“हो. आणि आता रामूला भाकर करून देत्ये. तो ताजीताजी भाकर खाईल व कामाला जाईल. बाबा, तुम्ही जरा दूर होता? चुलीवर तवा टाकते.”
मनूबाबा दूर झाले. सोनीने पीठ घेतले. तव्यावर भाकर पडली. दुसर्या भाकरीला थोडे पीठ हवे होते.
“रामू, थोडे पीठ घालतोस त्यातले?”
“हो.”
त्याने पीठ घातले. परंतु एकदम अधिक पडले.
“हे पाहा! इतकं कशाला? चार भाकर्या होतील. फार भूक लागली वाटतं?” हसून सोनीन विचारले.
“मी एकटाच भाकर खाऊ? माझ्याबरोबर तूही खा. दोघांसाठी पीठ. तू एकट्या रामूची काळजी घेतेस. परंतु रामू दोघांची घेतो. खरे ना?” तो हसून म्हणाला.
“बाबा, तुम्हीही थोडी कढत कढत खाल भाकर आमच्याबरोबर? तव्यावर पिठलं करीन. आपण खाऊ.” सोनीने विचारले.
“खाईन तुमच्याबरोबर. उजाडत खाण्याची मला म्हातार्याला लाज वाटते. परंतु सोनीबरोबर खाण्यात गंमत आहे.” मनूबाबा म्हणाले.
भाकर्या झाल्या. तिघे खायला बसली. इतक्यात रामूची आई साळूबाई आली.
“हे काय रे रामू? कामावर नाही का जायचं? इथं काय खात बसलास? घरी भाकर केली आहे ना!” ती म्हणाली.
“इथं खाल्लंन म्हणून काय झालं?” मनूबाबा म्हणाले.