“बाबा, बागेसाठी घेणार ना जागा? कधी घेणार?” सोनीने विचारले.
“घेणार आहे. हल्ली त्याच खटपटीत आहे.” मनूबाबा म्हणाले.
आणि मनूबाबा खरोखरच त्या उद्योगात होते. झोपडीच्या जवळच ते जागा बघत होते. ज्या ठिकाणी सोनीची अनाथ माता मरून पडली होती, ते ठिकाण बागेच्या मध्यभागी असावे अशी एक सुंदर उदात्त कल्पना त्या विणकराच्या मनात आली. ती साडेतीन हात जागा बागेच्या मध्यभागी पवित्र राखू. भोवती फुलांचे ताटवे लावू. जणू सोनीच्या आईची समाधीच! असे विचार मनूबाबाच्या मनात खेळत होते.
मनूबाबाने ती जमीन खरेदी केली. पडीतच जमीन होती. फार किंमत पडली नाही आणि संपतरायाने ती जमीन कमी किंमतीत त्या म्हातार्याला मिळावी म्हणून योजना केली. संपतरायाचे सोनीवर प्रेम होते. मधूनमधून तो मनूबाबांकडे पैशाच्या रूपाने मदत पाठवीत असे.
मनूबाबांनी जी जमीन खरेदी घेतली, तिच्याभोवती दगडांचे सुंदर कुसू घालून देण्याचे संपतरायाने ठरविले. त्या जमिनीजवळच दगडांची खाण होती. तो जो खळगा होता, तेथेच ती खाण होती. मजूर तेथे कामाला लागले. दगड खणून काढू लागले. तसेच तेथे जी दलदल होती, तीही भरून काढण्याचे काम सुरू झाले. मनूबाबाच्या बागेजवळ घाण नको. गावाचे गटार नको.
संपतरायाची माणसे काम करीत होती. परंतु तेथे काम करणारे एकदम चकित झाले. खणता खणता तेथे एकदम काही तरी सापडले. काय सापडले? त्या दोन चामड्याच्या पिशव्या आणि तेथे तो सोनेरी मुठीचा संपतरायांचा चाबूक सापडला. तेथे एक मनुष्य पुरलेला असावा. त्याची हाडे होती. कोण तो मनुष्य? परंतु तेथे एक आंगठीही होती. त्या आंगठीवर ठकसेनाचे नाव होते! ठकसेन! संपतरायाचा भाऊ ठकसेन! तो का चोर होता? त्याने का मनूबाबांच्या पिशव्या चोरल्या? आश्चर्य! पंधरा वर्षांनी गोष्ट उघडकीस आली.
गावातील सारी मंडळी त्या खळग्याकडे धावत आली. लहान-मोठी सारी माणसे तेथे जमली. मनूबाबा, सोनी, रामू, साळूबाई सारे तेथे आली.
“माझं सोनं. माझं कष्टानं मिळविलेलं सोनं. परंतु सोनीपुढे हे सोनं फिक्क आहे. सोनीच्या लग्नासाठी सोनं आलं.” मनूबाबा म्हणाले.