आपले मूल घेऊन ती तरुणी निघाली. पायी निघाली. चालून चालून तिच्या पायांना फोड आले. एका तीव्र भावनेने ती चालत होती. “आज त्यांच्या घरी लक्ष्मीपूजन असेल. मोठा थाटमाट असेल. समारंभ होत असेल. शेकडो स्त्री-पुरुष आले असतील. अशा वेळेस तिथं जाऊन मी उभी राहीन. सार्‍या जगासमोर त्यांचं पाप उघडं करीन. त्यांच्या आनंदात विष ओतीन. मी त्यांची गृहलक्ष्मी. परंतु मला इकडे रडत ठेवतात. मी गरीब घराण्यातील असल्ये म्हणून काय झालं? गरिबांना का अब्रू नसते? मी गरीब होते, तर आले कशाला माझ्याजवळ? केवळ का माझी कातडी पाहून भुलले? किडे मेले. दुष्ट आहे पुरुषांची जात. मला पण सूड घेऊ दे. सार्‍या जगासमोर त्यांचं हिडीस स्वरूप उघडं करत्ये. लक्ष्मीपूजनाचे दिवे तेवत असतील. प्रकाश पसरला असेल. अशा सुंदर प्रकाशात त्यांची कृष्णकृत्यं जगासमोर मांडत्ये. जगाला ओरडून सांगेन...”

परंतु तिच्या त्या तीव्र भावनेची शक्ती कमी पडली. पाय थकले. संकल्पशक्तीने पाय काही वेळ चालत होते. परंतु पोटात अन्न नाही. पाऊल कसे उचलले जाणार? बाहेर अंधार पडला. किती लांब आहे. अजून गाव? तिला काही कल्पना नव्हती.

रायगावातील लोक आता झोपले होते. दिवे विझून गेले होते आणि गार गार वारा सुटला होता. अंगाला झोंबणारा वारा. कडाक्याची थंडी अशी थंडी कधी पडली नव्हती. मनूबाबा जागा होता. त्याने दार उघडे ठेवले होते. तो पुन:पुन्हा दाराशी येई व आपले सोने परत आले का पाही. दारात तो उभा राही व शून्य दृष्टीने दूरवर बघे. मग तो गार वारा अंगाला लागला म्हणजे तो पुन्हा खुर्चीत येऊन पडे. परंतु त्याला झोप येत नव्हती. त्याच्या पणत्या विझून गेल्या. फक्त एक पणती अद्याप तेवत होती. मनूबाबाने आता दार लावून झोपायचे ठरविले. तो दाराजवळ गेला. परंतु दार लावण्याचे विसरला. पुन्हा विचारात मग्न झाला. शेवटी तो अंथरुणात येऊन पडला. परंतु थंडी लागत होती. त्याच्या घरात भरपूर पांघरूण नव्हते. तो उठला. त्याने लाकडे पेटविली. त्यांच्याशी तो शेकत बसला. विस्तव सोन्याप्रमाणे चमकत होता. हे आपले सोने, असे मनूबाबाला वाटले व तो त्या निखार्‍यांस हात लावणार होता. पुन्हा त्याला भान आले.

मनूबाबा अशा मन:स्थितीत असताना त्याच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर निराळा प्रकार होत होता. ती तरुणी अगदी गळून गेली होती. तिची सर्व आशा मेली. आत फक्त स्वत: ती मरायची उरली होती. तिच्याजवळ एक कुपी होती. त्या कुपीतील काही तरी ती प्यायली. मातृप्रेम म्हणत होते, “पिऊ नको.” निराशा म्हणे, “पी. जगण्यात अर्थ नाही.” ते काही तरी पिण्यापूर्वी तिने आपल्या मुलाला एकदा शेवटचे पाजले. तिने त्याचे मुके घेतले. नंतर त्या बाळाला तिने आपल्या फाटक्या लुगड्याचा पदर फाडून त्यात गुंडाळले. त्याला थंडी लागू नये म्हणून तिने मरता मरता काळजी घेतली. नंतर त्या मुलाला दोन्ही हातांनी घट्ट धरून ती चालत होती. हळूहळू त्या पेयाचा पूर्ण परिणाम झाला. किती वेळ चालणार? आता एक पायही उचलेना. शेवटी ती तेथेच मुलाला घट्ट धरून निजली. भू-मातेच्या मांडीवर निजली. शरीरातील ऊब जात चालली, प्रेम जात चालले. मुलाला घट्ट धरून ठेवणारे तिचे ते हात आता अलग झाले. मुलाकडे प्रेमाने पाहाणारे ते डोळे हळूहळू पूर्णपणे मिटले. कायमचे मिटले! ती माता गतप्राण होऊन पडली. अरेरे!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel