मनूबाबाच्या आयुष्यात आता क्रांती झाली. त्या लहान मुलीचे तो सारे करी. लहान मुलांचे कसे करावे ते त्याला माहीत नव्हते. प्रेमाने मनुष्य सारे शिकतो, आणि साळूबाई होतीच धडे द्यायला.
“मनूबाबा, तुम्हांला मुलीच्या अंगात नीट आंगडं घालता येईल का? नाही तर घालाल कसं तरी. तिच्या हाताची ओढाताण कराल. चिमुकले हात. का मी नीट घालून दाखवू?” साळूबाईने विचारले.
“दाखवा. एकदा दाखविलंत म्हणजे पुरे. त्याप्रमाणं मी करीत जाईन. आणि वेणी कशी घालायची? केस सारखे डोळ्यांवर येतात. नाही तर तिरळी व्हायची. मला दाखवा वेणी घालून.” मनूबाबा म्हणाले.
“मी रोज येऊन वेणी घालीत जाईन.” साळूबाई म्हणाली.
“नको. माझ्या हातांनी मला सारं करू द्या. मी करीन सारं मी शिकेन. तसंच हिला न्हायला कसं घालायचं तेही सांगा. केस स्वच्छ राहिले पाहिजेत. नाही तर होतील उवा.” मनूबाबा म्हणाले.
“मी दाखवीन एकदा न्हायला घालून. परंतु मनूबाबा, मुलीचं नाव काय ठेवायचं? तिला कोणत्या नावनं हाक मारायची? चांगलस नाव हवं. साधं व सुटसुटीत.” साळूबाई म्हणाली.
“माझी एक लहान बहीण होती. तिची आठवणही मी विसरून गेलो होतो. या मुलीला पाहूनन तिची मला आठवण झाली. ती बहीणच देवाघरून पुन्हा माझ्याकडे आली की काय असं वाटलं. त्या बहिणीचं नाव हिला ठेवावं असं मनात येतं. परंतु तं नाव उच्चारायला कठीण होतं. तुम्ही सुचवता का एखादं नाव?” मनूबाबांनी विचारले.
“सोनी ठेवा नाव. तुमचं गेलेलं सोनं. तेच जणू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परत आलं. सोनी नाव छान आहे. लहानसं, गोड नाव.” साळूबाई म्हणाली.
“सोनी. खरचं सुंदर नाव. कसं तुम्हांला सुचलं. माझं सोनचं आहे ते. चालतं बोलतं सोनं.” मनूबाबा म्हणाला.