झोपडीत अशी बोलणी चालली होती. तिकडे संपतराय व इंदुमती झोपडीकडे येण्यासाठी बाहेर पडत होती. घोड्याची गाडी तयार झाली. तीत ती दोघेजण बसली. संपतरायाच्या हातात इंदुमतीचा हात होता. कोणी बोलत नव्हते. गाडी निघाली. रात्रीच्या वेळेला तो टाप् टाप् आवाज घुमत होता. कोणी कोणी घरातून डोकावून पाहात होते. “जात असतील फिरायला. घरात करमत नसेल. मूल ना बाळ!” असे कोणी म्हणत होते.
झोपडीच्या दाराशी गाडी थांबली. सोनी व मनूबाबा चकित झाली. कोणाची गाडी? रात्रीच्या वेळी कोण आले असेल? आपल्याकडे का कोणी आले आहे? का वाटेचा कोणी प्रवासी आहे? इतक्यात झोपडीच्या दारावर टकटक आवाज झाला. सोनी पटकन उठली. दाराजवळ गेली. तिने “कोण आहे” म्हणून विचारले.
“मी संपतराय.” उत्तर आले.
सोनीने लगबगीने दार उघडले. दारात संपतराय व इंदुमती उभी! म्हातारा मनूबाबा उठला. सोनीने पटकन बैठक घातली. एक आरामखुर्ची होती व दुसरी एक खुर्ची होती. त्या दोन्ही खुर्च्या पुढे करण्यात आल्या.
“बसा.” मनूबाबा आदराने म्हणाला.
“तुम्हीही बसा. बस सोन्ये.” संपतराय प्रेमाने म्हणाले.
“सोन्ये, दार लाव बेटा.” इंदुमती म्हणाली.
“आज हवेत गारठा आहे.” म्हातारबाबा म्हणाले.
“तुमच्या झोपडीत तर अधिकच थंडी लागत असेल आणि भरपूर पांघरूणही नसेल. खरं ना सोन्ये?” संपतरायाने विचारले.
“आम्ही चुलीत विस्तव ठेवतो. त्यामुळे ऊब असते आणि बाबांचं प्रेम आहे ना. त्यांनी नुसता हात माझ्या पाठीवरून फिरविला तरी थंडी पळते. प्रेमाची ऊब ही खरी ऊब.” सोनी म्हणाली.