सारा संसार बुडवील असे त्याच्या मनातही नव्हते. ती काळी शाई म्हणजे काळसर्पाचे जहर होते. ती काळी शाई म्हणजे सारी कृष्ण कारस्थाने होती. पंरतु अकपट आनंदाला काय माहीत? प्रेमळ मातेच्या संगतीत वाढलेले ते पोर. त्याला जगातील छक्केपंजे माहीत नव्हते.

दोन-चार महिने गेले, आणि घरी बेलीफ आला. आनंदाला समन्स लागले. सावकाराने फिर्याद केली. आनंदाच्या बापाने दोनशे रुपये घेतले होते. आनंदाची आई म्हणाली, ''त्यांनी १०० रुपये तर देऊन टाकले होते, व मला वाटले की, सारे देणे त्यांनी चुकते केले. कारण मरताना म्हणाले होते, 'कोणाचे देणे नाही. तुम्ही सुखाने कष्ट करा व राहा.' कोठले आहे हे देणे? मरताना का मनुष्य खोटे बोलेल?''

ती अनाथ माता सावकाराकडे गेली. ''माझ्या मुलाची भाकर ओढू नका. कोण आहे माझ्या मुलांना? कोठे जातील ती?''-किती तिने सांगितले. सावकाराचे गुमास्ते हसत होते. एक जण म्हणाला, ''अगं बाई, हा व्यवहार आहे. व्यवहारात का दयामाया असते? कोर्ट-कचेरीत का डोळयांतील पाणी उपयोगी पडते? तेथे शाईचे काम, हिशोबाचे काम.''

सावकाराने सारी शेतीवाडी जप्त केली. आता लिलाव होणार होता. आनंदाचा आनंद अस्तास गेला. त्याची भावंडे रडू लागली. माता लाचा झाली. ती आपली लहान मुले घेऊन सावकाराकडे गेली. मुलांना सावकाराच्या पायांवर घालून म्हणाली, ''यांच्याकडे पाहा हो जरा. तो दीड दोन बिघ्यांचा मळा तरी ठेवा. बाकीचे घ्या सारे. पोरांना तेवढा तरी तुकडा ठेवा, पदर पसरते दादा.''

सावकाराला का दया आली? मुसळाला का अंकुर फुटतो? रक्ताला चटावलेला वाघ का दया करतो? त्याने सारे घशात घातले. लिलावात कोण बोलणार? तोच बोलणारा. मातीमोलाने सोन्यासारखी शेती गेली. ती माता व तिची मुले मजूर झाली.
ती माता एके दिवशी मजकडे आली व म्हणाली, ''काँग्रेसचे सरकार आहे म्हणतात. माझे शेत परत मिळेल का? बिघा-दीड बिघ्याचा मळा तरी मिळेल का? पोरांना आधार होईल.'' मी म्हटले, ''कर्जबिल येणार आहे. परंतु जुन्हा हुकुमनाम्याची फेरतपासणी होईल की नाही देव जाणे! शेतक-यांची मूळची शेते त्यांना परत मिळावी, असा कायदा केला पाहिजे. परंतु तसा आज करता येणार नही, त्यासाठी झगडावे लागेल. एक दिवस मात्र  असा खास उजाडेल की, ज्या दिवशी किसानांची शेती त्यांना परत मिळेल.''

त्या मातेच्या तोंडावर आशा फुटली. तिच्या डोळयांत आनंदाश्रू आले. ती म्हणाली, ''दहा वरसांनी का होईना, परंतु मळा परत मिळो. मी मेल्ये तरी मुलांना होईल. दहा वरसांनी तरी मिळेल ना?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel