भाग्यबाई इकडे तिकडे पाहात नव्हती. पायांना दगड खुपत होते, काटे बोचत होते, रक्त भळभळा येत होते; परंतु दु:खसंतापाने ती वेडी झाली होती. अत्यंत सुखाचे वेळी किंवा अत्यंत दु:खाचे वेळी स्वत:ला स्वत:चीच शुध्द नसते.
रानात पुढे पुढे चालली. आता रान मोठे सुंदर लागले. दाट जंगल लागले. मोठ मोठे वृक्ष तेथे होते. त्यांनी आकाशाला उचलून धरले होते, गर्द छाया होती; नाना रंगांचे पक्षी उडत होते. नाना स्वरांचे पक्ष्यांचे आलाप ऐकू येत होते. मधुर सुंदर फुलांचा वास भरून राहिलेल्या वा-याबरोबर येई.
होता होता एक अत्यंत सुंदर स्थळ आले. फारच रमणीय वनस्थली ती होती. तेथे प्रशांत सरोवर पसरले होते. लावण्यदेवतेचा जणू तो आरसाच होता. पाणी स्फटिकाप्रमाणे निर्मण होते. मधून मधून निरनिराळी कमळे फुलली होती. हंस तेथे पोहत होते. तेथील त्या प्रशांत सौंदर्याचे कोण वर्णन करील?
भाग्यबाईलाही थोडा दु:खाचा विसर पडला. परंतु इतक्यात आपण कशाला आलो याची तिला आठवण झाली. या प्रचंड जलाशयात आपला अभागी देह सोडून द्यावा असे तिने ठरविले. शेवटचा निश्चय तिच्या डोळयांत दिसू लागला. तिने आपले केस बांधले, पदर बांधला. मुलांची आठवण होऊन पुन्हा ते चार अश्रू पाहा गालांवर घळघळले. माया मोठी कठीण, मोठी कठीण हो.
इतक्यात या पाहा स्त्रिया तिकडून धावतच येत आहेत. कोण या स्त्रिया-आणि त्या का बरे धावत येत आहेत! ती पाहा, एकजण भाग्यबाईच्या जवळ जाऊन तिला सावरून धरते आहे, तिची विचारपूस करते आहे. चला, आपण त्यांचे बोलणे ऐकू. त्या स्त्रियांतील मुख्य जी होती तिचे नाव अकलंका होते. अकलंका भाग्यबाईस म्हणाली, ''बाई अशा जिवावर उदार का होता? जीव कधी देऊ नये. आत्महत्या हे घोर पातक आहे.''
भाग्यबाई म्हणाली, ''हो ते मला माहीत आहे. परंतु आजपर्यंत सर्व सहन केले हो. माझ्याइतकी सहनशीलता कोणीच दाखविली नसेल! परंतु सर्वच गोष्टींना मर्यादा आहे-नाही का? कोठवर तरी बाई सहन करावयाचे? नाही हो बाळांचे हाल पाहवत, बोंडलेभर दूध नाही, चिमूटभर पीठ नाही. पूर्वीचे माझे भाग्य केवढे-तुम्हीसुध्दा माझे नाव ऐकले असेल-भाग्यबाई-ती हो मी-पण मी आज अभागी!''
अकलंका म्हणाली, ''काय तुम्हीच का भाग्यबाई! हो, तुमचे नाव आम्ही ऐकले आहे. तुमचे मुलगे मागे एकदा आमच्या मदतीसाठी आले होते. दिलीप, दशरथ हे आले होते. तुम्हांला आज अशी दशा कशाने आली? या, अशा नीट बसा. तुम्ही थोर आहात.''