एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिना-यावर शिंपा-कवडयाची संपत्ती किती तरी विखुरलेली असे. किना-यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प्रकारच्या समुद्रतीरावर उगवणा-या वेली वगैरे होत्या. या टेकडीवरून एकीकडून झाडीतून वर डोके काढणारी गावातील घरांची शिखरे, तर दुसरीकडे अफाट दर्या पसरलेला, असे मनोहर दृश्य दिसे. दूरवर पसरलेला तो परमेश्वराचा पाणडोह व त्यावर हंसाप्रमाणे पोहणारी ती शेकडो गलबते यांची मोठी रमणीय पण भव्य शोभा दिसे. सायंकाळ झाली म्हणजे गावातील मुले-मुली आपले चित्रविचित्र पोशाख करून येथील वाळवंटात किंवा टेडीवर खेळण्यास येत. टेकडीवरून घसरगुंडी करून खाली घसरत येण्याची मुलांना फार गंमत वाटे. सायंकाळी मावळत्या सूर्याचे सुंदर सोनेरी किरण लाटांशी शेवटची खेळीमेळी करताना पाहून आनंद होई. सूर्याचा तांबडा गोळा समुद्रात दूर क्षितिजाजवळ गडप होताना व त्या वेळची हिरवी निळी कांती दिसताना मनात शेकडो विचार उत्पन्न होत. रात्रीच्या वेळी तर समुद्राचा देखावा फरच सुंदर दिसे.

हजारो ता-यांची प्रतिबिंबे पाण्यात पाहून जलदेवतांची ही वेषभूषणेच चमकत आहेत असे भासे. चंद्रमा उगवला व समुद्राच्या लाटांगणीक अनंत चंद्रमे खाली नटलेले पाहिले म्हणजे शेकडो चांद छातीवर लटकवून हा महासागर आपली अद्भूत शक्ती, आपले प्रभुत्व, आपली संपत्ती दाखविण्यास उत्सुक आहे असे वाटे. खरोखर ज्या गावाला समुद्र आहे तो गाव धन्य आहे. ईश्वराचे वैभव दाखवणारा समुद्र हा कुबेर आहे; हे ईश्वराचे भव्य सिंहासन आहे.

ती पाहा संध्याकाळी झाली व मुले वाळवंटात खेळत आहेत. मुली कवडया जमा करीत आहेत. कोणी वाळूत किल्ले वगैरे बांधीत आहेत.परंतु थोडयाच वेळाने भरतीच्या लाट येऊन हे चिमुकले वाळूचे किल्ले कोठल्या कोठे जातील याची त्या मुलांस कल्पना आहे का? ती पाहा काही धीट मुले ढोपर ढोपर पाण्यात जाऊन गंमत करीत आहेत व मोठी लाट आली म्हणजे एकमेकांचे हात धरीत आहेत; समुद्राच्या लाटांवरील फेस पाहून ती पण खदाखदा हसत आहेत. पण त्या टेकडीवर पाहिलीत का ती तीन मुले? काय बरे त्यांचे भांडण चालले आहे? दोन मुलगे व एक मुलगी. ते दोन मुलगे आहेत ना, त्यांपैकी रतन हा जरा श्रीमंत आहे, परंतु किसन हा त्या मानाने गरीब आहे. त्या मुलीचे नाव लीला.

लीला लहान पण खेळकर होती. ती दिसावयासही चांगली होती. ती या दोघा मुलांची मैत्रीण. ही एके ठिकाणी खेळत, हिंडत, बागडत. संध्याकाळ झाली म्हणजे समुद्रकाठी ती तिघे खेळावयास येत. लीलाच्या घरी कधी थट्टेने म्हणत, की, ''लीला व रतन यांचा जोडा चांगला शोभेल. लीलाचे रतनशीच लग्न लावावे.'' या मुलांच्या कानावर ते शब्द पडत असत. लग्न म्हणजे काय याची त्यांस कोठे कल्पना होती! अल्लड त्यांची मने. तरी पण आज रतन म्हणाला, ''किसन, लिली माझी बायको होणार, लिली माझी होणार.'' किसन म्हणाला, ''नाही, माझीच होईल, पाहीन तुझी कशी होते ती!'' रतन म्हणाला, ''तू तर भिकारी, तुला कोण लिली देणार?  लिली माझीच.'' हे ऐकून किसनला वाईट वाटले, म्हणून त्याला रडू आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel