मनूबद्दल जरी भीती वाटत असली तरी हा निरुपद्रवी मनुष्य आहे अशी सर्वांची खात्री झाली होती. पंधरा वर्षांत त्याचे कोणाजवळ भांडण नाही, कधी तंटा नाही, तक्रार नाही. विणाईच्या मजुरीविषयी घासघीस नाही. जे लोक देत ते तो घेई. लोकांना त्याची करुणा वाटे. एकटा जीव. कोणी सखा ना मित्र. मूल ना बाळ. कसा राहात असेल बिचारा, असे सर्वांना वाटे.
मनूच्या सार्या भावना गोठून गेल्या होत्या. त्याचे सारे प्रेम, त्याचा सारा लोभ, त्या सुवर्णमुद्रांत साठवला होता. आईबाप आपल्या मुलांना कुरवाळतात. मनू ती सोन्याची नाणी कुरवाळी. हातांत घोळून घोळून ती सोन्याची नाणी गुळगुळीत झाली होती. ‘शंभर झाली माझी नाणी आता सव्वाशे होतील. सव्वाशेची दीडशे व दीडशांची दोनशे होतील,’ असे तो मनात म्हणे व त्या मोहरांचे चुंबन घेई.
त्याच्या हृदयातील ओलावा एखादे वेळेस नकळत प्रकट होई. मनूच्या घरात फारशा वस्तू नव्हत्या. एक मातीचा घडा होता, तो मनूला फार आवडे. त्या मडक्यावर त्याचा जीव होता. तो घडा घेऊन विहिरीवर जाई व रोज भरून आणी. हलक्या हाताने तो घडा मनू स्वच्छ करी. त्या घड्यातील निर्मळ पाण्याकडे तो बघत राही. ‘मनुष्याच्या डोक्यापेक्षा हा घडा निर्मळ आहे. डोक्यात घाणेरडे विचार येतात, परंतु माझ्या या मडक्यात घाणेरडे पाणीही निर्मळ होते!’ असे तो म्हणे.
परंतु एके दिवशी तो घडा फुटला. त्याचे तीन तुकडे झाले. त्या तीन तुकड्यांत त्याचे त्रिभुवन होते. त्या तुकड्यांकडे तो पाहात राहिला. इतके दिवस तो घडा त्याच्यासाठी झिजला होता. पंधरा वर्षे त्या घड्याने निर्मळ जीवन दिले. तो घडा मनूच्या जीवनाचा जणू एक भाग झाला होता. तो घडा निर्जीव नव्हता. तो घडा मनूशी बोले, मनूशी हसे. परंतु तो घडा आज गेला. एक महान मित्र गेला. मनूने आदराने ते तीन तुकडे उचलून घरी आणले. ते तीन तुकडे त्याने कसे तरी सांधवून तेथे ठेवले. ते जणू त्या घड्याचे स्मारक होते. ती जणू आठवण होती. फुटलेल्या घड्याला मनूच्या प्रेमाने जणू पुनर्जन्म दिला. परंतु तो घडा आता पाण्याच्या उपयोगी नव्हता.
मनूच्या झोपडीतील सार्या वस्तू जणू सजीव होत्या. तो मग गाणे गाई. ते फुटके मडके बोले. ती सोन्याची नाणी म्हणजे तर परमानंद. त्या खोलीतील वस्तू म्हणजे त्याचे मित्र. तेच त्याचे कुटुंब. तीच त्याची मुलेबाळे. अशा रीतीने मनूचे आयुष्य चालले होते. तो आता म्हातारा दिसू लागला. त्याचे वय फार तर चाळीस असेल. परंतु सारे त्याला “बुढ्ढेबाबा” म्हणून म्हणतात.