रायगावात दिगंबरराय हा मोठा जमीनदार होता. सारा गाव त्याला मान देई. गावात काही तंटाबखेडा झाला, तर त्याचा निवाडा दिगंबरराय करायचे. दिगंबररायांना दोन मुलगे होते. मोठ्या मुलाचे नाव संपतराय व धाकट्याचे नाव ठकसेन. दिगंबररायांची पत्नी मरण पावली होती. घरात आचारी स्वयंपाक करी. घरात सारी अंदाधुंदी असे. सारा पसारा. घरात स्त्री असेल तर व्यवस्था राहाते. स्त्रियांशिवाय घराला शोभा नाही. सारे ओसाड, उदास व भगभगीत दिसते.

“संपत, तू आता लग्न कर. त्या दलपतरायांची मुलगी इंदुमती तुला साजेशी आहे. त्यांचं घराणंही माठं खानदानीचं आहे. इंदुमतीचंही तुझ्यावर प्रेम आहे. तिच्या पित्यानं तिचं कधीच लग्न केल असतं, परंतु तिचं तुझ्यावर प्रेम आहे असं त्याला कळलं. त्यामुळं तो थांबला आहे. संपत, तू का नाही होत लग्नाला तयार? वेळीच सारं करावं. तुझी पचविशी उलटून गेली. माझं ऐक. मीही आता म्हातारा झालो आहे. मरणापूर्वी घराला कळा आलेली पाहू दे. घरात सून म्हणजे घराला शोभा येईल, घरात आनंद येईल, व्यवस्थितपणा येईल. हल्ली घर म्हणजे धर्मशाळा वाटते. घराला घरपणा स्त्रियांशिवाय नाही. करतोस का लग्न?” पित्याने विचारले.

“बाबा, थोडे दिवस आणखी जाऊ देत. इंदुमतीच माझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट मला माहीत आहे. ती आशेनं आहे. तिची आशा पूर्ण होईल. परंतु काही दिवस थांबा. मी तुमच्या शब्दांबाहेर नाही. खरोखर नाही.” संपत म्हणाला.

“तू चांगला आहेस. तो ठकसेन तर वाटेल ते करतो. त्याला काही घरबंधच नाही. तू माझी आशा. तू कुळाचं नाव राख. तू कुळाची परंपरा सांभाळ. आपली प्रतिष्ठा जाऊ देऊ नकोस. आणि संपत, आता घरचा कारभार तूच पाहू लाग. हिशेब वगैरे ठेव. जमाखर्च बघ. चांगला हो. समजलास ना?” पिता म्हणाला.

“होय बाबा, मी कारभार बघत जाईन. तुमचा त्रास कमी करीन. तुमचं सुख ते माझं.” संपत म्हणाला.

एके दिवशी संपत वसूलगोळा करून येत होता. चारपाचशे रुपयांचा वसूल आला होता. बाबांना केव्हा एकदा सांगू असे त्याला झाले होते. इतक्यात तिकडून धाकटा भाऊ ठकसेन आला. त्याला चुकवून संपत जाऊ जाऊ बघत होता. परंतु ठकसेन जवळ आलाच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel