किसनने घरात थोडीफार तरतूद करून ठेविली होती, तरी ती पुंजी फार दिवस पुरणार नाही हे लिलीस माहीत होते. शिवाय समुद्रावरची सफर ती ठरल्या वेळी थोडीच थांबणार व संपणार! चार चार महिन्यांची चार वर्षे व्हायची! म्हणून लिली आता मोलमजुरी करावयास जाई. मुलांस घरी खाण्यास करून ठेवावे व कामावर जावे. बारा वाजता येऊन मुलांनी खाल्ले की नाही ते पाहावे, त्यांना पोटभर पाहून, त्यांना पोटाशी घेऊन, प्रेमाची ऊब देऊन पुन्हा कामावर जावे.

किसनची येण्याची मुदत संपली. एक वर्ष झाले. किसनचा पत्ता नाही. बंदरात येणा-या गलबताजवळ जाऊन लिली चौकशी करी. कोणी तिला हसत, कोणी थट्टा करीत. कोणी काही उत्तर देई. पतीची वार्त तिला समजेना. कधी दुस-या गलबताने पत्र नाही, निरोप नाही. काही नाही. घरातील पुंजी संपली. लिलीची मोलमजुरी पुरेशी होईना. ती स्वत: उपाशी राही व मुलांस खाण्यापिण्यास देई. एक दिवस मोठया मुलाने विचारले, ''आई, तू नाही ग जेवत?'' त्यावर लिली म्हणाली, ''हल्ली मी एक व्रत करते. ते रात्री सोडायचे. तुम्ही निजता, तेव्हा मी मग व्रत सोडते!'' मुलांची मने, समजूत पटली. लिलीचे शरीर कृश झाले. तिचे ता-यासारखे डोळे निस्तेज झाले.

आज सणाचा दिवस होता. लिली आज कामावर गेली नव्हती. परंतु घरात मुलांस गोडधोड देण्यासही काही नव्हते. लिली खिन्न होऊन बसली होती. इतक्यात त्यांच्या घरात कोणीसे आले? 'आई आहे का रे घरात मुलांनो?' 'हो आहे, या.' 'आई, हे बघ कोण आले आहेत.'

आपले डोळे पुसून लिली बाहेर आली. तो कोण दृष्टीस पडले! दुसरे कोणी नसून लहानपणचा सवंगडी रतन. लग्न झाल्यापासून रतन लिलीजवळ कधी बोलला नाही. पण आज रतन आला होता. दोघांची मने भरून आली. बाळपणीच्या हजारो आठवणी मन:सृष्टीत जमू लागल्या. शेवटी रतन म्हणाला. ''लिले मी आलो म्हणून मजवर रागावू नको. तुझे कष्ट मला दिसतात. तुझ्या या मुलांबाळांससुध्दा पोटभर अन्न मिळत नाही हे मला दिसते. तू मरमर काम करतेस तरी भागत नाही. आज सणावाराचा दिवस, पण तू रडत होतीस. हे पाहा, पुन्हा आले अश्रू. लिले! मी तुला खिजविण्यासाठी आलो नाही. साहाय्य करण्यास आलो आहे. लिले! माझी धनदौलत मला काय करायची? तुझा पती परत येईतो मी तुला मदत करीन, ती तू स्वीकारीत जा. नाही म्हणू नकोस. लहानपणच्या प्रेमासाठी तरी नाही म्हणू नको. मला इतका परका लेखू नकोस. तुझा पती परत आला म्हणजे मी पुन्हा तोंड दाखविणार नाही. लिले, या लहान्यासाठी, बालपणीच्या प्रेमासाठी तरी मी देईन ती मदत घेत जा. घेईन म्हण! हे पाहा नवीन सुंदर कपडे तुझ्या मुलांसाठी आणले आहेत. हा खाऊ आणला आहे. बोलाव  त्या मुलांस आत. आपण हे कपडे त्यांस नीट होतात का पाहू! हे पाच रुपये ठेव. मी दर रविवारी येत जाईन, कमीजास्त मला सांगत जा. तुझ्या मोठया मुलास शाळेत घातले पाहिजे. त्याला मी पुढचे वेळी पाटी घेऊन येईन. लिले, तू बोलत का नाहीस? माझा राग येतो का? बरे, आता मी जातो. तुझ्याने बोलवत नाही हे मला स्पष्ट दिसते आहे.'' असे म्हणून रतन बाहेर आला. त्या मुलांस घेतले, आंजारले, गोंजारले व निघून गेला. मुले चिवचिव करीत घरात आली. ''आई, कोण ग ते?'' इतक्यात तो खाऊ, ते कपडे सर्व त्यांना दिसले. ''आई, हे त्याने आम्हांला दिले, होय? हो आई?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel