आज पहाटेची वेळ होती. बाहेर झुंजमुंजू होते तोच विश्वनाथ आज समुद्रतीरी गेला होता. विश्वनाथाचे गाव समुद्रकाठी होते. अफाट समुद्राकडे विश्वनाथ पाहात होता. ते त्याचे डोळे पाहा. त्याच्या हृदयसागरातील लाटा डोळयांवाटे बाहेर पडून समोरच्या समुद्रास मिळू पाहात होत्या. विश्वनाथ कसचा बरे विचार करीत आहे? ते पाहा उगवत्या सूर्यनारायणाला त्याने हात जोडले व म्हणत आहे, ''देवा, माझ्या बहिणीस माझे आयुष्य दे; मला मरण दे. माझ्या आईस मी आवडत नाही. तुझ्याकडे येऊन मी चांगला होईन व मग पुन्हा आईकडे येईन. देवा, माझी प्रार्थना ऐक; बाबराची प्रार्थना तू ऐकलीस तशी माझी पण ऐक.'' विश्वनाथ घरी निघून गेला.

विश्वनाथाच्या बहिणीस उतार पडू लागला. विश्वनाथास वाटले, 'देवाने प्रार्थना ऐकली.' विश्वनाथ आनंदी दिसू लागला. घरात आनंद वाटू लागला. परंतु हा आनंद फार दिवस राहावयाचा नव्हता.

एक दिवस सायंकाळी विश्वनाथ समुद्रकिना-यावरून आला तो तसाच अंथरुणावर जाऊन निजला. तो आज जेवला नाही, खाल्ला नाही. बोलला नाही, चालला नाही. थोडया वेळाने विश्वनाथाची बरी झालेली अशक्त बहीण त्याच्याजवळ गेली व म्हणाली, ''का रे, बरे नाही का वाटत?'' असे म्हणून तिने त्याच्या कपाळास हात लावून पाहिले, विश्वनाथाची उशी रडून भिजून गेली होती, त्याचे कपाळ सणसणले होते. त्यास फणफणून ताप आला होता, आक्का बरी झाली नि विश्वनाथ आजारी पडला.

विश्वनाथाचा ताप दोषी होता. चढउतार होत होता. आज दोन दिवस तर तो वातातच होता. ताप उतरावा म्हणून शंकरावर अभिषेक, अनुष्ठाने चालली होती. शंकराची पिंडी रोज थंड दहीभाताने लिंपण्यात येत होती. विश्वनाथाचा ताप दैवी किंवा मानवी प्रयत्नांनी हटला नाही.

''आई, मी तुला आवडत नाही; तर देवाकडे जातो व चांगला होऊन येतो, मग तर तुला आवडेन ना! मग मला रागाने नाही ना बोलणार?'' वातात विश्वनाथ असे बोलत होता. ते शब्द ऐकताच त्याच्या उशाशी खिन्न व सचिंत बसलेल्या त्याच्या आईचे हृदय चरकले. तिला त्या दिवशीची आठवण झाली. भरल्या डोळयांनी ती म्हणाली, ''बाळ, नको रे असे बोलू; नाही बरे माझ्या बाळास रागाने बोलणार!'' परंतु आईचे शब्द विश्वनाथास कोठे समजत होते? चूक वेळेवर बरोबर कळावी लागते, मग उशीर होतो.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel