युरोपमध्यें पंधराव्या शतकापासून धार्मिक लढयांस जोराचें व भीषण स्वरुप प्राप्त झालें. तत्पूर्वी खिस्ती राष्ट्रांचीं तुर्की लोकांबरोबर युध्दें होत असत. ही युध्दें आतां थांबलीं, आणि युरोपमध्ये धार्मिक क्रांति घडून आली. धार्मिक क्रांति याचा अर्थ असानाहीं कीं एक धर्म जाऊन अन्य धर्माचा उद्भव झाला. जुना धर्म जो होता. त्याचेंच शुध्दतर स्वरूप समजून घेण्याचा लोक प्रयत्न करूं लागले. नवीन विद्यांचा उदय झाला, नवीन शिक्षण, नवीन छापखाने यांमुळें लोक स्वतंत्र विचार करूं लागले. धर्मोपदेशक जें सांगतील त्यांवर अंध श्रध्दा ठेवून वागणें हें समंजस लोकांस पटेनासें झालें. धर्मोपदेशकांविरुध्द पोपांविरूध्द बंड उभारणा-या या लोकांस प्रॉटेस्टंट असें नांव मिळालें. या पंथीय लोकांस फार जाच सहन करावा लागला. कॅथोलिक पंथीय राजांकडून यांचा अनन्वित छळ झाला. शेकडों लोक जिवंत जाळले गेले, फांसावर लटकले गेले, इन्क्किझिशन म्हणून एक स्वतंत्र संस्था या लोकांचा छळ करण्यासाठीं उत्पन्न झाली. इंग्लंडही या क्रांतिपासून सोंदळें राहूं शकलें नाहीं. इंग्लंडमध्यें जो राष्ट्रीय धर्मपंथ स्थापन झाला तो अगदीं पुढें गेलेला प्युरिटनपंथही नव्हता. तो एक मधलाच पंथ होता या पंथाच्या मतांविरूध्द जे लोक जातील त्या लोकांचा आठव्या हेन्रीच्या वेळेपासून छळ होऊं लागला, मग तो रोमन कॅथोलिक असो वा प्युरिटन असो. प्रॉटेस्टंटपंथात पुढें गेलेले त्यांस प्युरिटन ही संज्ञा होती. या लोकांचा स्टुअर्ट घराण्यांतील पहिला चार्लस याच्या कारकीर्दीत लॉड वगैरे धर्माधिका-यांनीं फार छळ केला. हा लॉड देशीय राष्ट्रीय जें चर्च त्याला अनुकूल असत त्यांचे लाड करी, इतरांचे हाल करी. फटके मारणें, डाग देणें, कान कापणें, खोडयांत घालणें अशा क्रूर शिक्षा तो देई.
या छळामुळें कंटाळून लोक धर्ममतरक्षणार्थ अमेरिकेंत जाऊं लागले. या लोकांस अत्यंत हालांत दिवस काढावे लागले. इंग्लंडांतील धुरेंदारें सोडावयाचीं, ३000 मैल दूर जाऊन रहावयाचें. तेथें ना ओळख ना देख, नवीन जमीन, नवीन हवा, नवीन पाणी, सर्वच नवीन. पेरून पिकवावें तेव्हां पोटास मिळावयाचें. हजारों मैल पसरलेलीं जंगलें तोडून जमीन साफ करावी व मग झोंपडें उभारुन रहाण्याची तजबीज करावयाची, शिवय तेथील रानटी लोकांचा हल्ला वगैरे केव्हां येईल, त्यांचे तिरकमटे व भाले केव्हां अंगांत खुपसण्यांत येतील याचा नेम नसे. या परिस्थितीस हे धर्मवेडे लोक तोंड देण्यास तयार झाले. त्यांच्या प्रयत्नांची व चिकाटीची धन्य होय यांत शंका नाहीं.
१६२९ च्या सुमारात इंग्लंडमधून लोक जाऊ लागले. मध्यंतरीं इंग्लंडमध्यें राजकीय व धार्मिक पक्षांत लढाया होऊन क्रॉम्बेल हा प्रमुख अधिकारी झाला. क्रॉमवेलच्या कारकीर्दीत सर्व प्रॉटेस्टंट पंथीयांस वाटेल तसें वागण्याची मुभा होती परंतु हें संताचें साम्राज्य फार दिवस टिकूं शकले नाहीं. क्रॉमवेल मेल्यावर पुन्हां राजशाही इंग्लंडमध्यें सुरूं झालीं आणि दुसरा चार्लस व दुसरा जेम्स यांच्या कारकीर्दीत पूर्वीच्या छळाची पुनरावृत्ति होऊं लागलीं. प्युरिटन पंथीय लोकांस सर्वत्र मज्जाव. त्या लोकांनीं एके ठिकाणी पांचापेक्षां जास्त जमू नये, वगैरे निरनिराळें कायदे करण्यांत आल्यामुळें कुंटुबांतील मंडळीसुध्दां प्रार्थनेस एके ठिकाणी येणें दुष्कर होईल. अधिकारी येतो कीं काय यावर देखरेख करण्यासाठीं दारांत मुलें उभीं करून मग लोक बायबलें वाचीत; अधिकारी येतो असें समजलें कीं हें पुस्तक स्टुलाच्या खालच्या बाजूस अडकाविलें जाई व त्या स्टुलाचा बसण्यास उपयोग होई, अधिकारी गेला म्हणजे पुन्हां स्टूल उलटें करण्यांत येई. व बायबल वाचलें जाई. अशा प्रकारें चोरून मारून सत्यधर्म पाळावा लागे. लोक संत्रस्त झाले व यामुळें पुन्हां १६८0 नंतर अनेक लोक धर्मासाठीं इंग्लंड सोडण्यास तयार झाले व जाऊं लागले. या लोकांमध्येंच एक घराणें फ्रँकलिन या नांवाचें होतें.