“सोन्ये किती सुंदर दिसतं आहे तुझं तोंड!” मनूबाबा म्हणाले.
“तुम्हांला मी नेहमीच सुंदर दिसते!” ती म्हणाली.
“मलाच नाही. सर्वांनाच तू सुंदर दिसतेस. परंतु तुझं हे सौदर्य कोणाच्या पदरी घालायचं? सोन्ये, तू आता मोठी झालीस. तुझं लग्न केलं पाहिजे. मी आता म्हातारा झालो. तुझे हात योग्य अशा तरुणाच्या हाती दिले, म्हणजे माझं कर्तव्य संपलं.”
“बाबा!”
“काय सोन्ये!”
“तुम्हांला एक विचारू?”
“विचार बेटा.”
“रामू मला विचारीत होता.”
“काय विचारीत होता?”
“तू माझी बायको होशील का म्हणून.”
“तू काय म्हणालीस?”
“म्हटलं की बाबांना विचारीन.”
“तुम्ही दोघांनी ठरवून टाकलंत एकंदरीत. माझी चिंता कमी केलीत.”
“बाबा, रामू चांगला आहे. तुम्हांला नाही तो आवडत?”
“सार्या जगाला तो आवडतो. दिसतो कसा दिलदार. आळस त्याला माहीत नाही. खरचं चांगला आहे रामू.”
मनूबाबाचे डोळे ओले झाले. त्यांनी सोनीचा हात हातांत घेतला. या हातावर त्या डोळ्यांतील पाणी पडले. त्या अश्रूंत किती तरी अर्थ भरलेला होता!