सालोमन म्हणून एक प्राचीन काळी पश्चिमेकडे राजा होऊन गेला. तो शहाणपणाविषयी फार प्रसिध्द होता. त्याच्या चातुर्याची कीर्ती दूरवर पोचली होती. कीर्तीही पंखाशिवाय उडत जात असते. एक दिवस सालोमन आपल्या दरबारात बसला होता. मोठमोठे अमीर, उमराव सरदार आपापल्या ठिकाणी बसले होते. इतक्यात दरबारात एक स्त्री आली. तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले.
सालोमनने विचारले, ''बाई, आपले काय काम आहे? आपणास कोणी दुष्टाने त्रास दिला आहे का ? बोला, परंतु तुमच्या चर्येवरून तर तसे काही दिसत नाही. मग आपण का आल्या आहात?'' ती स्त्री म्हणाली, ''राजा, तुझ्या चातुर्याची कीर्ती ऐकून त्या चातुर्याची परीक्षा घेण्यासाठी मी आले आहे. हे पाहा, माझ्या हातात दोन हार आहेत, या दोन हारांपैकी कृत्रिम फुलांचा हार कोणता व ख-या फुलांचा कोणता हे आपण दुरूनच सांगा, जर आपण ओळखले तर आपण माझ्या परीक्षेस : उतरला असे मी समजेन.''

ती सभा तटस्थ राहिली. राजास वासाने ओळखता आले असते. परंतु ती बाई दूर बसली होती. आपल्या राजाची एक बाई फजिती करून  ािणात की काय असे सभासदांस वाटू लागले. राजा विचारात पडला. इतक्यात त्याला उत्कृष्ट युक्ती सुचली. ज्या खिडकीजवळ ती बाई बसली होती त्या खिडकीबाहेर मधमाश्या घोंघावत होत्या, राजाने आपल्या नोकरास ती खिडकी सताड उघडण्यास सांगितले. खिडकी उघडताच काही मधमाश्या आत आल्या व नेमक्या एकदम ख-या फुलांच्या हारावर बसल्या. झाले. ती बाई सर्व उमजली. ती राजास म्हणाली, ''आपला शहाणपणाचा लौकिक एकंदरीत खरा आहे.''

मुलांनो, मधमाशी क्षुद्र प्राणी, परंतु तीसही कृत्रिमता आवडत नाही; खरी वस्तू त्या प्राण्यास आवडते. तुम्ही पण ढोंगीपणास भुलू नका, ख-या कामाची पारख करून ते आपलेसे करीत जा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel